देशात ऊर्जा क्रांती होण्याची आवश्यकता – राष्ट्रपती

राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी बाराव्या वर्ल्ड इनोव्हेशन समिट अँड एक्स्पो- पॉवर इंडिया-काँस्ट्रू इंडियाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते इंडिया टेक एक्सलन्स ऍवॉर्डचेही वितरण करण्यात आले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर आजपासून सुरू असलेले हे प्रदर्शन तीन दिवस सुरू राहणार आहे. यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, इंडिया टेक फाऊंडेशनचे अध्यक्ष आर. व्ही. शाही, इंद्र मोहन आदी उपस्थित होते.

श्रीमती पाटील म्हणाल्या, ‘देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला अन्न टंचाईला सामोरे जावे लागले. हरितक्रांती घडवून आणून आपण त्यावर मात केली. आताही आपल्याला दुसरी हरितक्रांती घडविण्याची गरज आहे. त्याचबरोबर देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीची घौडदौड कायम राखण्यासाठी देशात ऊर्जा क्रांती होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्यासमोर उपलब्ध असलेल्या सर्व ऊर्जा पर्यायांचा आपण उपयोग करून घ्यायला हवा. ऊर्जा निर्मितीसाठी आणि वितरण करण्यासाठी लागणार्‍या खर्चात कपात होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी यासंबंधीच्या संशोधन आणि विकास यावर विशेष खर्च करायला हवा. ऊर्जेच्याबाबतीत सुरक्षित होण्यासाठी बहुआयामी धोरण आखण्याबरोबरच ते पर्यावरण प्रेमी असले पाहिजे याचीही आपण दक्षता घेतली पाहिजे.

देशाची प्रगती आणि विकास कायम राखण्यासाठी पायाभूत सुविधा चांगल्या असण्याची आवश्यकता आहे. देशाच्या काही भागात पायाभूत सुविधांची अद्याप कमतरता आहे, पण त्यांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या देशाच्या विविध शहरांत रस्ते विकास, डेडिकेटेड रेल्वे कॉरिडॉर, मेट्रो रेल्वे, मोनो रेल्वे, विमानतळांचा विकास आणि बंदरांच्या विकासाची कामे सुरू आहेत, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी या प्रदर्शनाचा ऊर्जा आणि बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि व्यक्ती संस्था एकाच ठिकाणी येण्यास मदत होईल, असे सांगितले.

केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि ऊर्जा विभाग करीत असलेले कार्य यांची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विकासासाठी ऊर्जा अतिशय महत्त्वाची आहे. ऊर्जेची मागणी आणि पुरवठा यात असलेली तूट भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

यावेळी श्रीमती पाटील यांच्या हस्ते पश्चिम बंगाल आणि कर्नाटक यांना आयसीटी क्षेत्रातील एक्सलन्स ऍवॉर्डने गौरविण्यात आले. पायाभूत क्षेत्रातील विकासासाठीचे पुरस्कार मुंबई महानगरपालिका आणि कर्नाटक राज्याला देण्यात आले. ऊर्जा क्षेत्रातील पुरस्कार गुजरात, पश्चिम बंगाल आणि दिल्ली राज्याला देण्यात आले.

Leave a Comment