दिल्लीत लावणीचा ठसका

देशाची राजधानी दिल्ली उदार अंत:करणाची असल्याबाबत इतिहासाने कालापरत्वे नोंद केली आहे. ही नोंद वेगवेगळ्या दस्ताऐवजात धुंडाळतांना दिल्लीचे तख्त दोनशे वर्षे मराठय़ांनी सांभाळल्याचेही स्मरणात आहे. मराठा, महाराष्ट्र, मुंबई या शब्दांना आजही राजधानीत असणारी किंमत आणि आदर याचेही दर्शन अधूनमधून होतेच… मात्र देशच नव्हे तर विदेशातील संस्कृतीचा , कलेचा आणि भाषेचा सन्मान करण्याची खास दिल्लीकर संस्कृतीचे दर्शन काल सोमवारी ‘हंसध्वनी’ प्रेक्षागृहात घडले… औचित्य होते भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील महाराष्ट्र दिनाचे !

नवी दिल्लीत सध्या देश-विदेशातील पर्यटक १४ ते २७ नोव्हेंबर या काळात प्रगती मैदानावरच दिसतात. या ठिकाणी ३० वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरु असून हा उत्सवपर्व दररोज २ लाखावर येणार्‍या प्रेक्षकांमुळे सध्या वाजत-गाजत आहे. प्रगती मैदानावर देश भरातील लघुउद्योग आणि तंत्रज्ञानाची स्पर्धा लागली आहे. प्रत्येक राज्याचे लघुउद्योग, महिला बचत गटाचे स्टॉल,राज्यांचे विविध उपक्रम, नवनवीन शोध याचे सादरीकरण अद्यावत अशा दालनात सुरु आहे. सोबतच प्रत्येक राज्याच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शनही याठिकाणी घडत आहे. याच उत्सवपर्वात कालची सायंकाळ महाराष्ट्राची होती….

प्रगती मैदानावरील ‘हंसध्वनी’ प्रेक्षागृह वेगवेगळ्या प्रांतातील नागरिकांच्या उपस्थितीने खचाखच भरले होते. महाराष्ट्र यावर्षी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा मध्ये सहयोगी राज्य आहे. महाराष्ट्राची नोंद प्रत्येक जाहीरातीत आणि प्रगती मैदानावर ठिकठिकाणी घेतली आहे. उद्घाटनाला देखील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत वाणिज्य आणि उद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी भेट दिली होती. एकूणच महाराष्ट्राचे दालन असो वा महाराष्ट्र दिन सध्या प्रगती मैदानावर महाराष्ट्राचा माहौल आहे. त्यामुळे सोमवारच्या महाराष्ट्र दिनाला गर्दी उसळली होती. महाराष्ट्रातील निमंत्रित, दिल्लीकर मराठी बांधवही या गर्दीत होते. मात्र सोबतच अनेक राज्यांचे नागरिकही उपस्थित होते. महाराष्ट्राचे नृत्य कोणते ? याचे उत्तर सामान्य ज्ञान स्पर्धेत ‘लावणी’ एव्हढे सांगण्याचाच ज्यांचा या नृत्याशी संबंध आहे, असे अनेक बहुभाषिक कदरदान याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यापुढे मेजवानी होर्ती …. गेल्या चार दशकापासून ‘ढोलकीच्या तालावर अन घुंगराच्या बोलावर’ थिरकणार्‍या ‘लावणी समशेर’ माया जाधव आणि चमूच्या बहारदार सादरीकरणाची. त्यामुळे लवकरच बहुभाषिक प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकायला लावायला भाग पाडणार्‍या ठेक्यांनी प्रेक्षागृह नाचायला लागले. दिल्लीच्या थंडीत हा लावणीच्या मनमोहक तडका माया जाधव यांच्यासोबत सिनेअभिनेत्री सुरेखा कुडची हिने सादर केला.
मोजके मराठी कोल्हापूरी फेटे आणि असंख्य बहुभाषी प्रेक्षक यांची आस्वाद घेण्याची वेगळीच स्पर्धा बघायला मिळाली. हल्ली हिंदी सिनेमाने लावणीला दिलेली पसंतीही यामागे प्रेरणा असावी. मात्र लावणीसह भारुड, कोळीगीते, लोकगीते आणि महाराष्ट्र बाणा ठसठसीतपणे उमटविणारे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’सारखी गौरवगीते राज्याच्या संस्कृतीची ओळख देण्यास पुरेसी होती. नागपूरच्या दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राने दिल्लीकरांनी दाद द्यावी अशी ‘थीम’ छान गुंफली होती… शेवटी महाराष्ट्राच्या गौरव गीतात छत्रपती शिवरायांची स्वारी थेट रंगमंचावर आली… तेव्हा जय शिवाजीच्या घोषणा रंगमंचावर उमटल्या…. ‘यह महाराष्ट्र के शिवाजी महाराज है’ अशी ओळख अनेकजण आपल्या चिमुकल्यांना करुन देते होते… महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणखी कोणती ओळख हवी होती..!

Leave a Comment