विराट कोहलीचे दमदार शतक

गोहाटी येथील नेहरू स्टेडियमवर विराट कोहलीने झळकवलेल्या चमकदार शतकी खेळीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या शृंखलेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली तर सामना ४० धावांनी जिंकता आला.
भारताच्या २७७ धावांना तोंड देताना दुखापतग्रस्त न्युझीलंडला अनुभवाची कमतरता जाणवली. कप्तान डेनिअल व्हिक्टोरी आणि तडाखेबंद सलामीचा बैटसमन ब्रेंडन मेक्युलम दोघेही पाठीच्या दुखण्यामुळे खेळू शकले नाहीत. त्यामुळे पाहुण्यांचा खेळ ४५.२ षटकात २३६ धावात आटोपला. न्युझीलंडचा हंगामी कप्तान रॉस टेलरने ६९ चेंडूत झुंजार ६६ धावा जमविल्या. यात प्रत्येकी तीन षटकार आणि चौकार आहेत. १६९-८ अशी धावसंख्या असताना नाथन मेक्युलन (३५ चेंडूत ३५, ४x४) आणि काईल मिल्स (२८ चेंडूत ३२, २x४, २x६) यांनी नवव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. श्रीशांत संतने (३-६७) त्यांची ही भागीदारी संपवली. त्याच्या गोलंदाजीवर कप्तान गंभीरने नाथनचा अवघड झेल टिपला. या सामन्यात युवराज सिंग फलंदाजीत अपयशी ठरला तरी गोलंदाजीत मात्र चमकला (१०-३-४३). ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननेही ५० धावात ३ बळी घेऊन आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
विराट कोहलीच्या १०५ धावांमुळे भारताला ४९ षटकात २७६ ही धावसंख्या ऊभी करता आली. रणजी सामन्यात या दिल्लीच्या खेळाडुने एका पाठोपाठ शतके झळकावली होती. १०४ चेंडूत १० चौकारांच्या सहाय्याने त्याने या धावा जमवल्या. तो बाद झाल्यानंतर मात्र भारतीय संघ फार काळ टिकु शकला नाही. ४४ व्या शतकात २५०/४ अशा स्थितीतील भारत ३०० धावांची मजल गाठू शकेल असे वाटले होते. पण कोहलीनंतर यात फक्त २६ धावांची भर पडली. नविन चेंडू घेऊन गोलंदाजी करताना काईल मिल्स (३-४२) आणि ड्यारील टफी (२-५६) यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
कप्तान आणि सलामीचा फलंदाज यांच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडच्या फलंदाजीची सुरुवात संथ आणि अडखळत झाली. आशिष नेहराने सलामीची जोडी फोडली. हाऊपाठोपाठ गुपटिलही लगेचच पैव्हेलीयनमध्ये परतला. मुरली विजयने दोनदा त्याचा झेल सोडला होता. एका बाजुने युवराजच्या गोलंदाजीवर फलंदाज भराभर बाद होत असताना दुसरी बाजु मात्र हंगामी कर्णधार टेलरने लावुन धरली होती. तिसऱ्या विकेटची त्याची विल्यम्सन (१९) बरोबरची ६७ धावांची भागीदारीही युवराज सिंगनेच थांबवली. टेलरने एका पाठोपाठ उत्तुंग षटकार खेचायला सुरु केल्यावर पाहुणा संघ धोकादायक वाटु लागला होता. मात्र याच वेळी आश्विनने निर्णायक खेळी केली. ३३-३ षटकानंतर न्युझीलंडची धावसंख्या ७ बाद १५४ अशी झाली.

भारताच्या फलंदाजीची सुरुवात प्रथमपासुनच दबावमुक्त  वाटत होती. विजय (२९-३२, ५x४) आणि गंभीर (३८-३८, ६x४) यांची पहिल्या विकेटची भागीदारी होती ४४ धावांची. यष्टीरक्षक गैरेथने उलटे धावत जात विजयचा अवघड झेल टिपला. त्यानंतर आलेल्या कोहलीने गंभीरच्या साथीने ४८ धावा काढल्या. त्यानंतर आलेल्या युवराजने सावध पवित्रा घेतल्याने १० ते १५ या पाच षटकांमध्ये भारताच्या खात्यात फक्त १७ धावा वाढल्या. पहिल्या आठ धावा काढण्यासाठी युवराजला २८ चेंडू खेळावे लागले. दरम्यान कोहलीने एक दिवसीय सामन्यातील नववे अर्धशतक नोंदवले. तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावा जमविताना तो युवराजपुढे अधिक आक्रमक व चपळ वाटत होता. युवराज नंतर आलेला सुरेश रैनाही फार चमक दाखवु शकला नाही. (१३, १x४). १८ चेंडू खेळल्यावर मिल्सने त्याचा बळी घेतला. कोहली बाद झाल्यावर मात्र उर्वरित संघाला २६ धावाच काढता आल्या युसुफ पठाणने २९, वृद्धिमान साहाने ४, रविचंद्रन अश्विनने व आशिष नेहराने ० तर श्रीसंतने १ धाव घेतली. तरीही भारतीय संघाने जमविलेल्या २७६ धावांसाठी न्युझीलंडला फार झुंजावे लागले. या सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि हरभजन सिंग या भारताच्या स्टार खेळाडुंना विश्रांती देण्यात आली आहे.

Leave a Comment