सेवानिवृत्तीनंतरची तरतुद

व्यवसायात, नोकरीधंद्यात पदार्पण करण्याची आस उमेदीच्या काळात प्रत्येकजण बाळगतो. एकदा असे पदार्पण केले की त्याला त्यात स्थिरावयाचे असते. लग्न, संसार, मुलेबाळे या चक्रात अडकल्यावर अचानक एके दिवशी केसात रुपेरी चमक दिसु लागते, आणि आपण दचकुन जातो. अरे! बघता बघता चाळीशी ओलांडली की! मग सुरु होतो, आपण आणखी किती दिवस याच दुष्टचक्रात फिरत राहणार याचा हिशेब. निवृत्तीनंतर हीच जीवनशैली जपायला जमेल का, हा विचारही डोके पोखरू लागतो. मित्रहो, समजा तुम्हाला म्हटल, कारीयरच्या पहिल्या दिवसापासुनच निवृत्तीनंतरच्या जीवनाचा विचार करा; तर आवडेल तुम्हाला? बहुधा नाहीच! पण थोडासा विचार करून बघा, निवृत्तीनंतरचे जीवन सुखावह करायचे असेल तर ही योजना कशी अपरिहार्य आहे हे पटेल तुम्हाला… निवृत्तीनंतरचे धोरण आखताना, सर्वप्रथम आपण दरमहा किती बचत करू शकतो हे पाहणे महत्त्वाचे. येथे, आपले आवश्यक खर्च कोणते, अनावश्यक, फाजील खर्च कोणते, याचे आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे. येथे हातात छोटीशी कुऱ्हाड घेऊन बसणेच इष्ट – अनावश्यक खर्च ताबडतोब छाटून टाकण्यासाठी! यानंतर भवितव्यात दरमहा किती खर्च होईल हे पहावे लागेल. दरवर्षी ७-८% नी महागाई वाढणार हे निश्चित. त्यामुळे हा वाढीव खर्च विचारात घेतला पाहिजे. शिवाय, मुलांची शिक्षणे, त्यांचे विवाह असा खर्चही समाविष्ट होणारच. त्याचीही दखल घेणे योग्य. प्रौढ वयात आजारपणात, औषधपाण्यावरही अधिक खर्च करावा लागेल…

हा सगळा जमाखर्च जितक्या लहान वयात सुरु कराल तितके चांगले. वयाच्या तिशीतच याला सुरुवात केलीत तर योजना ठरविण्यासाठी चक्क तीस वर्षे हाताशी मिळतील. निवृत्तीचे वय ठरविणेही आपल्याच हातात आहे. आपल्याला विशिष्ट वयानंतर नोकरी-व्यवसायात बदल करायचा आहे का, त्यासाठीची जोखीम आपण निभावु शकु का याचा सारीपाटच यातुन नजरेसमोर उभा राहु शकेल. त्यानुसार आवश्यक ती बचत व गुंतवणुक करण्याची सुरुवात अगोदरपासुनच करता येईल.

ही सगळी बचत एकगठठा न करता, तिची विभागणी करणे अधिक संयुक्तिक ठरेल. मुलांचे शिक्षण, आरोग्य, विवाह, प्रासंगिक खर्च अशी विभागणी करून ठराविक काळाने प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्रपणे बचत करावी. एका कारणासाठी केलेली बचत दुसऱ्याच कारणासाठी वापरली जाणे यामुळे टाळता येईल.

ही सगळी बचत योग्य ठिकाणी गुंतवण्यात खरी मेख आहे. बँकेच्या विविध योजनांमधून मिळणारा परतावा ८ ते ९% असेल, तर शेअर बाजारातुन मिळणारा परतावा गुंतवणुकीच्या १२-१५% असेल असे गृहीत धरण्यास हरकत नाही. अनेक अर्थतज्ञांनी ही सरासरी शोधुन काढली आहे. यापेक्षा अधिक लाभ मिळाला तर उत्तमच आहे, न मिळाल्यास हताश होण्याचे कारण नाही. तात्पर्य काय, तर गुंतवणुकीपासुन मिळणाऱ्या लाभांची अपेक्षा वास्तववादी असावी.

