मोदींशी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेत वाढता दबाव

दरवर्षीप्रमाणेच यंदाही सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क येथे भरणार्‍यां यूएनच्या जनरल असेब्लीचे निमित्त साधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण द्यावे यासाठी व्हाईट हाऊस आणि ओबामा प्रशासनावर दबाव वाढत चालला असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात नऊ फेजमध्ये होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अशा वेळी अमेरिकेतील अनेक तज्ञ नागरिक, सल्लागार, कायदेतज्ञांनी भारताकडे अमेरिकेने अधिक लक्ष पुरविले पाहिजे यासाठी आग्रह धरू लागले आहेत. निवडणुकांसंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या सर्वेक्षणांनुसार भाजप आघाडी यंदा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी मोदी पंतप्रधान  बनलेच तर ओबामांनी  भारताबरोबरचे संबंध वाढविण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे तेथील जाणकार तज्ञांचे मत आहे.

गेली कांही वर्षे अमेरिका भारत संबंध फारसे सुरळीत राहिलेले नाहीत आणि अमेरिकेनेही हे संबंध सुधारावेत यासाठी विशेष लक्ष दिलेले नाही. अशा वेळी ओबामांनी पुढाकार घेऊन यूएनच्या असेब्लीत मोदींना आमंत्रण करणे सूज्ञपणाचे असेल असे या तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधातील तणाव कमी होण्यास मदत होईलच पण मोदी व्हीसा प्रकरणी झालेला इश्यू निवळल्यासही त्यामुळे मदत मिळेल असे सांगितले जात आहे.

वरीष्ठ विश्लेषक डॉ. स्टीफन कोहेन यांनी तर मोदींशी सार्वजनिक संपर्क साधायला ओबामा यांना अवघड वाटत असेल तर त्यांनी खासगी पातळीवर संपर्क साधावा असेही मत व्यक्त केले आहे. यूएस इंडिया पोलिटिकल अॅक्शन कमिटी संघटनेच्या प्रतिनिधींनीही मोदीना आमंत्रण देण्याचे महत्त्व ठळक करून सांगितले असून अमेरिकेच्या प्रांताप्रांतातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणांतूनही हेच निष्कर्ष निघाले असल्याचे समजते.

Leave a Comment