हैतीवरील संकटांची मालिका

१२ जानेवारी २०१० रोजी हैतीमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हैतीची राजधानी पोर्ट-अ-प्रिन्स आणि त्याच्या आजुबाजुच्या परिसरात हा धक्का जाणवला. हैतीच्या पश्चिम विभागाची या भूकंपामुळे फार मोठी हानी होऊन तेथील २.२ दशलक्ष जनता बेघर झाली. या प्रसंगी तेथील रेड क्रॉस या संघटनेने अडकलेल्या लोकांची सुटका, इस्पितळे, जलशुद्धिकरण, तात्पुरती निवासस्थाने आणि बाहेरील जगाशी संपर्क स्थापन करणे अशी अनेक तातडीची कामे पार पाडली. युरोपियन संघटनेच्या मानवता सहायता केंद्रानेही यात मोलाची मदत केली. भूकंपातील विस्थापितांच्या निवाऱ्याचा प्रश्न अद्यापी सुटला नसल्याने हि जनता अद्यापी केनॉल कडेला असलेल्या तात्पुरत्या तंबूंमध्येच राहते आहे. त्यात एकापाठोपाठ एक हरिकेन वादळे होऊन हैतीला जबरदस्त पावसाने अक्षरशः धुऊन काढले. विस्थापितांनी आजुबाजुला टाकलेल्या कचऱ्यामुळे पाण्याचे सगळे प्रवाह अडवले गेले आहेत. पाण्याच्या लोंढ्याबरोबर हि सगळी घाण आसपासच्या प्रदेशात पसरते आणि त्याच्या दुर्गंधीने लोकांना जगणे नकोसे होते.

अनारोग्यकारी वातावरणात रहावे लागल्याने सबंध हैतीमध्ये कॉलऱ्याची मोठी साथ आली असुन राजधानीभोवतीही या साथीने घट्ट विळखा घातला आहे. दुषित पाणी हे या साथीचे मुख्य कारण. पोटदुखी, उलट्या, जुलाब, हातापायात गोळे येणे अशा लक्षणांनी हैतीमधील लोक हैराण झाले असुन वेळेवर उपचार न मिळाल्यास त्यांना मृत्यू येत आहे. इस्पितळांमध्ये उपचारांसाठी गर्दी झाल्याने रुग्णांना आवारातच तळमळत वाट पहावी लागत असल्याची दृश्ये येथे सतत पहावी लागत आहेत. तात्पुरत्या उभ्या केलेल्या तंबूंमध्येही फारच गर्दी असल्याने रुग्णांना इतरांपासून वेगळे ठेवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे साथ फारच झपाट्याने पसरू लागली आहे. कॉलऱ्याची लक्षणे दिसु लागताच लोकांनी लगेच मीठ-साखर-पाणी हे मिश्रण घेण्यास सुरुवात करावी असे आवाहन हैतीच्या आरोग्य मंत्र्यांनी केले आहे. येथील जनतेत प्रतिकारशक्तीचा अभाव असल्याने साथ लवकर आटोक्यात येण्याची शक्यता कमी असल्याचे मत पैन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रादेशिक संचालक जॉन एनड्र्स यांनी व्यक्त केले.

शौचालयांची पुरेशी सोय नसल्याने साथीच्या या रोगाने सुमारे ५००० रुग्ण आजारी असुन तीनशेहुन अधिकजण मृत्युमुखी पडले आहेत. शुद्ध पाणीपुरवठ्याची कोणतीही सोय नसल्याने येथील जनतेला अरटीबोनाईट नदीचे पाणी प्यावे लागत असुन या पाण्यातच कॉलऱ्याचे जंतू मोठ्या प्रमाणात आहेत. या बिकट प्रसंगाचा सामना करण्यासाठी देशात ठिकठिकाणी तात्पुरते दवाखाने उभे करण्यात आले आहेत. १९९० च्या दशकातही लैटीन अमेरिकेत कॉलऱ्याची फार मोठी साथ आली होती. तिचा फटका सुमारे १ दशलक्ष जनतेला बसला होता तर जवळजवळ ९००० लोक मृत्युमुखी पडले होते. उरुग्वे आणि केरिबियन या देशांमध्ये मात्र त्यावेळेस या रोगाचा प्रसार झाला नव्हता. हैतीमध्येही कित्येक दशकांनंतर या रोगाचा प्रादुर्भाव झाला असुन त्यावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यास बराच कालावधी जावा लागेल.              

Leave a Comment