आंग सान सू की यांची मुक्तता

म्यानमारमधील जुंटा लष्करी शासनाने शनिवारी १२ नोव्हेंबर २०१० रोजी लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांची वीस वर्षांच्या बंदीवासानंतर मुक्तता केली. या वीस वर्षात तेथील लष्करशाहीने काही वेळासाठी त्यांना मोकळे सोडले होते. पण पुन्हा त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. २००२ साली त्यांची सुटका झाली असता त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह पसरला होता व जनताही त्यांना पाठिंबा देत होती. त्यामुळे त्यांना पुन्हा अटक करण्यात आले. जुलै २००९ मध्ये त्यांनी लष्करी न्यायालयासमोर शरणागती पत्करल्यानंतर १४ मे २००९ रोजी त्यांना त्यांच्या राहत्या घरात नजरकैदेत ठेवले गेले. अंतरराष्ट्रिय समुदायाचा सू की यांना भक्कम पाठिंबा असल्याने या समुदायाकडुन त्यांच्या सुटकेसाठी सतत म्यानमारच्या लष्करशाहीवर दबाव येत असे. त्यांचे पिता जनरल आंग सान यांना म्यानमारचे जनक मानले जाते. वीस वर्षांपूर्वी म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकीत सू की यांच्या ‘नेशनल लीग फॉर डेमोक्रसी’ या पक्षाला जनतेने भरघोस मतांनी निवडुन दिले होते. पण त्यांना सत्ता स्थापनेची संधी न देता लष्करी राजवटीने दंडेलशाही करून त्यांना अटक केले. त्यांचे लोकशाहीवादी विचार तेथील लष्करशाहीला मानवण्यासारखे नाहीत. आज त्या ६५ वर्षांच्या आहेत. दोन दशकांनंतर म्यानमारमध्ये पहिल्यांदीच निवडणुका घेण्यात आल्या, पण नजरकैदेत असलेल्या सू की यांना त्यात भाग घेता आला नाही. त्यामुळे युनियन सौलेडेटरी एंड डेव्हलपमेंट पार्टी या तेथील सत्ताधारी पक्षाची विश्वासार्हता धोक्यात आली होती. ही विश्वासार्हता परत मिळविण्यासाठी सू की यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला गेला. सू की यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकाने गौरविण्यातही आले आहे. लोकशाहीसाठी प्रदीर्घ लढा देणाऱ्या नेत्याच्या दर्शनासाठी म्यानमारची जनता खुपच उत्सुक आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेवेळी यंगुन शहरातील त्यांच्या घराभोवती त्यांच्या समर्थकांनी व सर्वसामान्यांनी गर्दी केली होती. त्यापैकी अनेकांनी सू की व त्यांच्या पक्षाच्या विजयघोषणा देणारे शर्टही परिधान केले होते. यावेळी संपुर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून आता त्या आपली पुढील लोकशाहीवादी राजकिय धोरणे ठरविणार आहेत.

सू की यांचे शिक्षण ऑक्सफर्ड येथे झाले. भारत, ब्रिटनसह त्या बरीच वर्षे म्यानमारबाहेर रहात होत्या. वडिलांची हत्या झाल्याने १९८८ मध्ये त्यांनी आपल्या मायभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. वडिलांचा राजकिय वारसा चालवत राजकारणात प्रवेश करताच सर्वप्रथम त्यांनी सरकारला निवडणुका घेणे भाग पाडले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे होणारा धोका ओळखुन सत्ताधारी पक्षाने त्यांची राजकिय कारकीर्द संपवण्याचे ठरविले होते. १९९९ मध्ये कर्करोगग्रस्त पतीलाही त्यांना भेटु दिले नाही. त्यातच त्यांचा अंत झाला. गेल्या कित्येक वर्षात त्यांना कुटुंबियांचे दर्शनही घडलेले नाही. त्यांच्या ऐतिहासिक सुटकेनंतर म्यानमारचे राजकारण कोणते वळण घेते याकडे आता सगळ्या जगाचे डोळे लागले आहेत.                    

Leave a Comment