Your Friends' Activity

Loading...

महाराष्ट्राच्या लोककलेचाच गौरव - सुलोचना चव्हाण

लावणी ऐकताना आपल्याला फार सोपी वाटते. परंतू, लावणी गाणे अत्यंत कठीण आहे. . मला स्वप्नातही वाटले नव्हते की मला लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येईल. या पुरस्कारामुळे मला जीवन सार्थक झाल्यासारखे वाटते आहे असे लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.

 


प्रश्न :- आपल्याला हा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाल्याचे कळल्यानंतर कोणत्या भावना मनात दाटून आल्या?

उत्तर :- मला पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. इतरांना पुरस्कार मिळाल्यानंतर तो त्यांच्या नशिबाचा भाग असे मी समजत असे. मला कोणाचाही हेवा वाटला नाही. माझा मुलगा विजू याने मराठी बातम्या ऐंकल्या तेंव्हा त्याला मला पुरस्कार जाहीर झाल्याचे कळले. मी स्वामींच्या फोटोकडे बघत होते.मला एकदम रडायला आले. मला स्वप्नातही वाटले नव्हते की मला पुरस्कार देण्यात येईल. या पुरस्कारामुळे मला जीवन सार्थक झाल्यासारखे वाटते आहे. या पुरस्काराने मला खरंच खूप मोठं केलं. आजपर्यंत मी कोणत्याच पुरस्काराची अपेक्षा ठेवून कधी गायले नाही. अमुक एक गाणं चांगलं झालंय म्हणून आपल्याला पुरस्कार मिळावा म्हणूनही मी कधी अपेक्षा केली नाही. लता मंगेशकरांच्या नावाचा पुरस्कार देऊन शासनाने माझ्यासारख्या कलावंताचं आणि महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या लोककलेचाच गौरव केला आहे..’

प्रश्न :- आपल्या कारकिर्दीची सुरुवात लहानपणीच झाली तेंव्हा आपण कोणती भूमिका बजावली होती?

उत्तर :- मी सहा-सात वर्षाची होते तेव्हापासून माझा या क्षेत्राशी संबंध आहे. यावेळी गरब्यामध्ये मी कृष्णाची भूमिका करायची. त्यानंतर गुजराती रंगभूमीवर मी काम करु लागली. मी उर्दू शिकले. लैला मजनू मध्ये मी छोटी मजनू बनले. त्यानंतर तामीळ पिक्चर, पंजाबी पिक्चर यामध्ये कामें केली. माझे मराठीचे वाचन खूप होते. कलेच्या आविष्कारातून व्यक्तीमत्व विकसित झाले. मी लहानपणी खूप रेकॉर्ड ऐकत असे. मी मराठी चौथीपर्यंत शिकले आहे. मला अभ्यासात अजिबात रस नव्हता. मेकपमन दांडेकर यांनी मला श्यामबाबू पाठक यांच्याकडे गाऊन दाखविण्यास सांगितले.त्यावेळी पाठक म्हणाले की लडकी बहुत अच्छा गाती है. त्यावेळी राजकमल स्टुडिओत मी आईबरोबर गाणे म्हणण्यासाठी गेले. तेथे मी झोपून गेले. थोडय़ावेळाने माझ्या तोंडावर पाणी मारुन मला उठविण्यात आले. मी गाणे म्हटले. मला ज्या गोष्टी जमत नव्हत्या त्याबद्दल डोक्यात धपाटा मारला जायचा. हळू हळू मी गाणे शिकले.

प्रश्न- आपल्या गायनाच्या कारकिर्दीला कधी प्रारंभ झाला ?

उत्तर :- खरं तर मी वयाच्या ११ व्या वर्षांपासून गायला लागलेय. संगीतकार जेव्हा गाणं बसवायचे तेव्हाच मला देण्यात आलेलं गाणं मी त्यांच्याबरोबर बसून शिकायचे. गाण्यातल्या मात्रा, ताल, शब्द सर्व काही तेव्हाच समजून घ्यायचे आणि मग गायचे. त्याकाळी मी हिंदी, पंजाबी, गुजराती गाणीही गात असे. लावणी ऐकायला खूप सोपी वाटते, पण ती म्हणायला खूप कठीण असते. लावणी म्हणताना त्यातील ताल, मात्रा आणि सुरांचा संगम साधण्याबरोबरच त्यातील शब्दांचे अर्थ समजून घेऊन मगच ती गायची असते. मला वसंत पवारांनी पहिली लावणी दिली ‘नाव-गाव कशाला पुसता, अहो, मी आहे कोल्हापूरची, मला म्हणतात लवंगी मिरची..’१९६२ मध्ये आलेल्या ‘रंगल्या रात्री’ या चित्रपटातली लावणी होती. जगदीश खेबूडकरांनी ती लिहिली होती आणि वसंत पवारांचे संगीत होते. या लावणीनंतर माझ्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. एकामागोमाग एक लावण्या मला मिळत गेल्या. ‘नाव-गाव कशाला पुसता’, ‘खेळताना रंग बाईचा होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘राग नका धरू सजना’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘लाडे लाडे बाई करू नका’ अशा एकापेक्षा एक सरस, ठसकेबाज लावण्या मी गायले आणि आचार्य अत्रे यांनी मला ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब दिला. जेव्हा ते मला म्हणाले की, मी तुला आजपासून ‘लावणीसम्राज्ञी’ म्हणूनच संबोधणार, तेव्हाही मी त्यांना- मला माझी लावणी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, इतकंच सांगितलं

प्रश्न :- लावणीचा सुगंध आमच्या हृदयात आम्ही साठविला आहे. देव, दैव, नशीब यावर आपला किती विश्वास आहे ?

