विम्याची आवश्यकता आणि फायदे

दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी नुकसान होण्याची जोखीम उचलावी लागते. अशा जोखमीचे व्यवस्थापन म्हणजेच विमा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येथे आपण भरत असलेल्या विमा हप्त्याच्या बदल्यात आपल्या नुकसानाची भरपाई केली जाते. आपल्याला किती रकमेवर नुकसानभरपाई लागणार आहे त्यावरून त्या रकमेचा वार्षिक हप्ता ठरतो. अपघात, त्यातुन येणारे अपंगत्व अथवा दुर्दैवी मृत्यू, शिवाय आग, पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती यामुळे व्यक्तिगत तसेच व्यावसायिक हानी होऊ शकते. विम्याचे संरक्षण अशा संकटातुन तरून जाण्यासाठी बहुमूल्य सहकार्य करते.

आपली जीवनशैली, उद्दिष्टे, कर्जे आणि आपल्या उत्पन्नाचा स्रोत यांचा अभ्यास करून त्यानुसार आपल्या विम्याची रक्कम व त्याचा प्रकार निश्चित करावा. एजंट, विमा कंपन्या, बँका यांच्याकडुन किंवा ऑनलाईन पद्धतीनेही आपण विम्याची पॉलिसी खरेदी करू शकतो. जीवनविमा, वाहनविमा, व्यवसायविमा, गृहविमा, आरोग्यविमा, अशा जीवनाच्या सर्व अंगांचा समावेश असणाऱ्या विमायोजना मात्र बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आणिबाणीच्या परिस्थितीत करून घेता येतो. ही परिस्थिती कधीच सांगुन येत नसल्याने तिला तोंड देण्यासाठी सदैव सज्ज असावे लागते. मुलांच्या भावी शिक्षणासाठी शिक्षणविमा उपयोगी पडतो. या सर्व बाबींचा विचार करून त्यानुसार धोरण आखुन विम्याचा हप्ता भरत राहिल्यास भवितव्याविषयी निश्चिंत राहता येते.  

विमा-पौलीसींची ऑनलाईन खरेदी हल्ली फारच लोकप्रिय झाली आहे. विमा एजंटना गाठुन त्यांच्याशी चर्चा करण्याचा पर्याय म्हणुन लोक असे अव्यक्तिगत मार्ग चोखाळु लागल्याचे दिसते. इंटरनेटच्या माध्यमातुनही या क्षेत्रातील अनेक संधी व सर्वोत्तम व्यवहार होऊ शकतात हे ग्राहकांना पटले आहे. यामुळे त्यांचा किमती वेळ व पैसा यांची लक्षणीय बचत होते. या माध्यमातुन अनेक विख्यात विमा कंपन्यांशी व्यवहार करता येतो, त्याचबरोबर बाजारात उपलब्ध असलेल्या पौलीसींची माहितीही करून घेता येते. तेव्हा इतरांप्रमाणेच आपणही या पर्यायाचा विचार करू शकतो. मात्र कोणताही पर्याय निवडुन विमा उतरवणे अनिवार्य आहे हे नक्की!  

Leave a Comment