प्रांजळपणाच पण…

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या युपीए आघाडी सरकारच्या कारभाराबद्दल जनतेत नाराजी आहे हे प्रामाणिकपणे मान्य केले. खरे म्हणजे ही गोष्ट राहुल गांधींनी का सांगावी हा प्रश्‍नच आहे. या सरकारचे पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी अजूनही सगळ्या गोष्टीचे खापर विरोधी पक्षांवरच फोडत आहेत पण राहुल गांधी मात्र सत्य बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या सत्य बोलण्यात मात्र पुरेसा प्रामाणिकपणा नाही. आपल्या सरकारचा कारभार चांगलाच आहे पण त्यावर जनता नाराज आहे. असा त्यांच्या बोलण्याचा सूर आहे. आपल्या सरकारचा कारभार वाईट आहे हे ते मान्य करत नाहीत. मात्र त्यांना पराभवाची चाहूल लागली आहे ही गोष्ट त्यांनाही नाकारता येत नाही. याचा अर्थ त्यांना पराभवाचा अंदाज आला आहे परंतु पराभवामागच्या खर्‍या कारणांचा शोध घेण्याच्या बाबतीत ते म्हणावे तेवढे प्रामाणिक नाहीत. मुळात राहुल गांधी यांची मुलाखत मोदींवर मात करण्याच्या भूमिकेतून घेतली गेली आहे. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, दृष्टीकोन आणि प्रशासनाचा अनुभव यामध्ये मोठे अंतर आहे आणि त्यामुळे मोदी आणि राहुल गांधी यांच्या मुलाखतींची तुलना झाली की, राहुल गांधी फिके पडतात.

त्यामुळे त्यांच्या मुलाखतीचा कॉंग्रेस पक्षाला पाहिजे तसा लाभ होत नाही. अशा या प्रभावहीन मुलाखती, सभांना होणारी मोजकीच गर्दी यामुळे आपला पराभव होणार याची जाणीव राहुल गांधी यांना झाली आहे. काल दिलेल्या एका मुुलाखतीत त्यांनी जनता युपीए आघाडीच्या सरकारवर नाराज आहे हे स्पष्टपणे मान्यच केले. परंतु हे मान्य करताना सुद्धा त्यांची शेखी संपलेली नाही. आपल्या सरकारने फार छान काम केलेले आहे, परंतु ते आपण लोकांना सांगू शकलो नाही म्हणून लोक नाराज आहेत, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यांच्या याही बचावाचे विश्‍लेषण केल्यास ते अजूनही स्वत:चीच फसवणूक करत आहेत असे लक्षात येते. आपल्या सरकारने फार चांगली कामे केली आहेत म्हणजे सरकार चांगले आहे असाच त्यांचा दावा आहे. मात्र त्यांनी स्वत:मध्ये नीट डोकावून पाहिल्यानंतर काही दिवसांनी का होईना आपले सरकारच चांगले नव्हते हे त्यांच्या लक्षात येईल. आता सध्या तरी लोक सरकारवर नाराज आहेत या म्हणण्यात सरकारची काही चूक नसून लोकांचीच चूक आहे असा सूर डोकावत आहे.

एकंदरीत आपण निवडून येणार नाही हे आपल्या गफलतीने घडणार नसून लोकांच्या चुकीने घडणार आहे अशा मन:स्थितीत राहुल गांधी दिसत आहेत. आपल्या सरकारने माहितीचा अधिकार दिला, याच सरकारने लोकांना शिक्षणाचाही अधिकार दिला आणि हेच सरकार आता अन्न सुरक्षा विधेयक सुद्धा आणत आहे. त्याचबरोबर याच सरकारने लोकपाल विधेयक सुद्धा आणलेले आहे. एवढी सगळी कामे करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, असा त्यांचा युक्तीवाद आहे. मग या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचलेल्या नाहीत का? त्या तर सरकारने लोकांपर्यंत पोचवल्याच आहेत. त्याची भरपूर जाहीरात केलेली आहे आणि लोकांना या अधिकारांचे चांगले-वाईट परिणाम सदोदित अनुभवायला सुद्धा मिळत असतात. मग आपले काम लोकांपर्यंत पोचू शकलो नाही या राहुल गांधींच्या म्हणण्यात अर्थ काय? त्यांची खरी तक्रार त्यांना सांगता येत नाही, ही खरी अडचण आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, या सरकारने हे सगळे कायदे केलेले आहेत, त्यांची माहिती लोकांपर्यंत पोचवली आहे, परंतु त्याचे श्रेय या सरकारला मिळून त्याला मते मिळत नाहीत ही खरी अडचण आहे. म्हणजे सरकारने योजनांचे मार्केटिंग केले आहे, पण ते मार्केटिंग योग्य पद्धतीने केले नाही. ही सारे कामे आपण केली आहेत हे लोकांपर्यंत पोचविण्यात यश आले नाही.

राहुल गांधी लोकांना मूर्ख तरी समजत आहेत किंवा स्वत:चाच बनेलपणा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. वर उल्लेख केलेले सगळे कायदे एकट्या कॉंग्रेस पक्षाने केलेले नाहीत. ते सगळे कायदे मंजूर करताना विरोधी पक्षांची मदत झालेली आहे. विरोधी पक्षांच्या मदतीशिवाय यातला कोणताही कायदा मंजूर होऊ शकला नसता. म्हणजे या कायद्यांचे श्रेय विरोधी पक्षांकडे सुद्धा जाते. मात्र ही वस्तुस्थिती झाकून ठेवून राहुल गांधी या सगळ्या कामांचे श्रेय एकट्या कॉंग्रेसकडे आणि त्यातल्या त्यात स्वत:कडे घेण्याचा लबाडपणा करत आहेत आणि ती लबाडी लपत नसल्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत. राहुल गांधी मात्र आपण मार्केटिंगमध्ये कमी पडलो आणि भारतीय जनता पार्टी काहीही न करता केवळ मार्केटिंगच्या जोरावर प्रचार करत आहे, असे म्हणून स्वत:चे समाधान करवून घेत आहेत. असे असले तरी त्यांना पराभवाची चाहुल लागली आहे हे नक्की. मतदारांची सर्वेक्षणे हा एक जोक असतो आणि सारी सर्वेक्षणे खोटी ठरवून कॉंग्रेसलाच २०० पेक्षा अधिक जागा मिळून हाच पक्ष सत्तेवर येणार आहे असे म्हणणारे राहुल गांधी आता निदान सर्वेक्षणे सत्यावर आधारित असतात हे तरी मान्य करायला लागले आहेत. आता दारूण पराभवाला तोंड द्यावे लागेल तेव्हा तरी ही सर्वेक्षणे अशी का येतात, हे त्यांना कळून चुकेल.

Leave a Comment