वेंगुर्ले रॉक

पर्यटनाच्या दृष्टीने पहायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला परिसर अप्रतिमच आहे. इथला निसर्ग मनाला वेड लावतो. निवती किनार्‍यापासून ८ कि.मी. अंतरावर समुद्रात वेंगुर्ला रॉक नावाचे नैसर्गिक पाषाणाचे बेट आहे. १८ व्या शतकापासून त्यावर एक दीपगृह आहे. वेंगुर्ले रॉकवर जाण्यासाठी सरकारी परवानगीची गरज असते. अशी माहिती मिळाल्यावर रीतसर परवानगी घेऊन वेंगुर्ला रॉकवर जाण्याची मोहीम आखली.

दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजता निवतीला पोहोचलो. मच्छिमार सारंग आपल्या दोन सहकार्‍यांबरोबर तयार होता. होडी समुद्रात वेगाने जाऊ लागली तसतसा किनारा दूर जाऊ लागला. छोटय़ाशा होडीतून केलेला पहिलाच प्रवास. पाण्यातून हेलकावे खात ती पुढे पुढे जात होती. होडी एकदम खाली जात होती तर काही वेळा १० ते १५ फूट लाटेच्या वर जात होती. होडीच्या काठाला घट्ट धरलं होतं. समोर नजर जाताच डॉल्फीनचा एक झुंड उडय़ा मारत जाताना दिसला. समुद्राचा गार वारा अंगावर शिरशिरी निर्माण करत होता. होडीच्या वरखाली होण्यामुळे काहीसं भय वाटत असलं तरी मजा येत होती.

अर्ध्या तासाने एक बेट दिसू लागले. त्याच्या आजुबाजूला आणखी काही दगडाचे सुळके दिसू लागले. होडी टापूच्या जवळ गेल्यावर उंच काळ्या दगडांचा टापू नजरेस पडला.१५० ते २०० फूट उंच दगडांच्या रांगा उभ्या होत्या.मलेशिया फुकेट बेटावर फिरायला जाण्यापेक्षा भारतातील सिंधुदुर्गात सुंदर, निर्जन निळ्याशार पाण्यात उभे असलेले पाषाण पाहून ते दृष्य पटापट कॅमेराबध्द करण्याचा मोह मला आवरला नाही.

होडीने गोल वळण घेतले व वेंगुर्ले रॉकच्या पायथ्याशी आलो. मान वर करुन बघितलं तर तो २०० फूट उंच सरळ रेषेतील कडा होता… पुढे गेल्यावर वर जाण्यासाठी पायर्‍या दिसल्या. त्या ठिकाणी दीपगृह उभारले होते. होडीतून उतरलो… खडकावर असलेल्या पायर्‍यांवर चढू लागलो. जसजसे चढून वर जाऊ लागलो तसतसे सागराचे विहंगम दृष्य दिसत होते.वरच्या बाजूला गोलाकार धातूच्या पत्र्यापासून बनविलेले उंच मनोर्‍यावरील दीपगृह दिसले.

साहजिकच ह्या दीपगृहाविषयी कुतुहल जागृत झाले. याबाबत तेथील कर्मचा-याला माहिती विचारली असता तो म्हणाला की, हे दीपगृह १८७० साली ब्रिटीशांनी सुरु केले. ब्रिटीशांची दूरदृष्टी लक्षात घेता त्यांना हाडाचे दर्यावर्दीच म्हणावे लागेल.त्यांना व्यापारासाठी येणे जाणे भाग पडे. यावेळी समुद्रातील जहाजांना दिशा दाखविण्यासाठी तसेच धोक्याची सूचना देण्यासाठी बेटावरील या दीपगृहाची निर्मिती झाली. येथे वनस्पती तेलावर जळणारा दिवा लावला जात असे. धोक्याच्या वेळी मात्र मोठी आग लावून धोक्याची सूचना दिली जायची.

१८९० च्या दशकात या ठिकाणी मनोरा बांधण्यात आला व त्यावर रॉकेलवर चालणारा दिवा बसविण्यात आला. हा दिवा दोन्ही बाजूंनी चालणारा ऑप्टीक पध्दतीचा होता. हे दीपगृह पोर्तुगीज, डच व ब्रिटीश सत्तेसाठी महत्वाचे असल्याने लाईटहाऊस तज्ज्ञ ऍलम डी स्टीव्हन यांनी १९४७ साली तेथे भेट दिली व सर्व बाजूंचा अभ्यास करुन जास्त क्षमतेचा दिवा बसविण्याची सूचना केली. यासाठी पॅरीसहून २० मीटर जाड धातूचा मनोरा, ५५ लिटर बर्नर आदी साहित्य आणण्यात आले. कर्मचारी मोठय़ा कौतुकाने माहिती सांगत होता. एवढा जड मनोरा व त्याचे साहित्य २०० ते २५० फू ट उंचीवर कसे नेले असेल ? असे प्रश्नचिन्ह माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.

स्वातंत्र्यानंतर १९५६-५८ मध्ये दीपगृहावर रेडीओ प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यात आला. १९६० साली प्रखर प्रकाशाचा मेटल हेडलाईट लॅम्प बसविण्यात आला अशी माहिती ही यावेळी देण्यात आली.

दीपगृह पाहून झाल्यानंतर संपूर्ण बेट पाहिले. या निर्जनस्थळी स्वीट पक्ष्यांच्या लाळेपासून तयार होणारी पक्षांची घरेदेखील पहाण्याची संधी मिळाली. १५ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत समुद्र प्रचंड खवळलेला असल्याने या बेटावर जाता येत नाही त्यामुळे दीपगृहावरील कर्मचार्‍यांचा तीन ते चार महिने किनार्‍यावरील संपर्क तुटतो या दिवसांचे खाण्यापिण्याचे साहित्य त्यांना मे महिन्यातच बेटावर जमा करावे लागते.

वेंगुर्ला रॉक या बेटावरील सहा तास कधी सरले ते कळलेच नाही.एका अनोख्या स्थळी भेट दिल्याची जाणीव होत होती. एक आगळावेगळा अनुभव घेऊन मी परतीच्या प्रवासाला लागलो.

 

  • सदाशिव कांबळे
  • 1 thought on “वेंगुर्ले रॉक”

    1. vishal tendolkar

               khup chan, mala pan tithe jayche ahe teavha permission kothe ghyaychi te tevdhe sanga

    Leave a Comment