पुण्याच्या धरणपरिसरात पाऊस – पुणेकरांची चिंता संपली

पुणे,दि.१ – पुण्यात पाऊस उशीरा का होईना पण आला. सोमवारपासून पाऊसधारा कोसळल्याने पुणेकरांची चिंता संपली.

पुण्यामध्ये काल दिवसभर पाऊस कोसळत होता. शहरभरात त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. काही ठिकाणी झाडे पडली, रस्ते बंद झाले. पण यापैकी कशाचाही मनस्ताप पुणेकरांनी करून घेतला नाही. कारण कसाही येवो, पण पाऊस त्यांना हवा होता. जिल्हाभर धरणांच्या क्षेत्रातही पाऊस आहे. या दोन दिवसातच त्यामुळे धरणांतील पाण्याची पातळी लक्षणीय वाढली.

पुण्याचा एकूण पाणीसाठा आता १० टीएमसीपर्यंत पोहोचला आहे, तर पवना धरणसुद्धा ४५ टक्के भरले आहे. असाच पाऊस पुढील काही दिवस सतत लागून राहण्याची चिन्हे आहेत. त्याचा जोर तितकाच राहिला, तर आठवडाभरातच वर्षभराची चिंता दूर करेल हे नक्की.

पाणीसाठ्याची ताजी आकडेवारी अशी – (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)
धरण               पाऊस (मिमी)   पाणीसाठा (टीएमसी)   
टेमघर                   १३१         ०.९०
वरसगाव                  ९०         ३.८५
पानशेत                   ७३         ३.८९
खडकवासला               ६५         १.१२
एकूण पाणीसाठा:       ९.७६ टी एम सी

Leave a Comment