जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य

जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य हे भारताचे १३वे लष्करप्रमुख होते. भारतीय लष्करातील अत्यंत बुद्धिमान, शूर आणि धाडसी लष्करप्रमुखांमध्ये त्यांची गणना होते.अलिबाग येथे जन्मलेल्या जनरल वैद्य यांचा जन्म २४ जानेवारी १९२६ रोजी झाला. १९६५ सालच्या भारत-पाक युद्धाच्या वेळी ते लेफ्टनंट कर्नल या पदावर होते. त्यांच्याकडे डेक्कन हॉर्स विभागाचा पदभार देण्यात आलेला होता. या युद्धात आपल्या बुद्धीची आणि कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवीत त्यांनी ‘असल उत्तर’ आणि `चिमा’ भागात अतिशय चोख कामगिरी बजावली. या त्यांच्या शौर्यासाठी त्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते.

भारत-पाकदरम्यानच्या १९७१ सालच्या युद्धाच्या वेळी वैद्य `झफरवाल’ विभागाचे ब्रिगेडिअर होते. तेथील युद्धभूमीत जमिनीत सुरुंग पेरलेले होते. जनरल वैद्य यांनी त्या वेळी असामान्य धाडस दाखविले आणि स्वत: सुरुंगातून रस्ता मोकळा करून आपल्या संपूर्ण तुकडीस पुढे घेऊन गेले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यावर जलद हल्ला करता आला. त्याच युद्धात बसंतर येथील कारवाईत आपल्या कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवीत दाट सुरुंग पेरलेल्या भागातून भारतीय रणगाडे सहीसलामत पुढे नेले. याच रणगाडय़ांनी पुढे पाकिस्तानचे ६२ रणगाडे नेस्तनाबूद केले. या त्यांच्या असामान्य धाडसाबद्दलही त्यांना पुन्हा एकदा महावीर चक्र प्रदान करण्यात आले.

३१ जुलै १९८४ रोजी जनरल वैद्य भारताचे तेरावे लष्करप्रमुख बनले. त्यांच्याच कारकिर्दीत `ऑपरेशन ब्लू स्टार’ घडले. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शरण घेतलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी `ऑपरेशन ब्लू स्टार’ या नावाने कारवाई करण्याचे ठरविले होते. या कारवाईचे संपूर्ण नियोजन जनरल वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आले होते. शीख धर्माच्या पवित्र सुवर्ण मंदिरात सैन्य घुसविणे ही अत्यंत संवेदनशील बाब होती. मात्र असामान्य धाडस दाखवून ही कारवाई करण्यात आली व त्यात भारतीय सैन्य यशस्वी झाले.

याच धाडसाने जसा श्रीमती इंदिरा गांधी यांचा बळी घेतला, तसाच जनरल वैद्य यांचाही बळी घेतला.

चाळीस वर्षांची प्रदीर्घ देशसेवा केल्यानंतर ३१ जानेवारी १९८६ साली ते लष्करातून निवृत्त झाले आणि पुण्यास वास्तव्यास आले. १० ऑगस्ट १९८६ रोजी सायंकाळी पत्नीसह आपल्या कारमधून घरी परतत असताना पुण्यातील लष्कर भागात दुचाकीवरून आलेल्या खलिस्तावादी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर आठ ते नऊ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांच्या पत्नीला चार गोळ्या लागून त्याही जखमी झाल्या.
जनरल वैद्य यांनी केलेल्या मातृभूमीच्या सेवेबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर अतिविशिष्ठ सेवा पदक आणि पद्मविभूषण पुरस्कार घोषित केला.

Leave a Comment