मतदानापूर्वीच युपीएला पवारांचा तिस-या आघाडीचा सुरूंग

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत देशाचे नेते असलेल्या शरद पवारांना सूर सापडलाच नाही. त्यामुळेच त्यांची प्रत्येक टप्प्यावर फक्त चाचपणी सुरू होती. एकीकडे काँग्रेसबरोबर आघाडी धर्म पाळा असे आपल्याच पक्ष कार्यकर्त्यांना बजावणारे पवार मात्र खुद्द महाराष्ट्रातील मतदान पूर्ण होण्याअगोदच तिस-या आघाडीबरोबर जाण्याचे सूतोवाच करून बसले. पण त्यामुळे त्यांनी युपीएला तिसरी आघाडी नावाचा सुरूंग लावल्याचेही स्पष्ट झाले आहे. तिस-या आघाडी हा पवारांचा जुना हातखंडा प्रयोग असला तरी तेही तो यशस्वी करून दाखवू शकलेले नाहीत.

शरद पवार यांनी सुरूवातीपासूनच महाराष्ट्रात त्यांचा वावर ठेवला आहे. इथे त्यांनी काँग्रेस बरोबर अघाडी करून निवडणूक एकत्रित लढवली असल्याने ते कालपर्यंत ही देशाची निवडणूक आहे. देशाच्या निवडणुकीत आघाडी धर्म पाळला पाहिजे असे त्यांच्याच पक्षाच्या लोकांना कधी प्रेमाने तर कधी दरडावून सांगत होते. पण निवडणुकीत याचा फारसा परिणाम झालेला दिसलाच नाही.

मुंबईत राहुल गांधी यांच्या बरोबर एक व्यासपीठावर येण्याचेही त्यांनी खुबीने टाळले. त्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड केला. राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल आणि एकंदरीतच कुवतीबद्दल पवार सुरूवातीपासूनच संशय व्यक्त करत होते. तो त्यांनी काल कृतीतून मुंबईत दाखवला.

एकंदर निवडणुकीचा आणि इतक्या सभा घेतल्यानंतर मतदारांचा अंदाज आल्यामुळेच पवारानी तिस-या आघाडीबरोबर जाण्याचे सूतोवाच कालच मुंबईत करून टाकले. त्याचबरोबर निवडणुकीनंतर युपीएच्या बिघाडीचेही संकेत त्यांनी अप्रत्यक्षपणे दिले. या निवडणुकांदरम्यान त्यांनी मोदींचे कौतुक करून मिडियाचा फोकस आपल्याकडे वळवण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला.  त्यामुळेच आता त्यांनी उघडपणे तिस-या आघाडीबरोबर जाण्याचे जाहीरच करून टाकले आहे.

तिस-या आघाडीची नेट प्रॅक्टीस

खुद्द शऱद पवारांनी 1978 साली विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्याच पाठीत खंजीर खूपसून महाराष्ट्रात तिस-या आघाडीची मोट बांधून नेट प्रॅक्टीस केली आहे. त्यावेळी ते पहिल्यांदा ते तरूण वयात मुख्यमंत्री झाले. त्यावेळच्या पवारांच्या तिस-या आघाडीत त्यांच्या एस काँग्रेसबरोबरच समाजवादी आणि जनसंघाचे प्रामुख्याने लोक होते. त्यानंतर शिवसेना, शेकाप सारखे लहानलहान पक्ष होते. पण त्यावेळी देशात जनतापार्टीचे सरकार केंद्रात होते आणि आज काँग्रेसचे युपीएचे सरकार केंद्रात आहे हाच फरक आहे पवारांच्या त्यावेळच्या आणि आताच्या तिस-या आघाडीत. पण मतदान होण्याअगोदरच तिस-या आघाडी सोबत जाण्याचे सांगून पवारांनी यूपीएला सुरूंग लावला हे नक्की. पण त्यावेळी पवार पाचवर्षे स्थिर सरकार महाराष्ट्राला देऊ शकले नव्हते. मात्र सोनिया गांधी यांनी युपीएच्या माध्यामतून देशाला दहा वर्षे स्थिर सरकार दिले आहे.

महाराष्ट्रातील मतदान पूर्ण होण्याला काही तासच बाकी असतानाही पवारांनी तिस-या आघाडीबरोबर जाण्याचे जाहीर करून युपीएची बिघाडी निश्चित केली आहे. नेहमीच बोलताना मोजून मापून बोलणारे पवार इतक्या उघडपणे तिस-या आघाडीबरोबर जाऊ असे म्हटल्यावर आपल्याबद्दल अगोदरच शंका येऊ नये म्हणून त्यांनी नंतर युपीएला मित्र पक्ष मिळतील असे सांगत सारवासारवी केली. पण त्याला फारसे महत्व राहिले नाही.

देशात गेल्या दोन तीन निवडणुका तिस-या आघाडीचे वारे निवडणुकीच्या अगोदर वाहत असत आणि नंतर ते थांबतात. पण सत्ता स्थापनेच्यावेळी मात्र याच तिस-या आघाडीची साधी चर्चाही कधी होता नाही, झालेली नाही. कारण या तिस-या आघाडीची मोट बांधण्याची धमक असलेला नेताच सध्या राहिलेला नाही. या तथाकथित तिस-या आघाडीत जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षांच्या प्रमुखांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे देशात तिसरी आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वीच तिचे विसर्जन झालेले असते हा इतिहास आहे.

 

Leave a Comment