गुंतवणुक करताना कोणती खबरदारी घ्याल?

कोणतेही वर्तमानपत्र उघडा किंवा टेलीव्हीजन  सुरु करा, शेअर बाजारातील उलाढालींची माहिती हमखास मिळते.स्टोक मार्केट, वेगवेगळ्या शेअर्सचे मूल्य यांचे ताजे विष्लेषणही सातत्याने पहावयास, ऐकावयास मिळते. पण हा तज्ञांनी दिलेला सल्ला सगळ्यांनाच सारखाच लागु पडेल असे नाही. त्यामुळे अशी गुंतवणुक करताना फारच सावधानता बाळगावी लागते.अशा वेळेस कोणती खबरदारी घ्यावी?

* ऐकीव माहितीवर विसंबु नका : अमुक एक शेअर खरेदी करा, तमुक एक शेअर विकुन टाका असे सल्ले नेहेमी खात्रीशीर असतीलच असे नाही. चुकीच्या शेअर्सची खरेदी केल्यानंतर पुष्कळदा पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. योग्य विष्लेषण करून मगच शेअर्सची खरेदी करावी.

* शेअर्स आणि त्यांचे मूल्य : ज्या समभागांचे मूल्य कमी आहे ते शेअर्स चटकन खरेदी करून टाकावेत आणि अधिक मूल्याच्या शेअर्सची खरेदी टाळावी अशी अनेकांची सर्वसाधारण धारणा असते. वास्तविक या दोन्ही बाबतीत, टक्केवारी पहिली असता नफा-तोट्याचे गणित दोन्ही बाबतीत तेच असल्याचे दिसुन येते. ते शेअर्स कोणत्या कंपनीचे आहेत यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे संभाव्य भवितव्य निरनिराळे असते. म्हणजेच उच्च किमतीचे शेअर्स असणाऱ्या कंपनीची ऊलाढाल चांगली असल्यास निर्धोकपणे त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा.

* अनावश्यक शेअर्स वेळच्या वेळी विकुन टाका : ज्या  स्टाक भवितव्य फारसे आशादायक नाही असे शेअर्स बाळगण्यात काहीच शहाणपण नाही. त्यांची विक्री केल्यास टक्स भरावा लागेल ही एक गैरसमजूत आहे. बऱ्याच शेअर्सची खरेदी विक्री टक्समधुन वगळलेली असल्याने जे शेअर्स लाभदायक नसतील त्यांची विक्री करून टाकावी.

* क्षणिक घडामोडींनी विचलित होऊ नका : स्टाक मार्केटमध्ये कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते; कारण काहीही असो. बऱ्याच विचाराअंती दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी केलेले शेअर्स, त्यांची किंमत वाढली असता अचानकपणे विकुन टाकले जातात. दिवसाच्या अखेरीस एखाद्या शेअरची किंमत कमी झाल्याचे दिसल्यासही ते विकण्याकडे अनेकांचा कल असतो. विशेषतः जे स्क्रीनकडे दिवसभर डोळे लावुन असतात अशांच्या बाबतीत हे घडताना दिसते. अशाने  उत्तम कामगिरी करणारा स्टाक गुंतवणुकदारांच्या पोर्टफोलिओतून गायब होतो, आणि विनाकारण काही स्टाक तेथील जागा अडवून बसतात.

* संयम बाळगा : संयम, सातत्य आणि आवड ही गुंतवणुकीतील यशाची त्रिसुत्री आहे. अर्थात, प्रत्येकाला हे जमेलच असे नाही. यात, उपलब्ध वेळेपैकी ९०% वेळ विश्लेषणात खर्च करावा लागतो. प्रत्यक्ष खरेदीचे काम १०% वेळेत आटोपते.आपल्याला हे जमण्यासारखे नसल्यास पोर्टफोलिओ मनेजरची मदत घेण्यास काहीच हरकत नाही.

* अनुकरण टाळा : जाहिरातबाजीला भुलुन शेअर्सची खरेदी करणे कटाक्षाने टाळावे. या विषयातील तज्ञ आपले अनेक वर्षांचे ज्ञान, अनुभव पणाला लावुन त्यातून निर्णय घेतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालल्यास नुकसान होण्याची शक्यता कमी होते.

Leave a Comment