मेळघाटी साग फुलला

रस्त्यापासून दूरवर क्षितिजापर्यंत उंच-उंच झाडे पसरली होती. प्रत्येक झाड हत्तीच्या कानाएवढया हिरव्या-हिरव्या पानांनी लदबदलेले होतं. जणूकाही सर्वदूर हिरव्या रंगाचा अथांग सागरच तेथे पसरलेला दिसत होता. त्यावर पांढर्‍या ढगांच्या पुंजक्यांची पखरण झाली होती. ती होती साग वृक्षाच्या फुलांची. पांढर्‍या-दुधीया रंगाच्या मोतीदार फुलांनी त्यावर शिंपण केली होती. डोंगरी रानवार्‍यामुळं त्या हिरव्या सागरावर लाटांचे तरंग उमटल्यासारखे वाटत होते.

मान्सून आता देशाच्या उत्तर भागात सरकला होता. वर्षा ऋतूची वाटचाल शेवटच्या चरणाकडे चालली होती. उनपावसाचा लपाछपीचा खेळ सुरु झाला आणि खटकाली वनचौकीचं गेट ओलांडून मेळघाटात आम्ही प्रवेश केला. सातपुडयाच्या अंगाखांद्यावरुन नागमोडी वळणे घेत जाणारे डांबरी रस्ते ओलेचिंब झाले होते. दोन्ही बाजूने हिरव्यागार वृक्षवेलींनी आपल्या लक्षावधी हातांनी डोंगराच्या शीरापर्यंत हिरवा रंग ओढत नेला होता. त्यापलीकडे केवळ क्षितिज आणि दिगंतरात काळया-पांढ-या ढगांचे पुजके दिसत होते. त्यांच्या लपंडावातून कधीकधी निळे निळे आकाश दृष्टीस पडत होते. तर कधी सूर्यकिरणांचे कवडसे हिरव्या सृष्टीवर पडत होते. त्यामुळे काही भाग उजळून निघत होता. रस्त्याने दोन्ही बाजूला हिरवा तृणमेळा माजावर आला होता. त्यात घाणेरी, रानतिवडी, रानहळद, कळलावी, रानपराटी, रानझेनिया इ. रानफुलांनी सृष्टीवर निसर्गरंग भरला होता. पावसाळी सौंदर्याने अरण्यावर मोहिनी घातली होती. ते पाहतांना फुलाफुलातून मध पिणार्‍या फुलपाखरासारखा आनंद मनात होत होता.

रस्त्यापासून दूरवर क्षितिजापर्यंत उंच-उंच झाडे पसरली होती. प्रत्येक झाड हत्तीच्या कानाएवढया हिरव्या-हिरव्या पानांनी लदबदलेले होतं. जणूकाही सर्वदूर हिरव्या रंगाचा अथांग सागरच तेथे पसरलेला दिसत होता. त्यावर पांढर्‍या ढगांच्या पुंजक्यांची पखरण झाली होती. ती होती साग वृक्षाच्या फुलांची. पांढर्‍या-दुधीया रंगाच्या मोतीदार फुलांनी त्यावर शिंपण केली होती. डोंगरी रानवार्‍यामुळं त्या हिरव्या सागरावर लाटांचे तरंग उमटल्यासारखे वाटत होते.

घाटांच्या मेळघाटमध्ये साठ टक्के साग वृक्ष आहेत. ब्रिटीशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात येथे सागाची लागवड केली होती. सागाच्या लाकडाचा फार मोठा व्यवसाय त्याकाळी येथे चालत होता. इंग्लंडमध्ये घराच्या आणि फर्निचरच्या वापरासाठी प्रचंड प्रमाणावर सागाचं लाकुड मेळघाटातून पुरविल्या जात होतं. त्यासाठी ब्रिटीशांनी रस्त्याचे, रेल्वे मार्गाचे जाळे येथे विणले होते. स्वातंत्र्यानंतर मात्र या सागाची परवड थांबली. व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य यामुळे वन्यप्राण्यांसाठी मेळघाट हे महाराष्ट्रातील एक प्रमुख आश्रयस्थान निर्माण झाले. आज मेळघाटात उन्मळून पडलेले झाडसुध्दा उचलण्याची परवानगी नाही. कारण अशा झाडांवरही असंख्य सुक्ष्मजीवांना आश्रय मिळतो. त्यांच्या कित्येक पिढयांची वाढ तेथे होत असते.

