३ जी मोबाईल इंटरनेटकडुन माउंट एव्हरेस्ट सर

१९५३ साली सर एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट शिखराला पहिलावहिला मानवी स्पर्श केला त्यावेळी त्यांच्या मनात भावनांचा काय कल्लोळ ऊडाला असेल? अख्ख्या जगाला ही घटना ओरडुन सांगाविशी वाटली असेल का त्यांना? समजा, ते त्यावेळी आनंदातिशयाने चित्कारले असतील, तरी त्यांचा तो विजयी स्वर कोणाच्या कानी पडलाच? शक्यच नाही; कारण त्यांना ही बातमी जगापर्यंत पोहोचवण्यासाठी एव्हरेस्टपासुन बऱ्याच अंतरावर असलेल्या पोस्ट ऑफीसपर्यंत आपल्या दुतांना पाठवावे लागले होते. सध्या मात्र तेथे जाणाऱ्या पर्यटकांना सैटेलाईट फोनवरून जगाशी संपर्क साधता येतो. एनसेल ही नेपाळमधील मोबईल नेटवर्क ऑपरेट करणारी कंपनी. या कंपनीने खुम्बु खोऱ्यात ५,२०० मीटर उंचीवर ३ जी स्टेशन ऊभे करून एव्हरेस्ट शिखरावर शिक्कामोर्तब केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या नवीन स्टेशनची चाचणी घेण्यासाठी कंपनीमार्फत १७,३८८ फुट उंचीवरून जगातील सर्वाधिक उंचीवरील व्हीडीओ कॉलही केला गेला, आणि नेपाळी जनता हर्षोत्फुल्ल झाली. ?

नेपाळमधील सोलुखुम्बु जिल्ह्यातील माउंट एव्हरेस्ट प्रवेशाला दरवर्षी अक्षरशः हजारो हौशी पर्यटक, गिर्यारोहक, ट्रेकर्स भेट देतात. माउंट एव्हरेस्टची चढण सुरु होते त्या बेसकौंपवरच एनसेलने आपले ३ जी स्टेशन नव्याने सुरु केले आहे. येथे येणाऱ्या सगळ्यांनाच सैटेलाईट फोनचा वापर परवडण्याजोगा नसल्याने जगाशी त्यांचा काहीच संपर्क होत नसे, पर्यायाने त्यांना काही वेळेस असुविधाजनक परिस्थितीचा सामना करावा लागे. संपर्कच नसल्याने कोणाकडुन मदतीची काही अपेक्षाही ठेवता येत नसे. आता मात्र त्यांना तुलनेने स्वस्त दरात मित्रांशी, कुटुंबियांशी संवाद साधता येणार आहे. येथे त्यांना इंटरनेट सुविधा मिळणार असल्याने ते इ-मेल पाठवु शकणार आहेत; व्हिडीओ कॉलही करू शकणार आहेत.

नेपाळ म्हणजे दक्षिण आशियातील सगळ्यात गरीब देशांपैकी एक! त्यापैकी एक तृतीयांश जनताही दूरसंचार सेवेचा लाभ घेऊ शकत नाही. एनसेलने मात्र १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणुक करून हिमालयाच्या कुशीतील या राष्ट्राच्या सुमारे ९०% लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे.

इंटरनैशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने सदर मोबाईल सेवेच्या संशोधन विकासास १९९२ साली सुरुवात केली. त्यासाठीच्या योजना आखुन मानकेही निश्चित केली. या मोबाईल सेवेद्वारे लोकांना व्हाईस टेलीफोन, मोबाईल इंटरनेट सुविधा, व्हिडीओ कॉल त्याचप्रमाणे मोबाईल टीव्ही या सगळ्या सोयी एकाच उपकरणाद्वारे मिळाव्यात अशी ही योजना… ती आता प्रत्यक्षात उतरली आहे.

१९८१-८२ साली सेलफोनची पहिली पिढी अस्तित्वात आली. त्यानंतर दर दहा वर्षांनी या फिरत्या सुविधेची प्रमाणे बदलत गेली, यशाचे नवनविन टप्पे काबीज करत गेली. २०११-२०१३ या काळात सेल्युलर सुविधेची चौथी पिढी अपेक्षित आहे.

