Your Friends' Activity

Loading...

पाण्याची समस्या गंभीर होतेय

आपल्या देशापुढचा पाण्याचा प्रश्‍न कधी सुटणार याची वाट पहात आहोत आणि तो प्रश्‍न सुटण्याऐवजी अधिक गंभीर होत आहे. गंमतीचा भाग असा की देशात सर्वात जास्त पाऊस पडत असूनही पाण्याचा प्रश्‍न वरचेवर कठीण होत आहे. सरकारने १९५२ सालपासून प्रत्येक निवडणुकीतल्या जाहीरनाम्यात जनतेला स्वच्छ आणि भरपूर पाणी देण्याचे आश्‍वासन दिले आहे तरी १४ पैकी एकाही निवडणुकीत या सरकारला आपण हे आश्‍वासन पूर्ण केलेय असे छातीठोकपणे सांगता आलेले नाही इतका तो अवघड होऊन बसला आहे. या सार्‍याच विसंगतीत आणखी एक विसंगती म्हणजे पाण्याच्या समस्येचा त्रास सर्वाधिक प्रमाणात ज्यांना होतो त्यांना या पाण्याच्या शुद्धतेसाठी आपणही काही केले पाहिजे याची यत्किंचितही जाणीव नाही. तेच लोक पाणी वरचेवर घाण करीत आहेत. पाण्यात गणपती टाकत आहेत, पाण्यात निर्माल्य टाकत आहेत आणि कधीही न कुजणार्‍या वस्तू त्यात टाकून ते कधीच शुद्ध होणार नाही याची दक्षता घेत आहेत. पाण्याला जीवन म्हटले जाते पण आपण आपल्या हाताने त्याला आपले मरण करून टाकले आहे. पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने ग्रामीण भागातल्या जनतेच्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. याबाबत आपण नेमके कोठे आहोत याचा शोध घेण्यासाठी केन्द्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने देशभरातल्या ग्रामीण भागातल्या पाण्याचे नमुने तपासले,.

या तपासणीत पाच टक्के नमुन्यांतले पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे दिसून आले. या पाण्यात निरनिराळी रसायने मिसळली असल्याने ते वापरण्यास अयोग्य असल्याचे दिसून आले. शहरांत मोठ्या प्रमाणावर कारखाने असतात आणि त्यांचे सांडपाणी सरळ गटारात सोडून दिले जाते. पण खेड्यात काही कारखाने नसतात आणि जलाशयांत रसायने सोडली जाण्याची शक्यता नसतेे. मग गावांतल्या पाण्यात रसायने कोठून आली ? पहिले कारण म्हणजे खोलवर खोदल्या गेलेल्या विहिरी आणि नलिका कूप. ग्रामीण भागात त्यांना बोअरिंग म्हटले जाते. प्रत्येक वर्षी पडणारा पाऊस आहे तेवढाच आहे पण त्या पावसाच्या पाण्याचे जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी आहे. त्या मानाने पाण्याचा उपसा जास्त आहे म्हणून जमिनीच्या आतल्या पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. पातळी कितीही खाली गेली तरीही पाणी आवश्यकच आहे मग ते पाताळात जाऊन वर काढावे लागले तरी काही हरकत नाही म्हणून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून खोलवरचे पाणी वर काढणे सुरू झाले आहे. जमिनीच्या या थरात काही रसायने आहेत. ती पाण्यात मिसळतात आणि तेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. असे पाणी पिल्याचे सांधे धरतात.

