राष्ट्रवादीचे काय होणार?

शिवसेनेचे खासदार मोहन रावले शिवसेना सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले परंतु ते राष्ट्रवादीच्या तंबूत महिनाभरसुध्दा राहू शकले नाहीत. शिवसेनाविना माझा श्‍वास कोंडला जात आहे असे म्हणत रावले पुन्हा शिवसेनेत परत आले.  रावलेंना शिवसेनेतून फोडून पवारांनी मोठा विजय मिळविल्याचा आव आणला होता. मात्र तो फार दिवस टिकला नाही आणि त्यांचा डाव त्यांचावर उलटला. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सध्या फार वाईट अवस्था झाली आहे. पवारांनी हा पक्ष स्थापन करताना जी स्वप्ने पाहिली होती आणि जे दावे केले होते ते काही खरे ठरण्याची चिन्हे दिसत नाहीत. या पक्षाच्या दीड दशकाच्या वाटचालीचा आढावा घेतला असता फार वाईट चित्र समोर येते. पवारांच्या पक्षामागे पवार या व्यक्तीचे फार मोठे बळ आहे.  किंबहुना पवार म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजेच पवार. असे समीकरणच आहे. या पक्षाचे नंतर काय होईल हे माहीत नाही. परंतु या निवडणुकीत तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी वाताहत झालेली दिसेल. असे चित्र समोर दिसत आहे. एकेकाळी शरद पवार यांनी  महाराष्ट्राच्या चारही भागात आपल्या पक्षाचे संघटन व्यवस्थितपणे वाढविण्याचे प्रयत्न केले होते. पण आता त्यांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या चारही भागामध्ये असा एकेक मोठा दणका बसलेला आहे की त्यातून सावरायला या पक्षाला बरीच वर्षे लागतील. 

पवारांचे अनुयायी पवार इज पॉवर असे मनःपूर्वक मानत असतात. पण पॉवर म्हणजे शक्तीचे एक वैशिष्ट्य असे असते की ती कधी ना कधी क्षीण होत असतेच. महाराष्ट्राचे राजकारण करावे तर पवारांनीच. असे त्यांचे समर्थकच नव्हे तर त्यांचे विरोधकसुध्दा मानतात. ते आपल्या पक्षाच्या लहानसहान कार्यकर्त्यालासुध्दा नावाने ओळखतात आणि एखाद्या अशा कार्यकर्त्याला अनपेक्षितपणे पवारांनी नावाने हाक मारली की तो त्यांच्यावर एवढा फिदा होतो की जन्मभर पवारांचा कार्यकर्ता म्हणवून घेतो. शरद पवार हे सध्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इतक्या कटुतेने आणि तुच्छतेने बोलत आहेत की त्यांचा नरेंद्र मोदीवर काही वैयक्तिक राग आहे की काय असे वाटावे. राजकीय निरीक्षकांनी याचा छडा लावायचा प्रयत्न केला आहे परंतु काही थांग लागत नाही. कदाचित देशात मोदी लाट असल्यामुळे आपल्या पक्षाची वाताहत होत आहे.  असे पवारांना वाटत असावे. म्हणून ते मोदींवर सातत्याने दात खायला लागले आहेत. पवार साहेबांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण ५० वर्षांपासून राजकारणात आहोत. 

एखादा नेता असा दीर्घकाळ राजकारणात प्रभावी असलाच पाहिजे का? आणि प्रदीर्घकाळ एकेक नेते प्रभावी राहिले तर राजकारणात नवे रक्त येणार कसे? आपण ५० वर्षे राजकारण केले. आता या राजकारणात मोदी प्रभावी होणार किंवा अन्य कोणीतरी आपल्या वयापेक्षा कनिष्ठ असलेला नेता राजकारणात चमकणारच. तो नवा नेता चमकला म्हणून आपण त्याचा द्वेष करता कामा नये. उलट राजकारणात नवे रक्त येत असेल तर त्याचे मनमोकळेपणाने स्वागत केले पाहिजे. मग ते येणारे नवे रक्त आपल्याच घरातले असले पाहिजे असा अट्टाहास करून चालणार नाही. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या पैकी कोणीही राजकारणात फार मोठी झेप घेऊ शकतील असे चित्र काही दिसत नाही. त्यामुळे मोदींचा उदय पवारांच्या मत्सराला कारणीभूत ठरला असावा. देशाच्या राजकारणात आपल्याला जे स्थान मिळणे अपेक्षित आहे ते आपण प्राप्त करू शकलो नाही आणि या निवडणुकानंतर सुध्दा आपल्याला ते प्राप्त होण्याची शक्यता नाही. हाही त्यांच्या वैषम्याचा विषय असणार आहे. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे चित्र पाहिले तर कोणलाही पवारांची दया येईल. कारण त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणावर बेशिस्त, मनमानी आणि पक्षश्रेष्ठींना न जुमानण्याची प्रवृत्ती वाढली आहे. दीपक केसरकर हे त्याचे उत्तम उदाहरण. 

केसरकर हे १९९९ पासून पवारांच्या सोबत होते. परंतु त्यांनी आपल्या नारायण राणे विरोधी भूमिकेच्या बाबतीत पवारांनी सांगून सुध्दा तडजोड केली नाही. स्वतः शरद पवार त्यांना भेटायला  गेले तरीही केसरकर बधले नाहीत. पवारांच्या भेटीत केसरकरांनी चक्क आपला राजीनामा त्यांच्या हाती ठेवला. केवळ केसरकरच नाहीतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला पण आपली भूमिका सोडली नाही. या आपल्या कार्यकर्त्यांची मनःस्थिती जाणून घेण्यात पवार कोठे कमी पडले का ? या सगळ्या कार्यकर्त्यांची नावे पवारांना तोंड पाठ असतील पण त्या स्मरणशक्तीचा मनःस्थिती जाणून घेण्यास काही उपयोग झालेला नाही. महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात अनेक पक्षांतरे झाली. पण राष्ट्रवादी पक्षात झालेली पक्षांतरे पवारांच्या जिव्हारी लागावीत अशी आहेत. नामवंत पत्रकार कुमार केतकर यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी असलेले विनायक मेटे यांना पवार आणि आर. आर. पाटील यांनी सांभाळून घेतले. इतके ते पवारांचे लाडके होते. पण ते भाजपाच्या मागे गेले. पक्षाचा आदिवासी चेहरा म्हणवले जाणारे विजयकुमार गावीत यांनीसुध्दा आपल्या मुलीच्या भवितव्याचा विचार करून भाजपात प्रवेश केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले मोहन रावले  १५ दिवसांत पुन्हा शिवसेनेत परतले. ही तर ठळक उदाहरणे आहेत. महाराष्ट्राच्या गावागावामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय करत आहेत. याचा पक्षाला पत्तासुध्दा नाही. शरद पवारांना या निवडणुकीत मोठ्या दारूण पराभवाला सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Comment