विघटनशील प्लास्टिक

प्लास्टिकच्या विघटनास शकडो वर्षे लागत असल्याने सगळ्या सजीवसृष्टीला त्यापासुन धोका निर्माण झाला आहे. चरणाऱ्या गाईगुरांच्या  पोटात गेल्यास त्यांना विषबाधेचे प्रकारही होतात. प्लास्टिकच्या या राक्षसापासुन समुद्री जीवांचीही सुटका झालेली नाही. शिवाय प्लास्टिकचा पुनर्वापर हि अत्यंत खर्चिक प्रक्रिया असुन त्याचे घटक वेगळे करण्यास ऊर्जाही खुप लागते. अशा प्लास्टिकचे विघटन व्हावे यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. असाच एक प्रयत्न केला आहे अरगॉन नैशनल लेबोरेटरीतील शास्त्रज्ञ विलास पोळ यांनी. त्यांनी टाकाऊ प्लास्टिकचे मिश्रण अणुभट्टीत ७०० अंश से. पर्यंत तापविले. या तपमानाला अणुभट्टीतील दाब खुपच वाढतो व त्यामुळे प्लास्टीक रेणुतील हायड्रोजन व कार्बन यांच्यातील बंध कमकुवत होऊन हायड्रोजन व कार्बन सुटे होतात.

मिश्रणातील हायड्रोजन वायु हवेत मुक्त केला जातो तर कार्बनचे १० मायक्रोमीटर इतके सूक्ष्म कण भट्टीत शिल्लक राहतात. याला काळा कार्बन म्हटले जाते. रंग, वंगण व टायर बनविताना हा कार्बन उपयोगात आणता येतो. या रासायनिक प्रक्रियेत कोणत्याही उत्प्रेरकाची गरज नसल्याने ती फारच किफायतशीर ठरते. या सगळ्या कारणांमुळे या तंत्रज्ञानास नक्कीच उज्वल भवितव्य आहे. पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीतील स्कॉट फिलीप व वांजी सिओ यांनी याहीपुढे जाऊन आपोआप विघटन होऊ शकणारे प्लास्टिक बनविले आहे. सामान्य तापमानाला प्लास्टिक अणूंचा संयोग फ़्लुओराईड आयनांशी झाल्यास त्याचे विघटन होत असल्याचे त्यांनी दाखवुन दिले. अशा प्रकारच्या प्लास्टिकमुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. असे प्लास्टिक प्राण्यांच्या किंवा समुद्री जीवांच्या पोटात गेल्यास प्राण्यांच्या शरीरातील विकारांमुळे प्लास्टिकच्या विघटनास चालना मिळेल व त्याचे आपोआप विघटन होईल. विघटनातुन निर्माण होणाऱ्या पदार्थामुळे पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचावी यासाठी या शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालले आहेत. त्यामुळे प्लास्टिक रेणु अल्डीहाईडपेक्षाही अधिक सुटसुटीत पदार्थात विघटीत व्हावेत असे त्यांना वाटते. सध्या तरी हा प्रयोग प्राथमिक अवस्थेतच आहे.  

Leave a Comment