वाघाला पहायचंय, चला बोरला

tiger3

रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे वैतागलेलो… फुरसत मिळताच पर्यटनाला जावे अन मनाला `रिचार्ज` करावे असा विचार सुरू असल्याने नविन जागांचा शोध घेत होतो. यावेळी मात्र जंगलभ्रमंती करायची असे ठरविलेले असल्याने जंगलभ्रमंतीसाठी ठिकाणं शोधत होतो. विदर्भात असल्यानं विदर्भाकडे निघणं चांगलं असा व्यावहारिक विचार केला. विदर्भातील वनवैभव सर्वांनाच साद घालते. वर्धा जिल्हा जसा गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या नावाने ओळखला जातो तसाच तो येथील वन वैविध्यामुळे ओळखला जातो. यात प्रमुख आहे तो बोर अभयारण्य प्रकल्प.बोरला जायचे ठरविले अन तयारीला लागलो.
Borela
वर्धा मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर बोर नदीवर मोठं धरण बांधण्यात आलय. या प्रकल्पाच्या आसपास ३२३७ हेक्टर क्षेत्रात या जंगलाचा विस्तार आहे. या जंगलात जाण्यासाठी वर्धेहून सेलूमार्गे हिंगणीकडून जाता येते. त्याचप्रमाणे नागपूरहून येताना आपणास केळझर मार्गेदेखील जाणं शक्य आहे.वर्धा हे मोठे जंक्शन आहे येथे वर्धा पूर्व अर्थात सेवाग्राम आणि वर्धा अशी दोन रेल्वे स्थानक आहेत. वर्धा येथे थेट रेल्वेने येणे शक्य आहे. मुंबईहून नागपूर येथे विमानसेवा उपलब्ध आहे. नागपूर पासून आपणास वाहनाने या ठिकाणी येणं शक्य आहे.
Borela1
या जंगलातील एकूण ६१ चौरस किलोमिटर क्षेत्रात असणार्‍या ३२३७ हेक्टर क्षेत्रापैकी २२१३ किलोमीटर क्षेत्र हे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर ६६० हेक्टर क्षेत्र सामान्य जंगल आहे.
या ठिकाणी मिश्र पध्दतीचे जंगल आपणास दिसते वन खात्याने उच्च श्रेणी घोषित केलेल्या सागवान, तेंदू, बांबू यासारख्या वृक्षांसह येथे मोहाचीही झाडे मोठय़ा प्रमाणावर असल्याने तो उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे.

वन्यजीव हे या अभयारण्याचं मुख्य आकर्षण आहे. यात पट्टेरी वाघ, बिबटे, वायसन, निलगाय, सांबर, हरिण चिंकारा, माकडं, जंगली कुत्रे यासोबतच अस्वलं मोठय़ा प्रमाणावर आहेत यात आकर्षण आहे ते अर्थातच पट्टेरी वाघ आणि मोरांचं.
पावसाळ्यात मन प्रसन्न करुन टाकणारे वातावरण इथं असतं. पावसाच्या आगमनाचं स्वागत करताना मोरांचा फुललेला पिसारा आपलं मन देखील प्रफुल्लीत करुन टाकतो. हे टिव्हीवरच्या वृत्तपटात पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात बघणं केंव्हाही उत्तम.
येथील राखीव क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात गोंड समाजाची वस्ती मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांची जीवनशैली अभ्यासण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येत असतात. या गोंड समाजाची जीवनशैली खरोखरच वेगळी अनुभूती देणारी आहे. हे क्षेत्र अभ्यायारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पूर्वीच्या काळात येथे शिकारीसाठी येणारे अनेकजण होते. आता मात्र यायचं तर पर्यटक म्हणूनच यावं हे लक्षात ठेवावं आणि सर्वात महत्वाचं भारतात दुर्मिळ झालेल्या पट्टेरी वाघाचं दर्शन ही पर्वणीच असते. म्हणूनच बोर अभ्यायारण्य पर्यटकांसाठी पर्वणी आहे.

या ठिकाणी पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एक रिसॉर्ट उभं केलय येथे. दहा अद्ययावत डबलबेड च्या रुमसह ३ आरामगृह आहेत. सोबत एक उपहारगृह देखील आहे. येथे भारनियमनाची समस्या जाणवू नये यासाठी स्वतंत्र जनरेटरचे व्यवस्था करण्यात आलेली आहे. असं हे बोर अभयारण्य वनपर्यटनात आता सर्वासाठी आकर्षण ठरतयं. आपण कधी येताय ?

1 thought on “वाघाला पहायचंय, चला बोरला”

Leave a Comment