उत्तर :- मला भरपूर प्रसिद्धी मिळाली. पैसाही मिळाला. कलाकार म्हणून नावलौकीक मिळाला. माणसाची वृत्ती चांगली हवी. परमेश्वर त्याच्या सतत पाठीशी राहतो. त्याला कसलीही भीती उरत नाही. आज मी जी काही आहे ती या समाजामुळेच आहे. आयुष्यभर या कलेची मी माझ्या परीने सेवा केली. आजही लोक मला धार्मिक संस्था वा सामाजिक कार्यासाठी निधी उभारण्यासाठी कार्यक्रम करण्याकरता बोलावतात, तेव्हा मी माझ्या कलाकारांच्या जाण्या-येण्याचे प्रवासभाडेच फक्त घेते. उर्वरित रक्कम त्यांच्या कार्यासाठी वापरावी, असं सांगते. कार्यक्रम, तसंच पुरस्कारांच्या मिळणाऱ्या पैशांपैकी काही हिस्सा मी नेहमीच गरीबांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही करणार आहे. दान देण्यात आनंद असतो.

प्रश्न :- तुमच्या लावणीच्या कार्यक्रमाच्यावेळी झालेला एखादा किस्सा सांगाल काय ?

उत्तर :- एकदा मी लावणी म्हणत होते. कसं काय पाटील बरं हाय का? असे म्हटल्यानंतर त्याचवेळी त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्या कार्यक्रमाच्या थिएटर मध्ये प्रवेश केला. त्यांना खूप हसू आले. परंतू त्यांनी ते आवरले. एकविरा देवीच्या डोंगराजवळ कर्नाटक लक्झरीने आमच्या बसला धडक दिली. माझ्या मुलाचा खांदा निखळला. तशा अवस्थेत तो समोरून येणार्‍या वाहनांतील माणसांना म्हणाला की, आम्हाला मदत हवी आहे. ती माणसे मदत द्यायला तयार नव्हती. अशावेळी त्याने त्यांना सांगितले की, आत्ता तुमच्याकडे रेडिओवर जी लावणी चालु आहे ती माझ्या आईने गायली आहे. माझी आई सुलोचना चव्हाण अपघातात सापडली आहे. तेव्हा त्या माणसांनी माझे नाव ऐकून आम्हाला तत्परतेने मदत केली. माझ्या नावाला खूप किंमत दिली.

प्रश्न :- आपल्याला आपल्या यजमानांकडून लावणी शिकविली जात होती असे आम्ही ऐकले आहे. आपले गुरू कोण ?

उत्तर :- मला के. सुलोचना म्हणून ओळखले जात होते. परंतू मला गाण्याचे शिक्षण मिळाले नसल्यामुळे मी मला जमेल तसे गात होती. माझ्या गाण्याला शास्त्रीय संगीताचा आधार नव्हता. तथापि, माझे मिस्टर श्री. चव्हाण यांनी मला अमुक शब्द कसा उच्चारायचा किंवा कुठल्या शब्दावर जोर द्यायचा असे शिकविले. त्यामुळे माझ्या लावणीत सुधारणा झाली. माझे यजमान माझे गुरु होते. नवऱ्याच्या आणि मुलांच्या पाठिंब्यामुळे मी संगीत क्षेत्र सांभाळू शकले. आज आनंद साजरा करण्यासाठी माझे पती हयात नाहीत याचं मला खूप दु:ख आहे. माझ्या यशाचं सर्व श्रेय माझ्या पतीचंच आहे. म्हणूनच शासनाने जाहीर केलेला हा पुरस्कार मी माझ्या पतींना अर्पण करते.’

प्रश्न- संगीतक्षेत्रात नव्याने करियर करू इच्छिणा-यांना आपणास काय सांगावेसे वाटते ?

उत्तर :- आज अनेक तरुण-तरुणी संगीत क्षेत्रात करीअर करण्यासाठी म्हणून येत आहेत. पण संगीतातलं करीअर याचा अर्थ एक-दोन गाणी, एक-दोन चांगले चित्रपट करणं नव्हे. तुम्ही संगीताची मनापासून सेवा व भक्ती केलीत तरच सरस्वती तुमच्यावर प्रसन्न होते. म्हणून आजच्या पिढीला मी हेच सांगेन की, कोणत्याही पुरस्कारासाठी म्हणून कधीच काम करू नका. पुरस्कार मिळवणे, पैसा मिळवणे हे तुमचे लक्ष्य ठेवू नका. कलाकार म्हणून चार पैसे मिळाले की त्यातील दोन पैसे गरीबांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा. आपल्याला समाजाचंही काहीएक ऋण फेडायचं आहे, हे लक्षात असू द्या.

 

सौजन्य- महाबात्म्या

संबंधित माहिती