पुणेकरांनी केले एव्हरेस्ट पादाक्रांत

पुणे दि.१९-आजचा शनिवारचा सूर्योदय पुणेकरांसाठी वेगळाच ठरला. पुण्यातील गिरीप्रेमी आणि पिंपरी चिंचवडच्या सागरमाथा या दोन संस्थांतील धाडसी तरूणांनी शनिवारी सकाळी भल्याभल्या गिर्यारोहकांना नामोहरम करणार्‍या एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखरावर आपले पाय रोवून जणू त्यालाच नामोहरम केले. अनेक अडचणींचा सामना करत आखली गेलेली ही मोहिम पूर्णपणे नागरी मोहिम होती आणि म्हणून त्याचे विशेष महत्त्व आहे.
  गिरीप्रेमीचे कृष्णा ढोकळे, टेकराज अधिकारी तर सागरमाथाचे आनंद बलसोडे, बालाजी माने, सागर पालकर,श्रीहरी तापकीर यांनी शनिवारी सूर्योदयाबरोबर एव्हरेस्टचा माथा गाठून या मोहिमेसाठी घेतलेले सारे श्रम सार्थ ठरविले आणि पुणेकरांचे व महाराष्ट्राचे नांव उज्ज्वल केले.
  एव्हरेस्टवर चढाई करण्याचे जगभरातील गिर्यारोहकांचे स्वप्न असते. मात्र त्यासाठी आर्थिक पाठबळ गरजेचे असते तशीच आवश्यक असते ती शारीरिक आणि मानसिक क्षमता. गिरीप्रेमीच्या या मोहिमेतही या अडचणी होत्याच. पण मुख्य अडचण होती पैशांची. त्यासाठी मोहिम आखल्यापासूनच वारंवार नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात येत होते आणि नागरिकांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला होता. दुर्दम्य आशावाद घेऊन मोहिमेवर रवाना झालेले हे शिलेदार अखेर जिंकले आणि अवघ्या मराठी माणसांची मान अभिमानाने उंचावली.
  शुक्रवारी पहाटे कॅप तीनहून दुपारी ही मंडळी साऊथ कोलला पोहोचली होती. सर्वांच्या तब्येती उत्तम होत्या.थोडी विश्रांती घेऊन रात्री साडेनऊलाच अंतिम चढाईसाठी कूच करण्यात आले आणि सार्‍या अडथळ्यांना पार करत शनिवारी सकाळी त्यांनी एव्हरेस्टवर पाऊल रोवले.
   महाराष्ट्राच्याच सुरेश चव्हाण यांनी १८ मे १९९८ला अशीच एव्हरेस्टला गवसणी घालून महाराष्ट्राचा पहिला मराठी एव्हरेस्टवीर होण्याचा मान मिळविला होता तर २१ मे२००९ ला महाराष्ट्राची कन्या कृष्णा पाटील या तरूणीने अवघ्या २१ व्या वर्षी एव्हरेस्ट वीरांगना होण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर आता या गिरीप्रेमी आणि सागरमाथा संस्थेच्या गिर्यारोहकांनी पुन्हा एकदा मराठी पाऊल एव्हरेस्टवर ठेवले आहे.
  विशेष म्हणजे या टोळीने येथून जातानाच महाराष्ट्राच्या जाणता राजाचा म्हणजे छ.शिवाजी महाराजांचा पुतळा येथून नेऊन तो एव्हरेस्ट बेसकॅम्पवर बसविला आहे.