समृध्द जंगल खुणावतेय

ऑगस्ट महिन्यातच रंगबिरंगी फुलांनी डवरलेला श्रावण महिना येतो. हिरवे-हिरवे गार गालिचे-हरित तृणांच्या मखमालीच असे हिरवा शालू नेसलेल्या सार्‍या सृष्टीचे वर्णन बालकवीनी केलेले आहे. गोंदिया जिल्हा चहुबाजुनी जंगलांनी व्याप्त असल्यामुळे या जिल्हयात दौरा करताना अनेकदा निसर्गाची विविध रुपं सहज पाहायला मिळतात.

अलिकडेच जिल्हा माहिती अधिकार्‍यांच्या विभागीय बैठकीच्या निमित्ताने परत एकदा नवेगांव बांध येथील जंगलात जायचा योग आला. एखादया ध्यानस्त संन्याशाप्रमाणे निरव वातावरणात नवेगावचा विस्तीर्ण जलाशय पाठीला डोंगरांच्या कडा घेऊन बसलेला आपल्याला आढळतो. तलावांच्या विस्तीर्ण जलसाठयांवर जलाशयातील जलचरांमुळे मधूनच तरंगावर तरंग उमटत होते. त्यातील पाणवनस्पतीवर करकोचे, राखी बगळे, पांढरे बगळे मधूनच टोचा मारुन आपले भक्ष्य मिळवित होते. मोठे सुरेख दृष्य होते ते आषाढातला पाऊस कोसळून झाला होता. आसमंतातील सारी सृष्टी पांढर्‍या शुभ्र जलबिंदूनी-दवबिंदूनी डवरली होती. लाल रस्ते अधिकच लाल झाले होते.

नवेगावच्या विस्तीर्ण जलाशयाला मोठी निसर्गरम्य पार्श्वभूमी आहे. तिन्ही बाजुनी डोंगर आणि मध्ये जवळपास ११ चौरस किलोमिटर क्षेत्रावर एîसपैस पसरलेला नवेगावचा जलाशय आहे. हा जलाशय विदेशी पाहुण्या पक्षांसाठी प्रसिध्द आहे. ज्यात तिबेटवरुन येणारी च्रकावाक बदके, क्रौच, सारस, राखी बगळे, लांब चोचीचे बगळे सायबेरीयन शेकोटो, दलदल ससाणे हमखास आढळतात. हयांच्या शिवाय राघू, मैना, बुलबुल, खंडया, निळकंठ, भारव्दाज, सुतार पक्ष्यांचा तर, हा भाग म्हणजे आवडता प्रदेश. तलावाला लागूनच पर्यटकांसाठी हॉलीडे होम्स व कॅन्टीन, कॅन्टीन समोर बालकांना बागडण्यासाठी बगीचा या शिवाय विशेष अतिथीसाठी लॉग हट आणि संजय कुटी देखील तलावाच्या एका अंगाला विसावले आहेत.

नवेगावच्या जंगलात कांचनमृगांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. चमकदार कातडीची मोठया डोळयांची व चपलतेची परिसीमा गाठणारी हरणे आपल्या डोळयांचे पारणे फेडतात त्यांच्या पाटोपाट राखी रंगाची मातकट रंगाची मध्यम आकाराची व सुळे असलेली रानडुकरांची टोळी आपल्याला झपाटयाने ओलांडून जाते, आणि क्षणासाठी का होईना आपला जीव भितीने गोठतो. पण तो कळप कुणाकडेही न पाहता मुसंडी मारण्याच्या वेगात दिसेनासा होतो. जंगलातला थरार मात्र अनुभवाला येतो. दिवसा उजेडी हे प्राणी तर सरत्या सायंकाळी चपळपणात व देखणेपणात अव्वल असलेला बिबट आपल्याला क्षणार्धात दर्शन देऊन जातो आमच्या बैठकीच्या सायंकाळीच आमचा व्हॅन चालक उदय गजभिये याला गाडी पार्क करताना बिबटयाने दर्शन दिले होते.

रात्री एकटया दुकटयाने फिरु नका असे कॅन्टीन चालक भूषण याने सांगितले होते. ते आठवले आणि आपण त्यांच्या साम्राज्यात आलो आहे. त्याची जाणीव झाली. नवेगाव बांधच्या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, लांडगा, रानडुक्कर, चौसिंगा, तरस, काचंनमृग, निलगाय, भेडकी या वन्यप्राण्यांची समृध्द अशी जीवनसाखळी आहे. जीवो जीवस्य जीवनम् हया उक्ती प्रमाणे या जंगलात ही जीवनसाखळी गेली कित्येक वर्षे अवितरतपणे जोपासली जात आहे. म्हणूनच १३४ चौरस किलोमिटर क्षेत्रावर पसरलेल्या हया जंगलाला १९७५ साली अभयारण्याचा दर्जा मिळाला येथून जवळच १२ किलोमिटर वर जवळपास ९०० वर्ष जुना असलेला इटियाडोहचा जलाशय आहे. या ठिकाणी आता गाढवी नदीवर बांध घालून विस्तीर्ण असे इटियाडोह धरण बांधले आहे. अलिकडचे हे अर्वाचीन जलक्षेत्र आहे.

या शिवाय या जंगलांत छोटी-मोठी अशी शेकडो तळी आहेत. हया जलाशयांच्याआधारे जलाशयी वनस्पती, बांबूची वने वाढली आहेत. पक्षी निरीक्षणासाठी अस्तित्वात आलेला हया नैसर्गिक प्रयोगशाळाच होत. नवेगावच्या जंगलात समृध्द सागवान बरोबर खैर, वड, पिपंळ, उंबर, अर्जुन, अमलताश, मोह, तिवस, धावडा, हळदू, एîन सारखे मध्यम वृक्षांच्या सोबत मोठया प्रमाणात बांबूच्या रांजी आहेत. त्यामुळे जंगलाची घनदाटता वाढली आहे. ऐन दिवसाढवळया देखील येथे उन्हाची किरणे सहजपणे जमिनीवर पडत नाही.

अश्या या घनदाट जंगलठिकाणी एकदातरी भेट देऊन आपलं थकलं मन आणि शरीर उत्साहित करुन घ्यावं, एवढी ऊर्जा या ठिकाणी सामावली आहे. एवढे खरे. . .

 

  • चंद्रकांत क्षीरसागर
  • Leave a Comment