संसद भवन

loksabha

राजधानी दिल्लीतील लाल किल्ला आणि कुतुब मिनार या ऐतिहासिक वास्तु तत्कालिन राज्यकर्त्यांनी बांधलेल्या आहेत. या वास्तुंचे महत्व देशाच्या इतिहासात अनन्यसाधारण असे आहे. परंतु विसाव्या शतकात इंग्रजांनी आपला राज्यकारभार हाकण्यासाठी प्रशासकीय सोईने बांधलेल्या वास्तु आज देशाची प्रतिकं ठरलेल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रपती भवन आणि संसद भवन या दोन वास्तुंचा विशेष उल्लेख करावा लागतो. डोळ्याचे पारणे फेडणार्‍या नव्हे प्रत्येक भारतीयाला केवळ एकदाच डोळेभरून पाहायची इच्छा असलेल्या संसद भवनाचा सारा परिसर मनसोक्त पाहता आला. देशाच्या हिताचे, राजकारभाराचे जेथे महत्वपूर्ण निर्णय होतात ते स्थळ ती सगळी चर्चा प्रत्यक्षात अनुभवता आली आणि दिल्लीत असल्याचे खर्‍या अर्थाने समाधान लाभले….
Parliament-House
संसद भवन इंग्रजांनी बांधले खरे परंतु ते आज देशवासियांच्या नजरेत देशाच्या आत्मसन्मानाचे एक सर्वोच्च प्रतिक ठरले आहे. देशाच्या हिताचे, चांगल्या वाईट सर्वच बाबींचे निर्णय देशाच्या या सर्वोच्च वास्तूत होतात. सगळा देश दूरचित्रवाहिनीवरून देशाचा कारभार आखो देखा पाहात असतो. अगदी लहानपणापासून मी ही संसदेत रंगणारी नेत्यांची चर्चा पाहात आलो आहे. त्यामुळे दिल्लीत आल्यानंतर संसद भवनाला भेट हा माझ्या नियोजित अजेंडय़ातील एक भाग झाला. संसद भवनाची केवळ वर्तुळाकार आकृती नजरेसमोर आली की, मनाची घालमेल होते.
Parliament-House4
संसद भवनाच्या आत प्रवेश करतांना, देशाच्या या सर्वोच्च मंदीरात प्रवेश करतांना जो आनंद मी उपभोगत होतो तो अवर्णनीय असाच आहे. संसदेच्या आत प्रवेश करतांना सदनातील जेष्ठ नेत्या आणि माजी अभिनेत्री जया प्रदा भराभर पायर्‍या उतरून बाहेर पडत होत्या. उद्योगपती आणि राज्यसभेचे खासदार राहूल बजाज एका वृत्तवाहिनीला बाईट देत होते. हे सगळेच माझ्यासाठी अगदी अवर्णनिय असेच होते. अनेक नेत्यांचा । वावर होता. काही आपल्या कक्षात काही, पक्ष कार्यालयात तर काही आपले काम आटोपून बाहेर पडतांनाचे हे चित्र मी प्रत्यक्षात नजरेत साठवून घेत होतो.
Parliament-House1
संसद भवनात प्रवेश हीच माझ्यासाठी रोमांचकारी गोष्ट होती. त्यात ज्या सगळ्या नेत्यांना केवळ टिव्हीवर किंवा वर्तमानपत्रांमध्ये पाहता आले होते. ज्यांना संसदेतील एका चर्चेत भाग घेतांना ऐकले होते त्यांना प्रत्यक्षात आजूबाजूने जातांना मी पाहात होतो. माझे असे निरिक्षण सुरू होते. संसदेच्या परिसरात वृत्तवाहिन्यांच्या कॅमेर्‍यांसाठी विशिष्ठ जागा ठेवण्यात आली आहे. एखाद्या नेत्याला मिडीयाला काही सांगायचे असल्यास त्यांना त्या विशिष्ठ ठिकाणी जाऊन मिडीयाशी बोलावे लागते. त्या ठिकाणी नेहमीच बाईट्स सुरू असतात. अनेक नेते तेथे मिडीयाशी बोलत असल्याचे पाहावयास मिळते.

देशासाठी आपल्या प्राणांची आहूती देणार्‍या तसेच स्वातंत्र्यकाळात अतुल्य योगदान देणार्‍या महामानवांचे पुतळे संसद भवनातील परिसराचे आणखी एक वैशिष्ठ्य. शाहू-फुले-आंबेडकर हे देशासह राज्याच्या सामाजिक चळवळीचे एक अग्रणी त्रिकूट. हे त्रिकूट संसदेतही विराजमान झाले आहे. व्हिजीटर्स गेटमधून आत गेलं की उजव्या हाताला महात्मा गांधीचा पुतळा विराजमान असलेला दृष्टीस पडतो. त्यापाठोपाठ महात्मा फुले, शिवाजी महाराज तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छ.शाहू महाराज यांचे पुतळे विराजमान झाले आहेत. पुतळ्यांच्या या परिसरात करण्यात आलेली देखणी सजावट आणि वेगवेगळे उद्याने खरोखर येथे येणार्‍यांना प्रसन्न करून जातात.
Parliament-House3
संसदेची इमारत म्हणजे कायमस्वरूपी डोळ्यात साठवून ठेवावी इतकी देखणी वास्तू. अगदी तिच्या जवळून तिला न्याहाळतांना येणारा अनूभव हा वेगळाच. १७०.८९ मिटर व्यास असलेल्या या वर्तुळाकार इमारतीत लोकसभा आणि राज्यसभेची स्वतंत्र गृहे आहेत. तर भवनाचा एकूण परिसर हा सहा एकर इतका आहे. हे संपूर्ण भवन १४४ खांबांवर उभे असून प्रत्येक खांब हा ८.२३ मिटर इतका उंच आहे.
Parliament-House2
ब्रिटीश आर्किटेक्ट एडविन ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर यांच्या संकल्पनेतून ही भव्य इमारत साकारलेली आहे. १९१२-१३ साली त्यांनी या इमारतीचे डिझाईन तयार केले होते. आणि प्रत्यक्षात १२ फेब्रुवारी १९२१ साली डय़ुक ऑफ कॅनॉट यांच्या हस्ते शुभारंभ होऊन या भवनाच्या बांधकामास सुरूवात झाली. सात वर्षाच्या परिश्रमानंतर हे भवन तयार झाले. १८ जानेवारी १९२७ रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड इर्विन यांनी या भवनाचे उद्घाटन केले व त्यानंतर ते प्रत्यक्ष वापरात आले. त्यावेळी भवनाच्या बांधकामावर झालेला एकून खर्च हा ८३ लाख इतका होता. भवनाला एकून दहा गेट असून संसद मार्गाकडून प्रवेश करणारे गेट नं.१ हे मुख्य प्रवेशद्वार आहे. संसदेच्या तळमजल्यावर तसेच तिसर्‍या माळ्यावर सर्वच पक्षांची कार्यलये आहेत. तर मंत्र्यांसाठी स्वतंत्र आणि प्रशस्त अशी दालने आहेत. अधिवेशनकाळात शासनाचे सर्व काम याच भवनातून चालते.

संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विजय चौक आणि लगतच राष्ट्रपती भवनाची भव्य वास्तू असल्याने हा संपूर्ण परिसर पर्यटकांसाठी अगदी आवडीचा परिसर ठरला आहे. त्यामुळेच येथे देशी पर्यटकांसोबत विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणावर दिसतात.

मंगेश वरकड

सौजन्य महान्यूज

Leave a Comment