नागपूर साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्योती लांजेवार

नागपूर -विदर्भ साहित्य संघाच्या हीरकमहोत्सवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व समीक्षक डॉ. ज्योती लांजेवार यांची निवड करण्यात आली आहे. २८ ते ३० जानेवारीदरम्यान वर्धा येथे हे संमेलन होणार आहे. वर्ध्यातील यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था संमेलनाची निमंत्रक असून आ. सुरेश देशमुख हे स्वागताध्यक्ष असतील. डॉ. ज्योती लांजेवार या मराठी वाङमयप्रेमींना आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना सुपरिचित आहेत. नागपूर येथील बिझाणी महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून त्या अलीकडेच निवृत्त झाल्या होत्या.

दिशा, शब्दनिळे आभाळ, अजून वादळ उठले नाही, एका झाडाचे आक्रंदन हे कवितासंग्रह आणि आजची सावित्री, पक्षीण आणि चक्रव्यूह हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. समकालीन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह, फुले-आंबेडकर आणि स्त्रीमुक्ती चळवळ, दलित कादंबरीतील स्त्रीचित्रण, भारतीय समाज आणि स्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचा गोंधळ, दलित साहित्य चळवळ व दिशा, साहित्यातील स्त्रीवाद आदी वैचारिक समीक्षा संपादने तसेच माझा जर्मनीचा प्रवास हे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या लेखनाची इंग्रजी, जर्मन, स्वीडीश ऑस्ट्रियन, सिहली, नेपाळी आदी भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. आजवर त्यांना बी. सी. मर्ढेकर काव्य पुरस्कार, डॉ. आंबेडकर फेलोशिप, लोकमित्र पुरस्कार, पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचा पुरस्कार, राष्ट*ीय हिदी साहित्य अकादमी पुरस्कार, शासनाचा दलितमित्र पुरस्कार, साहित्य संघाचा शरच्चंद्र मुत्ति*बोध काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Leave a Comment