सांसदीय की अध्यक्षीय?

भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरंेंद्र मोदी यांची भाजपाने पंतप्रधानपदाची उमेदवार म्हणून निवड केली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आपला प्रचार करत आहे. मात्र काही लोकांनी या पध्दतीकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पहायला सुरूवात केली आहे. अशाप्रकारे निवडणुकीच्या आधीच उमेदवाराचे नाव जाहीर करणे हा घटनेचा भंग आहे असे म्हणण्यापर्यंत काही अतीशहाण्या लोकांची मजल गेली आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणे हे घटनेला सोडून आहे असे त्यांचे म्हणणे आहे. असा उमेदवार जाहीर करून भाजपाने काही पहिल्यांदाच निवडणूक लढवलेली नाही. यापूर्वी कॉंग्रेस पक्षामध्ये इंदिरा गांधी यांच्या नावाने निवडणुका लढवल्या जात असत. १९६७, ७१, ७७ आणि ८० या लोकसभा निवडणुका इंदिरा गांधी पंतप्रधान होणार असे जाहीर करूनच झालेल्या होत्या. १९७९ साली तर जनता पार्टीने आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार जगजीवनराम हे असतील असे पोस्टरवर छापून निवडणूक लढवली होती.

भारतीय जनता पार्टीने तोच प्रयोग केलेला आहे. मात्र भाजपाचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधकांचा जळफळाट सुरू आहे आणि त्यांनी हा सारा प्रकार घटनाबाह्य असल्याचा थयथयाट सुरू केला आहे. अशा लोकांमध्ये कॉंग्रेसच्या समर्थकांचा भरणा आहे. वास्तविक पाहता कॉंग्रेसनेसुध्दा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची तयारी केली होती. चार राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सोनिया गांधी यांनीसुध्दा आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले होते आणि तो उमेदवार म्हणून राहुल गांधींचे नाव जाहीर करण्याची तयारीसुध्दा झालेली होती. परंतु पक्षाच्या धुरीण नेत्यांनी राहुल गांधी मोदींसमोर फिके पडतील असा इशारा दिला आणि परिणामी पक्षाने तशी घाई केली नाही. मात्र राहुल गांधी हे त्यांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जवळ जवळ स्पष्ट आहे. त्यांनीसुध्दा पक्षाच्या खासदारांनी आपल्यावर जबाबदारी टाकल्यास आपण ती स्वीकारू असे म्हणून आपल्या या उमेदवारीवर शिक्कामोर्तबच केले आहे.

असे आहे तर नरेंद्र मोदींच्या नावालाच एवढा घटनाबाह्य म्हणून विरोध करण्याचे कारण काय हे समजत नाही. जयललिता यांनी आपणच पंतप्रधान होऊ असे जाहीर केले आहे. तिकडे अण्णा हजारे यांनीसुध्दा ममता बॅनर्जींच्या नावाची घोषणा केली होती. मुलायमसिंग यादव मायावती यांनीसुध्दा पंतप्रधान होऊ इच्छित असल्याचे बरेचवेळा जाहीर केलेले आहे. शरद पवार तर १९९१ सालपासून दर निवडणुकीत उमेदवार असतात. कॉंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची वेळ आली तेव्हा पी. चिदंबरम् यांनीसुध्दा असा उमेदवार जाहीर केला पाहिजे असे म्हटले होते. कारण लोक असा प्रश्‍न विचारतात की तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहात त्याचे उत्तर म्हणून आपला नेता ठरलेला असला पाहिजे असे चिदंबरम् म्हणाले होते. त्यात काही चूक नाही. पण काही तथाकथित घटनातज्ञ उगाचच आरडाओरडा करत आहेत. भारतात निवडून येणारे खासदार पंतप्रधान निवडतात. तेव्हा त्याच्या आधीच पंतप्रधान कसा निवडला असा त्यांचा आक्षेप आहे. पण भाजपाने ही पध्दत नाकारलेलीच नाही. पंतप्रधानाची निवड खासदारांनी करावी हे तर मान्यच आहे. घटना अमान्य केलेली नाही.

मात्र भाजपाचे खासदार बहुसंख्येने निवडून आले तर ते आपला नेता म्हणून मोदींना निवडतील असे आधीच सांगितलेले आहे. यात घटनेची पायमल्ली झालेली नाही. नरेंद्र मोदी हे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला सरकार बनवण्याची संधी मिळेल तेव्हा भाजपाचे खासदार उमेदवार म्हणून मोदीला पुढे करतील असे सांगितलेले आहे. म्हणजे मोदी हे भाजपाचे नेते आहेत. हे उघड आहेे. भारतीय जनता पार्टीचा हा प्रयोग चुकीचा नाही कारण पंतप्रधान हा भारताचा कार्यकारी प्रमुख असतो आणि देशाचा कारभार पंतप्रधानाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते पंतप्रधान कोणाला करावे याबाबत अंधारात चाचपडत होते आणि त्यांनी अचानकपणे मनमोहनसिंग यांचे नाव पुढे आणून त्यांना पंतप्रधान केले. त्याचे परिणाम काय झाले हे आपण बघत आहोत. त्यामुळे देश समर्थ पंतप्रधानाची मागणी करत आहे आणि तो समर्थ पंतप्रधान भाजपाला नरेंद्र मोदी यांच्यात सापडलेला आहे. तो जनतेलासुध्दा पसंत आहे. म्हणून विरोधकांचा जळफळाट सुरू आहे.

Leave a Comment