वित्त-योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी…

आयुष्याचा तोल सावरायचा, तर बचत करून योग्य जागी तिची गुंतवणुक करण्याला काही पर्याय नाही. यामुळे आपल्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन भवितव्याविषयीची निश्चिंतता येते. या जाणिवेतुनच आजचे जीवनही सुखमय होऊन जाते. नोकरी-व्यवसायाच्या सुरुवातीपासुनच हल्ली प्रत्येकाला हा बचत-गुंतवणुकीचा मंत्र पटला आहे. आता प्रश्न असा उदभवतो, केलेली बचत गुंतवायची कुठे?स्टाक मार्केटचे, बँकींगचे, बाजारपेठीय परिस्थितीचे अवलोकन व विश्लेषण करून योग्य निर्णय घेणे प्रत्येकाला जमेलच असे नाही. अशावेळी वित्तीय व्यवस्थापन करणाऱ्या व्यावसायीकाची मदत घेणे इष्ट ठरते. संपुर्ण वित्त-स्थितीचे निरीक्षण, संशोधन करण्याची क्षमता ते बाळगतात. कुठे, कशी गुंतवणुक केल्यास ग्राहकांचा लाभ होईल याचे अचूक आडाखे ते बांधु शकतात. जबाबदारी त्यांच्यावर सोपवुन आपल्याला निश्चिंतपणे राहता येते. योग्य वित्त-सल्लागार शोधण्याची किमया मात्र त्यासाठी साधायला हवी. पुढे सांगीतलेला होमवर्क करून आपण असा सल्लागार गाठु शकतो :

  • सल्लागाराकडुन असणाऱ्या अपेक्षा : आपल्याला नेमका कोणत्या बाबतीत सल्ला हवा आहे हे ओळखा. संपूर्ण जीवनभरासाठी योजना आखायची आहे, किंवा सेवानिवृत्तीसाठी; मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या विवाहासाठी, व्यवसाय वृद्धीसाठी हे एकदा ठरविले की पुढचे काम सोपे होते. या प्रत्येक स्वतंत्र विषयावर सल्ला देणारे तज्ञ हल्ली सहजी उपलब्ध होतात. काहीजण एकापेक्षा अधिक किंवा एकंदरीतच सगळ्या योजनांविषयी मार्गदर्शन करू शकतात.
  • मित्रमंडळींशी, संबंधितांशी, चर्चा करा : इतरांनी वित्तीय मार्गदर्शक शोधला असल्यास, त्याच्या कामगिरीविषयी ते समाधानी आहेत का हे जाणून घ्या. त्याच्यातील त्रुटी समजावुन घेऊन आपल्या अपेक्षांमध्ये तो चपखल बसतो का हे पहा. तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन होईपर्यंत हा शोध सुरु राहु दे.
  • प्रत्यक्ष मार्गदर्शकाशी चर्चा : एखादा वित्तीय सल्लागार योग्य वाटल्यावर पुर्वनियोजीत वेळेनुसार त्याची गाठ घ्या. वेळ ठरवुन गेल्यामुळे तो तुम्हाला पुरेसा वेळ देऊ शकेल. तुमच्या आवश्यकता जाणुन त्याला अनुसरून योग्य दिशादर्शन करू शकेल. शिवाय आपला अपेक्षित परिणाम समोरच्या व्यक्तीकडुन साधला जाईल का याचा अंदाजही तुम्हाला घेता येईल.
  • मार्गदर्शकाला माहिती पुरवा : आपली आर्थिक स्थिती, बचतीची कुवत, अपेक्षित परिणाम यांची माहिती नेमक्या शब्दात पुरविल्यास योग्य सल्ला मिळण्याची शक्यता दुणावते. तेव्हा त्याला मोकळेपणाने संबंधीत माहिती पुरवा. व्यवसायसंबंधीत सल्ला हवा असल्यास माहिती देताना अधिक सावधगिरी, काटेकोरपणा बाळगा. असे करताना आपली गोपनीय माहिती फुटणार नाही याची दक्षता घ्यायला मात्र विसरू नका.
  • मार्गदर्शकाच्या मोबदल्याविषयी जाणुन घ्या : आर्थिक सल्लागारांची फी-आकारणीची पद्धत वेगवेगळी असते. काही सल्लागार दिलेल्या सल्ल्याची फी तात्काळ वसुल करतात, तर काहीजण विशिष्ट कालावधीनंतर. त्यांचे मार्गदर्शन दीर्घ कालावधीसाठी हवे आहे की थोडक्या काळासाठी यावरून ते ठरते. याउलट, काही मार्गदर्शक कमीशन बेसीसवर असा सल्ला देतात. स्टाकमार्केट संबंधीत खरेदी-विक्रीतील नियत हिस्सा त्यांच्याकडे जातो. काही व्यावसायीक वर्षभर ग्राहकांच्या संपर्कात राहुन वेळोवेळी त्यांना सुचना देतात. साधरणपणे वर्षभरात ग्राहकांनी किती किमतीची गुंतवणुक केली हे पाहुन त्यानुसार ते कमीशन वसुल करतात.

चार्टर्ड अकौउंटन्ट किंवा वित्तीय विश्लेषक अशा प्रकारचा सल्ला देऊन मार्गदर्शन करण्यासाठी उचीत समजले जातात. तेव्हा आपल्या गरजा आणि अचुक मार्गदर्शक यांचा यथोचीत मिलाफ साधुन आपल्या आर्थिक योजना प्रत्यक्षात आणा.

Leave a Comment