युरोपात २००३ सालच्या मार्चमध्येच ३ जी सेवेची सुरुवात झाली. २००५ साली तेथील सुमारे ८०% जनता तिचा लाभ घेत होती. कैनडामध्ये २००५ साली बेल मोबिलिटी, सास्कटेल व टेलस या कंपन्यांनी एकत्रितपणे ३ जी टेलिकम्युनिकेशनचे जाळे ऊभे केले. आयर्लंडमध्ये २००८ साली सुरु झालेली ही सेवा तेथील लोकांनी त्यात रुची न दाखवल्याने गुंडाळावी लागली. अझेरबाईजानमध्ये अझेरफौन एलएलसी कंपनीने डिसेंबर २००९ मध्ये ही सुविधा जनतेस उपलब्ध करून दिली. इराकमध्ये फेब्रुवारी २००७ मध्ये मोबीटेल इराकने तर सिरियामध्ये मे २०१० साली एमटीएन  सिरियाने ३ जी स्टेशनची उभारणी केली. चिती सरकारने चायना मोबाईल, चायना युनिकॉम व चायना टेलिकॉम या तीन कंपन्यांना ३ जी स्टेशन्स सुरु करण्याचा परवाना दिल्याने, चीनमध्ये १ ऑक्टोबर २००९ रोजी ही सुविधा उपलब्ध झाली. योगायोगाने चीनच्या सार्वभौम सत्तेचा हा ६० वा वर्धापनदिन होता! उत्तर कोरियात २००८ सालापासुन ओरसकॉम  टेलिकॉम होल्डींग ही इजिप्शीयन कंपनी व कोरिया पोस्ट एंड टेलिकम्युनिकेशन कार्पोरेशन ही कोरियन कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ३ जी सेवा सुरु झाली. नोव्हेंबर २००४ मध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे पहिला व्हिडीओ कॉल केला गेला. त्यापाठोपाठ २००४ मध्येच मौरीशस येथे, तर २००६ च्या मार्चमध्ये मोरोक्कोमध्ये अशी स्टेशन्स उभी राहिली. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथेही २००७ साली व्होडाकॉम टांझानियाने ३ जी स्टेशन सुरु केले.

भारतात, सर्वप्रथम ३ जी क्षेत्रात पदार्पण करण्याचा मान बीएसएनएल या कंपनीने पटकावला. २००८ साली बिहारमध्ये ही सोय उपलब्ध करून दिली गेली. त्यानंतर एमटीएनएलने मुंबई व दिल्ली येथे अशी स्टेशन्स सुरु केली. ४ ऑगस्ट २००८ साली भारत सरकारने ३ जी धोरण जाहीर केल्यावर, ही सेवा पुरविण्यास सक्षम असणारे हैंडसेट्स बनविण्यासाठी अनेक कंपन्यांची झुंबड उडाली. नोकिया, ब्लैकबेरी, एल जी, सैमसंग, एचटीसी, सोनी एरिक्सन ही त्यापैकी ठळक नावे.. देशभरात ३ जी सुविधेचे जाळे उभारण्यासाठी ९ एप्रिल २०१० रोजी भारत सरकारने लिलाव पुकारला होता. ३४ दिवस चाललेल्या या लिलावात तब्बल १८३ फेऱ्या पार पडल्या. या लिलावातून सरकारला सुमारे ५० कोटींचा महसूल मिळाला. या लिलावासाठी देशाचे २२ निरनिराळे विभाग घोषीत करण्यात आले होते. एमटीएनएल व बीएसएनएल ही शासकीय महामंडळे ३ जी सुविधेचा अविभाज्य हिस्सा आहेत. याशिवाय भारती एअरटेल, एयरसेल, आयडिया सेल्युलर, रिलायन्स कम्युनिकेशन्स, एस टेल,  टाटा टेलिसर्व्हिसेस, व्होडाफोन एस्सार या कंपन्यांनीही लिलावात बोली लावली होती. यावेळी दिल्ली विभागासाठी सर्वाधिक किमतीची बोली लागली, तर त्यापाठोपाठ मुंबई विभागासाठी. दिल्ली, मुंबई, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्र प्रदेश या विभागांसाठी एकूण रकमेपैकी ७०% रकमेचा लिलाव झाला. यंदाच्या झगमगत्या दिपोत्सवाच्या उत्सवी वातावरणात भारतातील निवडक शहरांमध्ये टाटा डोकोमोकडून ३ जी सुविधा सुरु होते आहे. जानेवारी २०११ पर्यंत एअरटेल व व्होडाफोनकडूनही या सुविधेचा श्रीगणेशा अपेक्षित आहे.

Leave a Comment