
आपल्याकडील सर्व संतात- किंबहुना आपल्या परंपरेतील सर्व विचारवंतांत तुकाराम महाराज त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात. तुकाराम महाराज अध्यात्म, परमार्थ या विषयावर बोलतातच, पण व्यावहारिक गोष्टींबद्दलही ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या सूक्ष्म आणि मार्मिक व्यवहारज्ञानाबद्दल अचंबा वाटू लागतो. आपण तुकोबांना ओळखतो ते त्यांच्यापाशी व्यवहारज्ञान विशेष नव्हते, अशा चुकीच्या समजुतीने ! तुकोबांनी कोकणात मीठ विकायला नेले आणि कोकणातून मिरची घाटावर आणली, अशासारखे जे किस्से सांगितले जातात ते केवळ कपोलकल्पित आहेत. तुकोबांचे व्यावहारिक गोष्टीत मन गुंतलेले नव्हते हे खरे, पण त्याचा अर्थ ते व्यावहारिक तसेच प्रापंचिक ज्ञानात अगदीच ढ होते, असा नव्हे. त्यांनी विविध अभंगातून जो उपदेश केला आहे, जे मार्गदर्शन केले आहे ते इतक्या वरच्या दर्जाचे आहे की, नित्यनैमित्तिक व्यवहारज्ञानातले बारकावे अवगत असल्याशिवाय कोणीही इतके तपशीलवार बोलू शकणार नाही. आता हाच अभंग पाहा ना, हालवूनि खुंट। आधीं करावा बळकट ।। मग तयाच्या आधारें । करणें ते अवघें बरें ।। सुख दु:ख साहे । हर्षामर्षी भंगा नये ।। तुका म्हणे जीवें । आधीं मरोनि राहावें ।। तुम्ही ज्या खुंटीच्या आधारे काही काम करणार असाल, ज्या खुंटीला आपल्या ओढाळ मनाचें वासरु बांधणार असाल ती खुंटी आधी मजबूत असली पाहिजे. ती खुटी मजबूत असली की, तिच्या आधारे पुढील सर्व वागणे-सवरणे सोपे होते आणि ही खुंटी बळकट असली की, सुख-दु:खाची वा शोक अथवा आनंदाची फारशी तमा वाटत नाही. व्यवहारात, घराघरात, संसारात काही महत्त्वाचे आधार आवश्यक असतात. तपासून आपण आपल्या वागण्याची दिशा आणि पद्धती ठरविली पाहिजे. आपला नेमका अधिकार काय, आपली जबाबदारी काय ? याचा नीट विचार करुन वागत गेले की, सुखाच्या आणि आनंदाच्या प्रसंगात तसेच संकटाच्या किंवा चिंतेच्या काळात मनाचा समतोल ढळणार नाही .