धोंडो केशव कर्वे

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला.

मुंबईच्या एलिफिन्सटन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.
वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.
त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली.

स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि इश्वर चंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यामुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.

राधाबाईंच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे १८९३ साली गोदूबाईंशी त्यांनी विवाह केला. त्या बालविधवा होत्या. पण गोदूबाई बंडखोर होत्या. समाजाचा विरोध पत्करून वयाच्या विशीतच त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनामध्ये आपल्या शिक्षणाला सुरुवात केली होती.

या विवाहाबरोबरच अण्णासाहेबांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली.
अण्णासाहेबांनी १८९३ साली `विधवा विवाहोत्तेजक मंडळी’ची स्थापना केली. विधवांच्या विवाहाला प्रोत्साहन देण्याबरोबरच विधवांच्या मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करीत. दोन वर्षांनी, १८९५ साली या संस्थेचे नाव बदलून `विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ असे करण्यात आले.

सन १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. याच ठिकाणी १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी – पार्वतीबाई आठवले – या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारं कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी `निष्काम कर्म मठा’ची स्थापना केली.

पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ असे त्याचे नामकरण करण्यात आले.

अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.

जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी भारतीय महिला विद्यापीठ’ (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले.

अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी अफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.

कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.

मराठी (आत्मवृत्त, १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिली.

अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांनी डी. लीट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण’ हा किताब त्यांना १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

आजही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

  • शुभांगी मांडे
  • Leave a Comment