आपली पुंजी कुठे गुंतवावी यासाठी काही निश्चित नियम सांगता येणार नाही. हाताशी असलेली सेवानिवृत्ती आधीची वर्षे व जोखीम घेण्याची तयारी यांचा यात महत्त्वाचा सहभाग असतो. इक्विटी बॉण्ड आणि डेट बॉण्ड यात योग्य ताळमेळ राखणे आदर्श ठरते. इक्विटी बॉण्डमधील गुंतवणुक अधिक सुरक्षित मानली जाते. शेअरमार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणुक कमी हानीकारक ठरते. दीर्घकालीन गुंतवणुक करण्याची इच्छा नसल्यास मात्र शेअरबाजाराची वाट टाळलेलीच बरी! बलन्स फंड, डेट बॉण्ड, फिक्स मच्युरिटी प्लान या सगळ्यांची माहिती करून घेऊन त्यांच्यातील गुंतवणुकीचा योग्य समन्वय साधता येतो.

गुंतवणुकीसाठी केवळ शेअरबाजार किंवा म्युच्युअल फंड यांचाच मार्ग चोखाळावा असे अजिबातच नाही. ‘डू नॉट पुट ऑल एग्ज इन वन बास्केट’ ही म्हण सतत लक्षात ठेवावी. त्यामुळे येथे शेअर, बॉण्ड, घर, जमिनजुमला, दागदागीने या सगळ्यात योग्य गुंतवणुक करणे फायदेशीर ठरते. ही विभागणी वय, जोखीमक्षमता, आर्थिक उद्दिष्टे आणि बाजारपेठेची स्थिती यावरून निश्चित करता येते. यामुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी होते. वेळोवेळी या सगळ्या गुंतवणुक पर्यायांचा आढावा घेतल्यास आपण नक्की कोणत्या आर्थिक स्थितीत आहोत याचा अचूक अंदाज घेता येतो.

अधिक जोखीम उचलण्यासारखी परिस्थिती असल्यास शेअरबाजारात जास्त गुंतवणुक तर बॉण्डमध्ये कमी गुंतवणुक चालण्यासारखे आहे. वय वाढेल तसे इक्विटी आणि डेटमध्ये समतोल राखणे सुरु करावे. प्रौढ वयात जोखीमक्षमता उणावल्याने इक्विटी बॉण्डपेक्षा डेट बॉण्डमध्ये गुंतवणुक करणे इष्ट. सोन्याच्या खरेदीत केलेली गुंतवणुक सदासर्वदा फायदेशीर ठरते. महागाई कितीही वाढली तरी तिचा फटका या गुंतवणुकीला कधीही बसत नाही.

भाड्याच्या घरात राहत असल्यास, दरमहा भाड्यापोटी आपल्याला बरीच रक्कम चुकवावी लागते. शक्य झाल्यास करीयरच्या भरभराटीच्या काळात आपले हक्काचे घरकुल खरेदी करावे. दरमहाच्या हपत्यातून हे कर्ज निवृत्ती घेण्यापूर्वी फिटु शकते. हल्ली तर बहुतांश सगळ्या बँका, वित्तसंस्था गृहकर्ज देण्यास उत्सुक आहेत, याचा फायदा अवश्य घ्यावा. कारसाठी, व्यक्तिगत कारणासाठी कर्ज घेतल्यास ही कर्जेही सेवानिवृत्तीपुर्वी फिटतील हे आवर्जुन पहावे.

शासकीय नोकरीतुन निवृत्त झालेल्यांना निवृत्तिवेतनाची सुविधा मिळते तशी खासगी नोकरीतुन निवृत्त होणाऱ्यांना मिळत नाही. खेरीज निवृत्तीनंतर महागाईही लक्षणीयरित्या वाढलेली असते. त्यामुळे केलेली बचत सेवानिवृत्तीपूर्वीच खर्च करणे कटाक्षाने टाळा. म्युच्युअल फंड, शेअरबाजार अशा स्टाक मार्केटशी संबंधित खात्यात अधिक गुंतवणुक केल्यास, विपरीत परिणाम होऊ शकतात. असे झाले तरीही डगमगुन न जाता प्रतिक्षा करण्याचे धोरण अवलंबवावे. स्टाक मार्केट उच्च स्तरावर गेल्यावर आपल्या गुंतवणुकीचे मूल्यही वाढते. मुलांची शिक्षणे, आरोग्य, याव्यतिरिक्त इतरही प्रासंगिक खर्च निवृत्तीनंतर उदभवु शकतात. त्याचीही तजवीज आधीपासुन करून ठेवावी. चला तर मग, शुभस्य शिघ्रम !

Leave a Comment