
नवी दिल्ली दि.३०- राजकीय अनागोंदी असली तरी भारताची अर्थव्यवस्था आणि विकासदर वाढताच राहणार असल्याचा विश्वास एनआरआय उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी व्यक्त केला आहे. जगातील सर्वात मोठे पोलाद निर्माते आणि लंडनमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेले मित्तल भटिंडा येथे बोलताना म्हणाले की भारताची विकासाची क्षमता प्रचंड आहे आणि आमची विकासाची प्रक्रिया सतत सुरूच आहे.
भारतात सरकारकडून मंद गतीने निर्णय घेतले जातात, नियोजनाचा अभाव आहे असे सांगितले जात असले तरी भारताची अर्थव्यवस्था ही आशियातील तीन नंबरची व्यवस्था असून ती वाढतीच राहणार आहे. राजकारणात कांहीही होऊ दे, तुम्ही त्याला अर्धांगवायूचा झटकाही म्हणा पण भारताचा विकास आणि आर्थिक प्रगती उज्ज्वल आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. भारताचा विकास दर कमी होण्यामागे युरोपियन युनियनचा मंदावलेली अर्थव्यवस्था हेही कारण आहे हे विसरता कामा नये.
२००८ सालात आलेल्या जागतिक मंदीत भारताची अर्थव्यवस्था जगाच्या स्पर्धेतून हद्दपार होईल असे भाकित केले गेले होते, तशी सर्वांना खात्रीच वाटत होती. पण आम्ही हद्दपार झालो तर नाहीच पण टिकलोही असे सांगून मित्तल म्हणाले की गेल्या एक दीड वर्षात आमचा विकास थोडा मंदावला आहे पण त्याला ढासळलेली जागतिक अर्थव्यवस्थाही कारणीभूत आहे.भारताचा ७ ते ७.७५ टक्के असलेला विकासदर हा जगाला हेवा वाटावा असाच आहे. भारताबरोबर तुलना होत असलेल्या ब्राझीलचा विकासदर ३ ते ४ टक्के इतकाच असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.
आजचा भारत म्हणजे वीस वर्षांपूर्वीचा चीन आहे असे विधान करतानाच त्यांनी भारताचा बेंचमार्क चीन असता कामा नये तर तो अमेरिका असला पाहिजे असेही मत व्यक्त केले. भारताचे सामर्थ्य वेगळे आहे.आमच्याकडे सुशिक्षित, हुषार, बुद्धीमान तरूण वर्ग आमच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के इतका आहे आणि हे भारताचे बलस्थान आहे. विकसित देशात जेथे विकास खुंटला आहे त्यांच्यासाठीही आम्ही कांही करू शकतो असेही ते यावेळी म्हणाले.
मित्तल यांनी आपली कंपनी अधिग्रहण आणि विलीनीकरण करताना फक्त व्यावसायिक विचारच करते असे सांगितले. जेथे व्यवसायाची संधी आहे ती मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि जगभर आज आमचा व्यवसाय विस्तार आहे असेही ते म्हणाले.
