धर्म आणि आरोग्य

अश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल – व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे धनत्रयोदशी म्हटले जाते. धनत्रयोदशी या शब्दाचा अपभ्रंश धनतेरस असा आहे. या दिवशी धनाची पूजा करण्याचा पूर्वापार परिपाठ आहे. याच दिवशी यमदीपदान असाही एक शास्त्रार्थ दिलेला असतो. यमाला या दिवशी दीपदान करावे, असे धर्मशास्त्राचे सांगणे असले तरी यमाला दीपदान कसे करणार ? दक्षिण दिशेकडे एक दिवा लावणे, असा या दिवसाचा म्हणून एक आचार पाळला जातो. दक्षिण ही यमाची दिशा मानतात.

दीपावली हा सण जीवन आणि मृत्यू यांचे निकटचे नाते मनावर बिंबवणारा आहे. प्राचीन कथेप्रमाणे कोण्या एका हैमराजाच्या मुलाचा मृत्यू त्याच्या लग्नानंतर चारच दिवसांत होईल, असे कोणी सांगितले होते.

राजपुत्राचा विवाहोत्सव चालू असतानाच सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला. विवाहोत्सवासाठी जमलेल्या सर्व मंडळींचा आक्रोश कानावर आदळत असतानाच त्या राजपुत्राचे प्राण यमदूतानी हरण केले. त्याचे प्राण हरण करण्यासाठी म्हणून जे यमदूत गेले होते. त्यांनाही या प्रसंगामुळे दु:ख झाले. खरे म्हणजे यमदूतांना कोणाच्याही सुख-दु:खाची तमा असण्याचे कारण नाही, असे समजले जाते. पण असे यमदूतसुद्धा राजवाडय़ातील सर्व लोकांचा आक्रोश पाहून व्यथीत झाले. दुखी झाले. पुढे त्यांनी एकदा यमराजाला विचारले, अशा प्रकारे अकाली मृत्यू येऊ नये म्हणून काय करावे ? तेव्हा यमराजाने आश्विन कृष्ण त्रयोदशीपासून पाच दिवस सूर्यास्तानंतर जो कोणी दीपोत्सव करील, त्याला अकाली मृत्यू येणार नाही असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे सर्व लोक हा दीपोत्सव करु लागले. दीपोत्सवात, दिवाळीत आनंदाची, उत्साहाची लयलूट असली तरी त्याचे मूळ कारण अपमृत्यूपासून सुटका व्हावी, अशी इच्छा हे आहे. आश्विन पौर्णिमा ही वर्षातील सर्वात सुंदर रात्र. त्यानंतर पंधरा दिवसांनी येणारी अमावस्या ही काळोखाची असली तरी आपण भारतीय लोक दिवे लावून ती आपल्या परीने अधिकाधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. पौर्णिमेच्या रात्रीला निसर्गानेच सौंदर्याचे लेणे बहाल केले आहे. या अमावास्येच्या रात्रीला मात्र आपण आपल्या थिटय़ा प्रयत्नांनी का होईना पण अधिक सुंदर बनविण्याचा प्रयत्न करीत असतो. हा दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून सुरु होतो. धनत्रयोदशी हीच धन्वंतरी जयंतीही आहे. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे मूळ निर्माते. देवांचे राजवैद्य.

कोणालाही अकाली मृत्यू येऊ नये अशा उदात्त विचाराने सुरु झालेल्या दिवाळी या सणाच्या प्रारंभी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंतीची सांगड घातली जाणे हे खरोखरच मोठे सूचक आहे, नाही ? वैद्यकशास्त्र तरी दुसरे काय करते ? अकाली मृत्यू येऊ नये म्हणून धडपड करते. प्रकृती बरी राहावी, मृत्यू दूर असावा, यासाठी मार्गदर्शन करते धार्मिक आचरणातून आपण अकाली मृत्यू टाळावा म्हणून यमराजाचे मार्गदर्शन करते. धार्मिक आचरणातून आपण अकाली मृत्यू टाळावा म्हणून यमराजाने सांगणे ऐकूण त्याप्रमाणे पिढय़ान्पिढय़ा दक्षिणेकडे तोंड करुन दिवे लावतो. धर्म आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी धनत्रयोदशीच्या निमित्ताने अशा एकत्र आल्या आहेत.

धनत्रयोदशीचे महत्त्व दिवाळीचा शुभारंभ करणारा दिवस म्हणून तर आहेच पण अपमृत्यू टाळण्यासाठी आपण हा दीपोत्सव करीत आहोत आणि मिळणारे आयुष्य आरोग्यपूर्ण असावे, धर्माच्याच चौकटीत राहून त्याचा मन:पूत उपभोग घेता यावा म्हणून त्या दिवशी धन्वंतरीचेही स्मरण करीत आहोत.

  • ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
  • सौजन्य महान्यूज

    Leave a Comment