कोची संघाला दिलासा

वादग्रस्त कोची संघाच्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआयने पुढे ढकलल्यामुळे आयपीएल सामन्यातील कोची संघाने तात्पुरता सुटकेचा निश्वास टाकला. संघातील भागधारकांनी आपल्या गुंतवणुकीचा पैटर्न निश्चित करण्याचे ठरवल्याने हे साध्य होऊ शकले. नागपुर येथे झालेल्या आयपीएल नियामक मंडळाच्या बैठकीत बीसीसीआयने आपला निर्णय आणखी थोडासा लांबवला. आपले अंतर्गत कलह मिटविण्यासाठी बीसीसीआयने कोची संघाला सतत धोशा लावला होता. संघातील भागीदारांनी त्यांच्या स्वामित्वहक्कांची कागदपत्रे सादर केली असुन तज्ञ कायदेपंडीतांकडुन त्यांची छाननी करण्यात येईल असे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले. मुंबईतील बैठकीत याविषयीचा निर्णय जाहीर केला जाईल.

कोची हा आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा संघ असला तरी स्पर्धेतील त्याचे स्थानच धोक्यात आले होते. पण भागीदारांनी आपसात समझोता करण्याचे ठरविल्याने हे टाळता आले. समझोता होण्यापुर्वी मात्र तब्बल १५३ कोटी एवढी प्रचंड रक्कम उभी करणाऱ्या गुंतवणुकदारांनी आपण माघार घेणार असल्याचे बीसीसीआयला कळविले होते. त्यापुर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल्स या संघांनी करारातील अटींचा भंग केल्याने बीसीसीआयने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला होता.

कोची संघात एंकर (anchor) अर्थ, परीनी डेव्हलेपर्स, रोझी ब्ल्यु आणि फिल्म वेव्ह या कंपन्यांचे ७४% एव्हढे भागभांडवल आहे तर उरलेले २६% गायकवाड कुटुंबियांचे आहे. या भागीदारीमुळेच गायकवाड कुटुंबीय व इतर भागधारकांच्यात तंटा उदभवला होता. गायकवाड बंधुंना स्वतंत्र समभाग देण्याविषयी ते नाखुष होते. दोघांमधील हा तंटा मिटल्याने आता मात्र आयपीएल स्पर्धेतील संघाचे स्थान पक्के झाले आहे. विश्वचषक सामन्यानंतर केवळ सहा दिवसांनी सुरु होणाऱ्या या स्पर्धेत ८ संघ भाग घेत असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे.    

Leave a Comment