युक्रेन गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर

कीव – युक्रेन सध्या गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. रशियन समर्थक फुटीरतावाद्यांविरूद्ध कारवाईसाठी युक्रेनने लष्कर पाठवल्यानंतर पुतीन यांचे हे विधान आले आहे.पुतीन यांनी जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांच्याशी दूरध्वनीवर बातचीत केली. ताज्या घटनाक्रमाने युक्रेनला गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे, असे पुतीन यांनी मर्केल यांना सांगितले. उभय नेत्यांनी अमेरिका, युरोपीय संघ, रशिया आणि युक्रेनच्या ज्येष्ठ राजनैतिक मुत्सद्यांमध्ये वाटाघाटी घडून आल्या पाहिजेत, या मुद्द्यावर जास्तीचा भर दिला. युक्रेनमधील 10 शहरांतील सरकारी इमारतींवर रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी कब्जा केला आहे. हा परिसर युक्रेनच्या अवजड उद्योगाचे माहेरघर आहे.

अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रे समर्थक युक्रेन सरकारने स्लाव्हियांस्कच्या दिशेने 20 रणगाडे आणि लढाऊ वाहने पाठवली आहेत. रशियाने त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मात्र, अमेरिकेने त्याचे समर्थन केले आहे.युक्रेनच्या पूर्वेकडील स्लाव्हियांस्क शहरात बुधवारी लष्कराचे रणगाडे आणि चिलखती वाहने शिरली. त्या वाहनांवर रशियाचा राष्ट्रध्वज लावलेला आहे. प्रत्येक वाहनावर काही सैनिक बसलेले होते. ही सर्व वाहने टाउन सिटी हॉलच्या बाहेर थांबली. टाउन सिटी हॉलवर फुटीरतावाद्यांचा कब्जा आहे.

रशियाने स्वतंत्रतावाद्यांच्या आडून युक्रेनमधील दहशतवाद्यांची निर्यात बंद करावी, युक्रेनच्या लष्करावरील हल्ले आणि सरकारी इमारतींवर ताबा घेण्याचे उद्योगही थांबवावेत, अशी मागणी युक्रेनचे पंतप्रधान आर्सेनी यात्सेनुक यांनी रशियाकडे केली आहे.जर्मनीने मंगळवारपासून युक्रेनला नैसर्गिक गॅसचा पुरवठा सुरू केला. मागील आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचा नैसर्गिक वायू पुरवठा रोखण्याची धमकी दिली होती. युक्रेनने आधी दिलेल्या गॅसची थकबाकी जमा करावी तरच गॅस देणे सुरू ठेवता येईल, असे पुतीन म्हणाले होते.

रशिया समर्थक फुटीरतावाद्यांविरुद्ध लष्करी कारवाई करण्याच्या युक्रेनच्या निर्णयाचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी समर्थन केले आहे. कायदा व सुव्यव्यस्था कायम राखणे ही युक्रेनच्या सरकारची जबाबदारी आहे. फुटीरतावाद्यांनी ज्या सरकारी इमारती ताब्यात घेतल्या आहेत, त्या त्यांनी रिकाम्या केल्या तरच वातावरण निवळू शकते, असे व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव जे. कार्ने यांनी म्हटले आहे.

Leave a Comment