चकोल्या

ग्रामीण भागात जसं जसं फिरावं तसे नवनविन पदार्थ खायला मिळतात. अलिकडे प्रसार माध्यमांच्या प्रसारामुळे म्हणा की शहरी संस्कृतीमुळे, अगदी एक-दोन हजार लोकवस्तीच्या गावातही चायनिज पदार्थ सहजपणे उपलब्ध होवू लागले आहेत. परवा सहज एका जून्या मित्राकडे गेलो. तेथे एक पदार्थ खायला मिळाला. तो आवडला. इतरांनाही जगभरात कळावा म्हणून मुद्दाम हा पदार्थ देत आहे.

चकोल्या हा खेडेगावातील पारंपरिक पदार्थ. पावसाळ्यात भाज्या मिळत नाहीत. हवा थंड असते. त्या करीता एक खमंग पदार्थ. उपवास सोडण्यासाठीसुद्धा पदार्थ केला जातो. ज्या दिवशी घरात भाजी नसेल तर चकोल्या करायला हरकत नाही.

साहित्य : एक वाटी शिजवलेली तुरीची डाळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ, जिरे व सुके खोबरे भाजून कुटलेले, ओवा, तीळ, २ वाटय़ा कणीक, तेल, फोडणीचे साहित्य इ.

कृती : प्रथम एका पातेल्यात तेलाची हिंग, मोहरी, मेथी घालून खमंग फोडणी करावी. त्यात शिजवलेली तूरडाळ घालून पाणी घालावे. नंतर त्यात गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, कुटलेले जिरे, खोबरे घालून पातळ आमटी करावी.
नंतर आमटीत तिखट, मीठ, ओवा, तीळ, गोडा मसाला, हळद व २ मोठे चमचे तेलाचे मोहन घालून घट्ट कणीक भिजवावी. ते मळून त्याच्या पोळ्या लाटून घ्यावा. त्याचे शंकरपाळे कापावे, आमटीखालचा गॅस मंद ठेवून ते शंकरपाळे आमटीत सोडावे. मधून मधून हलक्या हाताने हलवावे. चांगल्या शिजल्या की गॅस बंद करून घ्यावा. खायला देताना त्यावर साजूक तुपाची धार घालावी. डाव्या बाजूला लसूण चटणी, उभा चिरलेला कांदा, भाजलेल्या भातवडय़ाबरोबर द्यावे. आता भातवडय़ा नाहीत म्हणून पापड भाजून घ्यावा.

टीप : चकोल्याचा रंग बदलला व वरती साय दिसू लागली की चकोल्या शिजल्या असे समजावे. हा एक पौष्टिक व पोटभरीचा व खमंग पदार्थ आहे.

ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी हा पदार्थ केला जातो. विशेषत: या पदार्थाला विभागनिहाय वेगवेगळी नावं देखील आहेत.

सौजन्य महान्यूज

Leave a Comment