साबणाच्या फुग्यातून पाठविता येणार संदेश

भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ प्रो. श्रीराम सुब्रह्मण्यम यांनी साबणाच्या फुग्यातून प्रतिमा आणि माहिती पाठविता येईल असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीत प्रोफेसर असलेल्या सुब्रह्मण्यम यांनी या तंत्रज्ञानाला मल्टी सेन्सर टेक्नॉलॉजी- सेन्सा बबल असे नांव दिले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माहिती वाहून नेणार्‍या या साबणाच्या फुग्यांचा मार्ग नियंत्रित करता येतो तसेच या फुग्यांचा ट्रेसही घेता येतो.

यासाठी ठराविक साईजचे आणि ठराविक फ्रिक्वेन्सी असलेले व एक प्रकारचा अपारदर्शक सुगंधी धूर असलेले साबणाचे फुगे त्यांनी वापरले आहेत. या क्रोनो सेन्सरी मिड एअर डिस्प्ले सिस्टीमच्या सहाय्याने माहिती पाठविता येते तसेच या फुग्यांवर प्रतिमा लोड करून त्याही पाठविता येतात. अर्थात फुगा फुटेपर्यंतच ही प्रतिमा राहू शकते. मात्र फुगा फुटला की त्यातून जो सुगंध येतो तो दीर्घकाळ पर्यंत रेंगाळत राहतो. या सुगंधाच्या विविध प्रकारच्या वासांवरून माहिती काय असावी याचा अंदाज घेता येतो.

माणसाची वास घेण्याची क्षमता फारच पॉवरफुल असते. त्या क्षमतेचा वापर करून घेण्याच्या दृष्टीने टाकले गेलेले हे पहिले पाऊल आहे असे संशोधकाचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर अनेक क्षेत्रात करता येऊ शकेल. उदाहरणार्थ घड्याळासाठी प्रत्येक तासाचा वेगळा सुगंध देणारा बबल उपयुक्त ठरू शकतो. यातून मुलांसाठी गणिती खेळ तसेच शैक्षणिक खेळही तयार करता येऊ शकतात. एप्रिल २६ रोजी टोरंटोत भरणार्‍या परिषदेत याचे प्रात्यक्षिक आणि पेपर सादर केला जाणार आहे.

Leave a Comment