साग वृक्षाला मेळघाटातील आदिवासी कोरकू सिपना असे म्हणतात. म्हणूनच या समृध्द मेळघाटच्या सागगारातून एक नदी वाहते तीला सिपना असे नाव पडले आहे. निसर्गपूजक कोरकू हे या सागाची पूजा करतात. त्यांना देव मानतात. भर उन्हाळयात अरण्यात पाण्याचे साठे कमी झाल्यावर रानगवे, सांबर, अस्वल इ. वन्यजीव याच साग वृक्षाच्या साली काढून त्या चघळतात त्यातून त्यांना पाणी मिळते आणि आपली तहान भागविली जाते. असा हा साग मेळघाटच्या सजीवसृष्टीसाठी जीवनदायी आहे.

सागाचे शास्त्रीय नाव Tectona grandis असून तो व्हर्बिनेसी कुळातील आहे. हा एक उंच असा वृक्ष असून तो पानगळीचा आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व वनात तो आढळतो. सागाचे लाकूड अतिशय मौल्यवान असल्यामुळे आजकाल वनशेतीमध्येही त्याची मोठया प्रमाणावर लागवड केल्या जाते. याचे खोड उंच व सरळ असते. त्याची साल पिवळसर तपकिरी रंगाची असून ती तंतुमय असते. साग वृक्षाच्या डहाळया चौकोनी असून त्याला मध्ये पन्हाळी असते. पान दोन्ही टोकाला निमूळती होत गेलेली असतात. पानाचा वरचा भाग खरखरीत असून खालील भाग मृदू व केसाळ असतो. शिरा खालून ठसठशीतपणे दिसतात. सागाची पानगळ हिवाळयात होते. नवीन पालवी मे महिन्यात येते. फुले बारीक मोतीदार पांढर्‍या रंगाची असून ती सरळ दांडयावर येतात. हा दांडा लांब असतो. जून ते सप्टेंबर या काळात साग फुलांनी डवरुन जातो. फळ मात्र कठीण कवचाचे असते. त्यावर पिवळी तपकिरी दाट लव असते. फळामध्ये चार कप्पे असून त्यामध्ये तिळासारखी बी असते. सागाची तांबूस-हिरवी कोवळी पाने तळहातावर कुस्करल्यास बोटाला लाल रंग लागतो. लागवडीनंतर जवळपास पंधरा वर्षानंतर त्याचे लाकूड बल्लीएवढे होते. त्यानंतर वयाच्या ३० ते ४० वर्षानंतर ते टिकाऊ फर्निचर व घराच्या दारे-खिडक्याकरिता उपयोगी पडते. सागाचे सरासरी आयुष्य १०० ते १२० वर्षे एवढे असते.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत अमरावती जिल्हा पसरलेला आहे. सातपुडयाच्या दर्‍याखोर्‍यात विस्तीर्ण पसरलेला हा सागाचा मेळघाट सहाही ऋतूमध्ये आपलं वेगवेगळं रुप दाखवत असतो. ते अनुभवण्यासाठी मग माझी पावलं प्रत्येक ऋतूत जैविक विविधतेनं संपन्न असलेल्या मेळघाटी अरण्याकडे वळू लागतात. मात्र वर्षा ऋतूतील फुललेल्या मेळघाटी सागाचं रुप इतर ऋतूपेक्षा वेगळचं असतं. ते देत असतं वाहत्या पाण्यासारखं जीवन जगण्याचं बळ.

  • प्र.सु.हिरुरकर
  • Leave a Comment