अफगाणीस्तानमध्ये स्फोटक रसायनांची तस्करी…

अफगाणीस्तानमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बॉम्ब बनविले जात आहेत. त्यात असंख्य अमेरिकी सैनिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अफगाणीस्तानसारख्या युद्धपीडित देशात अमोनियम नायट्रेट या रसायनाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असुन त्याचा वापर करूनच हे गावठी बॉम्ब बनविले जात आहेत. ओबामा प्रशासन हि तस्करी थांबविण्यासाठी जागतिक स्तरावरून प्रयत्न करीत आहे. अफगाणीस्तानच्या हेल्मंड प्रांतात नुकतेच एका शेतकऱ्याच्या घरात अमोनियम नायट्रेटचा मोठा साठा जप्त केला गेला. ही तस्करी थांबविण्यासाठी ‘ऑपरेशन ग्लोबल शिल्ड’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाकिस्तान – अफगाणीस्तानच्या सीमारेषेवर दररोज कित्येक टन अमोनियम नायट्रेट भरलेले ट्रक पकडले जातात. त्यापैकी काही ट्रक अफगाणी सीमारक्षकांची नजर चुकवुन अफगाणीस्तानमध्ये प्रवेशही करतात. ही डोळेझाक अजाणतेपणी होते कि जाणुनबुजुन हे जाणणे महत्वाचे आहे.

अफगाण प्रशासनाने या रसायनाच्या वाहतुकीवर निर्बंध घातले असले तरी पाक प्रशासनाने तसे केलेले नाही. अमोनियम नायट्रेट विशेषतः खत म्हणुन वापरले जात असले तरी पाकिस्तानात या कारणासाठी मोठ्या प्रमाणात युरियाचा वापर होतो. त्यामुळे पाकिस्तानात अमोनियम नायट्रेटचे उत्पादन करणारा केवळ एकच कारखाना आहे. त्यामुळे जर्मनी आणि स्वीडनमधुन पाकिस्तानात या रसायनाची आयात होत असावी अस अंदाज आहे. पोटेशियम क्लोराईडच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. या रसायनांची तस्करी थांबविणे ही एक दीर्घ काळ चालणारी अवघड प्रक्रिया आहे. कारण तस्कर गव्हाच्या पोत्यात अशी रसायने भरून त्यांची छुपी वाहतुक करतात. त्यामुळे सीमेवरून देशात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसुन चौकशी होणे अपेक्षित आहे. हा मुद्दा प्राधान्याने मांडला जावा असे अमेरिकी प्रशासनाला वाटत असले तरी पाकिस्तानी प्रशासनाला मात्र हा मुद्दा तातडीचा वाटत नाही. खरेतर, अनेक पाकिस्तानी सैनिकही या बॉम्बहल्ल्यांमध्ये मारले जात आहेत. त्यामुळे तेथील प्रशासनावर जागतिक स्तरावरून दबाव येण्याची आवश्यकता आहे. जगभरात होणाऱ्या अमोनियम नायट्रेटच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकी प्रशासन इंटरपोल, विश्व सीमाशुल्क संस्था व संयुक्त राष्ट्रसंघ यांची मदत घेणार आहे. खुद्द अमेरिकेतही पूर्वी या रसायनाचा दुरुपयोग झाला होता. १९९५ साली टीमथी मेक्वेग आणि टेरी निकोलस यांनी अमोनियम नायट्रेटमध्ये इंधन तेल मिसळुन स्फोटक मिश्रण तयार केले व त्याचा स्फोट घडवुन आणला. त्यात ओक्लाहोमा शहरातील अल्फ्रेड फेडरेल इमारतीचा विध्वंस होऊन १६८ नागरिकांचा बळी गेला होता. त्यामुळे या स्फोटक रसायनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.               

 

Leave a Comment