प्रवासी विमा कशासाठी?

परदेशवारी हल्ली अनेक कारणांनी अपरिहार्य ठरली आहे. कामासाठी तसेच सहलीसाठी विदेशप्रवासाची वाट चांगलीच रुळली आहे. असेच एक कुटुंब विमानतळावर आपल्या विमान उड्डाणाची वाट पहात थांबले होते. त्यांना जेथे जायचे होते त्या देशात अचानक राजकिय गोंधळ निर्माण झाला आणि तेथे परदेशातील विमाने उतरवण्यावर बंदी घातली गेली. या कुटुंबाचा प्रवास अर्थातच रद्द झाला. अशाचप्रमाणे नैसर्गिक आपत्तींमुळेहि प्रवासात अडथळे येऊ शकतात.

मौल्यवान सामान, पासपोर्ट हरवु शकते किंवा आजारपण येऊ शकते. प्रवासी विमा अशावेळी आपल्या मदतीला धावुन येतो. आपला प्रवास सहीसलामत पार पडेल, कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास बरेचदा फोल ठरू शकतो. कारण संकटे कोणतीही पूर्वसूचना न देताच येतात. त्यामुळे प्रवासी विमा हा परदेशवारीतील महत्वाचा घटक ठरला आहे. यासाठी खर्चही फार येत नाही. चारजणांच्या एका गटाला आठवडाभरासाठी ३ ते ४ हजार रुपयांमध्ये विम्याचे संरक्षण मिळु शकते. रुग्णालयभरती, सहल रद्द होणे, सामान हरविणे, पासपोर्ट गहाळ होणे या कारणांसाठी हे संरक्षण असते.

मात्र विमा खरेदी करण्यापूर्वी काही बाबींची खात्री करून घेणे आवश्यक आहे. विमा संरक्षणात नक्की कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, त्या गोष्टी आपल्यासाठी पुरेशा व समाधानकारक आहेत का, कोणत्या घटकांचा समावेश त्यात झालेला नाही हि माहिती आधीच करून घ्यावी. त्यामुळे शंकेला जागा रहाणार नाही. संकटप्रसंगी आपल्याला किती रकमेची हमी लागेल याचाही विचार आधीच केलेला बरा. त्यानुसार विमा-हप्त्याची रक्कम आकारली जाते. वय, प्रवासाचा कालावधी, हमीची रक्कम, प्रवासाचा देश या सगळ्यांचा विचार करून विम्याची रक्कम ठरविली जाते. अशा विम्यामुळे आर्थिक हमीबरोबरच मानसिक शांतताही लाभते. आपण प्रवासाचा निर्भेळ आनंद लुटू शकतो. म्हणजेच प्रवासाला निघण्यापूर्वी  आणखी एक छोटासा खर्च करायला आपण मागेपुढे पाहणार नाही…  

Leave a Comment