जाणावें तें सार

आपले स्थान बळकट करुन आपल्या अधिकाराची योग्य जाणीव ठेवून टाकलेले पाऊल हे सुख दु:खाच्या जंजाळात सापडत नसते, असे तुकोबांनी आपल्याला आधी सांगितले. आपण नेमके कुठे आहोत याचा शोध घेताना बरीच काळजी घ्यावी लागते. तुकोबा म्हणतात, जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ।। डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ।। बहुथोडय़ा आड । निवारितां लाभें जाड ।। तुका म्हणे खरें । नेतें हातींचें अंधारें ।। सार कशात आहे ? एखाद्या गोष्टीचे वर्म-मर्म कशात आहे, ते जाणून घेतले पाहिजे. ते जाणून न घेता तुम्ही वागायला गेलात तर सुखाचा जीव दु:खात घातल्यासारखे होईल. जर तुम्ही सत्य जाणून घेतले नाही तर अंधारातच चाचपडत राहाल.

तुकोबा एक दृष्टांत देतात. तुम्ही आपल्या हाताने स्वत:चे डोळे झाकून घेतलेत की, सूर्यप्रकाश दिसण्याचा थांबतो, पण याचा अर्थ आकाशातला सूर्य मावळला असा होत नाही. इतरत्र सूर्यप्रकाश लोपला असेही होत नाही.

आकाशातील सूर्याचा प्रकाश दाहीदिशांत, सगळीकडे भरलेला आहे, फक्त तुम्ही स्वत:चे डोळे झाकून घेतल्यामुळे तुम्हाला तो दिसत नाही एवढेच. तुमचा हात तो केवढा, त्या हाताच्या पंजाने तुम्ही स्वत:चे दोन्ही डोळे झाकून घेऊ शकता आणि ते तसे झाकून घेतल्यानंतर तुम्हाला काळोखापलीकडे दुसरे काही दिसत नाही, हेही खरे. तुम्ही तो हात बाजूला केला की, तुम्हाला पुन्हा सूर्याचा प्रकाश दिसू लागतो. प्रकाशाने न्हालेले सगळे जग तुमच्या हातात आहे. हात डोळ्यांवर घेतला की अंधार दिसतो. हात दूर करुन तुम्ही डोळ्याच्या पापण्या उघडल्या की प्रकाश दिसतो.

आपल्या अवतीभोवती जे काही आहे ते डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे. तसे जर होईल. व्यवहारात, प्रपंचात सार जाणून घ्यावयाचे असेल, त्याचे तात्पर्य समजून आपण अहंकाररुपी हाताने आपल्या ज्ञानाचे डोळे झाकले, मी म्हणतो तेच बरोबर, अशा वृथा अभिमानात वावरु लागलो की, आपण अंधारात बुडालोच म्हणून समजा. आपल्याला खरे काय आणि खोटे काय ? याचे भानच उरणार नाही. त्यामुळे आपल्या हाती लागले ते सार आहे की फोलपट आहे ते ध्यानात यायला वेळ लागेल.

आपण सार म्हणून जे जवळ करु ते फोलपट असल्याचे काही काळानंतर समजून येईल आणि ते निवडण्यात आपलीच चूक झाली हे ध्यानात आल्यामुळे मन विषण्ण होईल. पश्चात्तापात पडावे लागेल. तेव्हा सांगितल्याप्रकाणे खुंट बळकट आहे की नाही हे बघताना डोळे उघडे असले पाहिजेत.

प्राप्त स्थितीचे योग्य आणि यथातथ्य ज्ञान असले पाहिजे. तुमचे ज्ञान चुकीचे असेल तर परिणामही चुकीचाच पदरात पडणार हे समजून घेतले पाहिजे. तुम्ही डोळे झाकून घेतलेत याचा अर्थ जग अंधारात बुडाले असा नव्हे.

उलट तुम्ही आपले डोळे झाकून घेतलेत तर तुमच्याच हाताने तुम्ही आपले अकल्याण करुन घेतले, असे होईल. तुका म्हणें खरें । नेलें हातींचे अंधारें ।। तुमच्या हातातोंडाशी आलेला घास केवळ डोळ्यांवर हात घेऊन तुमचा तुम्हीच गमावला असे होईल.

आता सांगा, इतपत चांगला दृष्टांत देऊन, एक व्यावहारिक मुद्दा व्यवस्थितपणे समजावून देणारे तुकोबा, त्यांना व्यावहारिक ज्ञान नव्हते, असे कसे बरे म्हणता येईल ? येईल का ?

संदर्भ टीप –
जाणावें तें सार ।
संत तुकाराम. तुका. गाथा – संपा. जोग, अभंग १३९६, पृ.२९३

  • ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
  • Leave a Comment