भारताचे वाढते क्रिडा-कौशल्य

कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये सर्वोच्च नैपुण्य दाखवल्यानंतर महिन्याभराने आशियाई क्रिडांमध्येही भारताने आपले कौशल्य सिद्ध केले. चीनमधील ग्वांझु येथे पार पडलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताने सहावा क्रमांक पटकावला. यावेळी भारताने १४ सुवर्ण, १८ रौप्य तर ३३ ब्राँझपदके मिळविली. या स्पर्धेत चीनने १९९ सुवर्ण, ११९ रौप्य आणि ९८ ब्राँझपदके (एकुण ४१६) मिळवली. त्यापाठोपाठ द. कोरिया (७६-६५-९१) आणि जपान (४८-७४-९४) यांचा क्रमांक लागला.

१९८२ साली नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने १३ सुवर्ण, १९ रौप्य आणि २५ ब्राँझ अशी एकुण ५७ पदके मिळवली होती. दोहा येथे झालेल्या क्रीडास्पर्धेत १०-१७-२६ अशी पदके मिळवताना भारत दहाव्या स्थानावर होता. १९८६ सालच्या सेऊल आशियाई स्पर्धेत भारताच्या पदरात ५-९-२३ अशी पदके होती. म्हणजेच यावर्षीच्या ग्वांझु क्रीडास्पर्धेत भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी दिसली आहे. २५ वर्षांपुर्वीच्या स्पर्धांमध्ये कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि पूर्व सोव्हिएत संघांचे खेळाडु नसल्याने त्या स्पर्धा फार अटितटीच्या नव्हत्या. कारण कझाकस्तानने ग्वांझु स्पर्धांमध्ये पाचवा क्रमांक मिळवुन भारताला पदकसंख्येत मागे टाकले आहे.

१९५१ मध्ये नवी दिल्ली येथे पहिल्यावहिल्या आशियाई क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या. त्यावेळी त्यात ११ देशांचा सहभाग होता तर ग्वांझुमधील १६ व्या स्पर्धांमध्ये ४५ देश सहभागी झाले होते. पहिल्या स्पर्धांमध्ये भारताने १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २० ब्राँझ पदकांसह दुसरा क्रमांक पटकावला होता. गेल्या पाच वर्षांच्या आशियाई स्पर्धांचा इतिहास पाहता भारत प्रगतीपथावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १९९४ हिरोशिमा स्पर्धा (४-३-१५; एकुण २२), १९९८ बँकॉक स्पर्धा (७-११-१७; एकुण ३५), २००२ बुसान स्पर्धा (१०-१२-१३, एकुण ३५), २००६ दोहा स्पर्धा (१०-१७-२६; एकुण ५३) आणि ग्वांझु स्पर्धा (१४-१८-३३, एकुण ६५) असा भारताच्या प्रगतीचा आलेख आहे. नवी दिल्ली येथील कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये (३९-२६-३६), एकुण १०१ पदके कमावीत भारताने इंग्लंड आणि कैनडावरही मात केली होती.

ग्वांझु येथील १४ सुवर्णपदकांमध्ये ५ एथलेटिक्स; बॉक्सिंग, कबड्डी व टेनिसमध्ये दोन तर शुटींग, क्यू स्पोर्ट्स आणि शेइंगमध्ये प्रत्येकी एक अशा पदकांचा समावेश आहे. म्हणजेच याही वेळेस सुवर्णपदकांमध्ये एथलेटिक्स खेळाडुंचा सिंहाचा वाटा आहे. यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये भारताने ८ व्या क्रमांकापेक्षा वरचे स्थान कधीच मिळवले नव्हते. २० वर्षांपूर्वीच्या बीजिंग आशियाई स्पर्धांमध्ये भारताला बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. क्रीडाक्षेत्रात भारत असाच प्रगतीपथावर राहो हिच सगळ्या देशवासीयांची इच्छा आहे.    

Leave a Comment