देशभक्त अझीम प्रेमजी

देशातील आघाडीचे उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी देशाच्या विकासासाठी तब्बल २०० कोटी डॉलर्सची देणगी जाहीर केली आहे. या समाजानेच आपल्याला सर्व काही दिले असून आपण समाजाचे देणे लागतो. त्याची काही अंशी तरी उतराई व्हावी या भावनेने त्यांनी ही देणगी जाहीर केली आहे. उद्योजकांनी देशासाठी नेमके काय केले पाहिजे याचे उदाहरणच त्यांनी घालुन दिले आहे. एपी फाऊंडेशनच्या निधीत ही रक्कम जमा होणार आहे. अझीम प्रेमजी यांच्या विविध कंपन्यांमध्ये असलेल्या भागभांडवलाचा विशिष्ट हिस्सा एकत्रित करून हा निधी उभा केला जाईल. उत्तराखंड, कर्नाटक, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये एपी फाऊंडेशनने शाळा सुरु केल्या आहेत. त्यामधुन प्रामुख्याने वंचितांना शिक्षण पुरविले जाते. देशाच्या प्रगतीचा मार्ग शिक्षणाच्या वाटेनेच जातो व यातूनच मजबुत समाज निर्माण होतो. असा सुशिक्षित समाज हेच देशाचे खरे भवितव्य!

बिल गेटससारख्या बुद्धिवंत अब्जाधिशाने अशाच प्रकारची देणगी देताना जगातील अतिश्रीमंत व्यक्तींनी सामाजिक देणग्या द्याव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ अझीम प्रेमजी यांनी हा सुखद धक्का दिला आहे. साबणापासुन ते सौफ्टवेअरपर्यंत अनेक वस्तुंचे उत्पादन घेणाऱ्या विप्रो कंपनीचे ते प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यांच्या एकुण संपत्तीपैकी सुमारे ८.७% हिस्सा ते दान देणार आहेत. एपी फाऊंडेशन एका विद्यापिठाचीही स्थापना करणार असुन त्यासाठी २५० ते ३०० कोटी रुपयांची गरज लागणार आहे. या विद्यापिठातुनही समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातील. २००१ साली एपी फाऊंडेशनची स्थापना होऊन त्याद्वारे इतर राज्यातील सरकारच्या सहाय्याने अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. फाऊंडेशनच्या २५,००० हुन अधिक शाळांमधुन अडीच कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अझीम प्रेमजी यांचा कित्ता गिरवुन देशातील अनेक उद्योगपतींनी, अब्जाधिशांनी देशाची भावी पिढी सुसंस्कारित बनविण्याचे ठरविल्यास आपल्याला उज्वल भवितव्याचे स्वप्न पाहण्यास काहीच हरकत नाही.

Leave a Comment