पदनिर्देशित मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा गुरुवारी शपथविधी

पदनिर्देशित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी समारंभ गुरुवारी दुपारी साडेचार वाजता राजभवन येथे होत आहे. राजभवनातील दरबार हॉल येथे होणार्‍या समारंभात राज्यपाल के. शंकरनारायणन् हे दोन्ही नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी समारंभ केवळ निमंत्रितांसाठी असल्याचे राजशिष्टाचार विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पीठासन अधिकारी, खासदार, आमदार आदी मान्यवरांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे. विधीमंडळ सदस्यांना प्रवेशपत्रांचे वाटप करण्यासाठी विधानमंडळ इमारतीत स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे. तर प्रसारमाध्यमांची प्रवेशपत्रे मंत्रालयाच्या तळमजल्यावरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

समारंभस्थळी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले असून मान्यवरांची मर्यादित वाहनेच राजभवन परिसरात उभी करणे शक्य होणार आहे. अन्य वाहने सह्याद्री अतिथीगृह किंवा गिरगाव चौपाटी परिसरात उभी करावी लागणार आहेत. समारंभासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या सर्वांनी कार्यक्रमापूर्वी एक तास आधी राजभवन येथे उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

समारंभाच्या ठिकाणची मर्यादित प्रवेशसंख्या लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही राजशिष्टाचार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सौजन्य महान्यूज

Leave a Comment