केन्द्रातले त्रांगडे

केन्द्र सरकारची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत. त्या  वरिष्ठ नेत्यांत देशासमोरच्या प्रश्नाच्या संबंधात एकमत  नाही,  मतभेद आहेत पण त्यापलीकडे मतभेद असायला त्यांच्यात विसंवाद व्यक्त होण्याइतका संवाद तरी हवा आहे पण तोही नाही. केन्द्रीय मंत्रिमंडळातल्या तीन मुख्य मंत्र्यांत आणि संपुआघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात विचारांची दरी आहे. सोनिया गांधी दीर्घकाळ काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहिलेल्या आहेत. त्यांचा हा कालावधी कितीही प्रदीर्घ असला तरी पक्षावर वर्चस्व आणि हुकमत ठेवण्याच्या बाबतीत त्या कमालीच्या कमी पडलेल्या आहेत. आता पक्षाच्या तीन वरिष्ठ नेत्यांमध्ये कमालीची कटुता आणि वितुष्ट असल्याचे दिसत आहे.  पंतप्रधान मनमोहनसिग, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि गृहमंत्री पी. चिदंबरम् या तिघांकडे सारा देश मोठ्या आशेने पहात आहे. कारण या तिघांनी आपापल्या प्रशासन कौशल्याचे चांगलेच प्रत्यंतर आणून दिलेले आहे. सध्या संपु आघाडी सरकारमध्ये जे काही बरे चालले आहे त्याचे बरेचसे श्रेय या तिघा वरिष्ठ मंत्र्यांना दिले पाहिजे. परंतु या तिघांचे मात्र एकमत नाही आणि त्यांच्यावर सोनिया गांधींचे नियंत्रण नाही.

    विशेषतः २ जी स्पेक्ट*म घोटाळा कसा हाताळावा याबाबत सोनिया गांधी, मनमोहनसिग, प्रणव मुखर्जी आणि पी. चिदंबरम् या चौघांमध्ये पुरेसा समन्वय आणि सुसंवाद नाही असे लक्षात यायला लागले आहे. डॉ. मनमोहनसिग यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना आपण या प्रकरणात लोकलेखा समितीसमोर हजर राहण्यास तयार आहोत, असे जाहीर केले. परंतु प्रणव मुखर्जी यांनी कोलकत्ता येथे एका कार्यक्रमात बोलताना, डॉ. मनमोहनसिग यांची ही चूक आहे असे प्रतिपादन केले. बोलण्याच्या ओघात ते असे म्हणाले असतील, परंतु ते बोलता बोलता त्यांनी, पंतप्रधानांनी काँग्रेसच्या अधिवेशनात आपली भूमिका मांडताना आमच्यापैकी कोणाशीच चर्चा केलेली नव्हती असे सांगून टाकले. याचा अर्थ या मुद्यांवरून दोघात मतभेद आहेत असा तर होतोच, परंतु सत्तेच्या वरच्या शिखरावर असलेल्या या चौघांमध्ये पंतप्रधानांनी याबाबत काय भूमिका घ्यावी याची चर्चा झालेली नव्हती हे लक्षात येते.
   

देशासमोर उभ्या असलेल्या एवढ्या मोठ्या गंभीर प्रश्नात जर पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांच्यात कसला संवादच होत नसेल तर देशाचा कारभार हाताळला कसा जाणार आहे, असा प्रश्न निर्माण होतो. या चौकटीतला समन्वयाचा अभाव इतरही काही प्रकरणात डोकावताना दिसत आहे. विशेषतः अन्न सुरक्षाविषयक कायद्याच्या बाबतीत पंतप्रधान मनमोहनसिग आणि सोनिया गांधी यांच्यात गंभीर मतभेद आहेत. सोनिया गांधी यांना लोकप्रिय धोरणे अवलंबून अधिकात अधिक जनतेला खूश करून पक्षाला निवडून आणण्याची घाई झाली आहे. त्यामुळे त्यांनी ७० टक्के जनतेला स्वस्त धान्य उपलब्ध होईल अशा प्रकारची व्यापक सार्वजनिक वितरण व्यवस्था उभी करण्याचा आग्रह धरलेला आहे. परंतु मनमोहनसिग मात्र त्याला अनुकूल नाहीत. कारण देशाची तिजोरी अशाप्रकारे धान्य खरेदी करण्याची ऐपत असणार्यांनना सुद्धा स्वस्तात धान्य देण्याइतपत सक्षम नाही याची त्यांना जाणीव आहे. पक्ष निवडून आला पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण त्यासाठी सरकारी तिजोरीचा खडखडाट करणे परवडणार नाही याबाबत ते दक्ष आहेत.
   

सोनिया गांधी आणि मनमोहनसिग यांच्यातल्या या मतभेदांचा परिणाम अन्न सुरक्षा विधेयकावर झाला असून निवडणुका होऊन दोन वर्षे होत आली तरी जनतेला स्वस्त धान्य मिळण्याची शक्यता अद्याप दृष्टीपथात आलेली नाही. पक्षातल्या या वरिष्ठ पातळीवरच्या गोंधळाचा परिणाम तेलंगणाच्या प्रश्नावरही दिसून येत आहे. गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी गतवर्षी घाईघाईने तेलंगणाची निर्मिती होईल, अशी घोषणा करून टाकली. त्यांची ही घोषणा पक्षाला फार महागात पडलेली आहे आणि त्यामुळे तेलंगण आणि उर्वरित आंध्र प्रदेश अशा दोन्ही भागामध्ये पक्ष संपण्याची भीती निर्माण झाली आहे. एकंदरीत पी. चिदंबरम् यांनी या प्रश्नाचे वाटोळे केलेले आहे असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी या प्रश्नाची सूत्रे आता प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवली आहेत. या प्रकाराने पी. चिदंबरम् यांचा अहंकार दुखावला आहे आणि आपल्या हातून हा प्रश्न सुटण्याची जाणीव होताच त्यांनी प्रणव मुखर्जी यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. काल एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, देशातल्या जनतेवर चलनवाढ नावाचा एक कर लादलेलाच आहे असे कटु उद्गार काढून प्रणव मुखर्जी यांच्याविषयीची आपल्या मनातली कटुता प्रकट केली आहे. तेलंगणाचा प्रश्न त्यांच्या हातून काढून प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवला याचा राग मनात धरूनच चिदंबरम् यांनी हे विधान केलेले आहे. हे या कार्यक्रमात हजर असलेल्या लोकांच्या नजरेतून सुटलेले नाही. यापुढे बोलताना चिदंबरम् यांनी महागाईला प्रणव मुखर्जी यांनाच जबाबदार धरले. देशाचा कारभार सांभाळणार्याद चार मोठ्या नेत्यांमध्ये कसा अंतराय आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे.

Leave a Comment