
मुंबई, दि. १८ – राज्यातील आठ प्रशासकीय अधिकार्यांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. तर गुरूवारी दोन सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या गेल्या. विजय नहाटा यांच्याकडे कोकण महसूल विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सध्या त्यांच्याकडे असलेला राज्याच्या मराठी भाषा विकास विभागाचा कार्यभार राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक प्रमोद नलावडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
तसेच आरोग्य विभागाचे सचिव भूषण गगराणी यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु आरोग्य विभागाचे सचिवपद त्यांच्याकडेच असणार आहे.
राज्याच्या अर्थ विभागाचे सचिव म्हणून यापुढे के. शिवाजी कार्यभार सांभाळतील. त्यांच्याकडे सध्या असलेला उद्योग विभागाचा कार्यभार देखील कायम ठेवण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रंगा नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड महानगरपालिकेचे आयुक्तपद जी. श्रीकांत सांभाळतील. तर जिजाऊ मिशनच्या कार्यकारी संचालिका म्हणून वंदना कृष्णा यांना नियुक्त कऱण्यात आले आहे.
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव म्हणून जयराज फाटक यांच्या जागी नंदकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव म्हणून एस. एस. संधू यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून श्रीकर परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. तर श्वेता सिंघल या हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या आहेत.