आणखी एक कारण म्हणजे शेतात वापरली जाणारी रासायनिक खते. जी शेतात दिली जातात पण ती नंतर पाण्यात मिसळली जातात. साखर कारखान्यांची मळी पाण्यात मिसळली जाणे हा प्रकारही आता वाढत चालला आहे. अशा प्रकारे केवळ रसायनांमुळे दूषित झालेल्या पाण्याचा त्रास देशातल्या चार कोटी ६४ लाख लोकांना होत आहे. महाराष्ट्रात साखर कारखान्यांच्या परिसरात राहणारे लोक या प्रकारात मोडतातच पण राजस्थान, बिहार आणि आसाम या राज्यांत हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. केन्द्र सरकारने या लोकांना मदत म्हणून बाराव्या योजनेत ११ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत पण या पैशांनी ङ्गार काही साध्य होणार नाही. कारण त्यांना दिल्या जाणार्‍या पाण्याच स्रोत प्रदूषित आहेत. देशातल्या अनेक नद्याच प्रदूषित आहेत. नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत असतो. माणसाला जगायला पाणी लागतेच पण विकास करायलाही पाणी लागते. म्हणून मानवी प्रगती प्रामुख्याने नद्यांच्या काठीच झालेली दिसते. आपण पाण्यापासून किंवा धरणांपासून जसजसे दूर जाऊ तसे प्रगती कमी झालेली दिसते. मानवाने नदीच्या साह्याने प्रगती केली पण नदीच्या पाण्याची शुद्धता सांभाळली नाही. प्रगती करण्यासाठी रासायनिक खते वापरली पण ती खते नदीच्या पाण्यात सोडली. कारखाने काढले पण कारखान्यांतून बाहेर पडणारे पाणी नदीच्या पात्रात सोडले. परिणामी ज्यांच्या साह्याने प्रगती करायची त्या लोकमातांना आपण गटारीची कळा आणली.

शहरातल्या लोकांना थेट पाणी आणावे लागत नाही. ांना महानगरपालिका घरपोच पाणी देतात. त्यासाठी पैसेही अगदी कमी घेतात. शहरातली हीच मंडळी बाहेर पडल्यावर एका पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये खर्चतात पण महानगरपालिकेकडून पाणी घेताना मात्र त्यांना एक रुपयाला एक हजार बाटल्या पाणी दिले जात असते. म्हणून त्यांना पाण्याची किंमत कळत नाही. पण खेड्यातल्या लोकांना लांबून पाणी आणावे लागते. शेताला पाणी लागते आणि ते न मिळाल्यास काय होते याचा त्यांना अनुभव असतो. त्यामुळे त्यांना तरी पाण्याची किंमत कळायला हवी पण आता आता तेही निष्काळजीपणा करायला लागले आहेत आणि तेही लोकमातांना गटार समजून त्यांच्या पाण्यात मैल्यापासून साखर कारखान्यांच्या मळीपर्यंत सर्व काही सोडायला लागले आहेत. ग्रामीण भागात अशुद्ध पाणी वापरून पोटाचे विकार होऊन मरणारांची संख्या वरचेवर वाढत असल्याचे आरोग्य खात्यानेही कळवले आहे. अशा मरणारांची संख्या दरसाल वेगाने वाढत आहे. आपण पाण्याच्या बाबतीत एवढे निष्काळजी असल्यामुळेच आपल्याला या संकटांना तोंड द्यावे लागत आहे तेव्हा आपण आपली जलाशये शुद्ध ठेवली पाहिजेत याची जाणीव या देशातल्या लोकांना राहिलेली नाही.

संबंधित माहिती

  • गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या जलप्रदूषणावर भरपूर प्रकाश पडला. राज्याच्या २१ जिल्ह्यातले पाणी प्रदूषित असल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले. आता पूर्ण भारतातच जलप्रदूषण किती धोकादायक पातळीपर्यंत वाढले आहे याचे आकडे खुद्द सरकारतर्ङ्गेच संसदेत सादर करण्यात आले आहे.

  • आपण जेव्हा एक कप चहा पितो, तेव्हा तेवढा चहा तयार करण्यासाठी किती लिटर पाणी लागते याचा कधी हिशोब करत नाही. वरकरणी एक कप चहा म्हणजे एक कप पाणी एवढे समीकरण आपण ङ्गार तर मांडू शकतो. परंतु पाण्याचा सखोलपणे विचार करणारे लोक असे सांगतात की, एक कप चहा तयार करण्यासाठी ७० लिटर पाणी लागते. सामान्य माणसाला हे समीकरण आहे की कोडे आहे असा प्रश्‍न पडू शकतो, परंतु हे समीकरण योग्य आहे.

  • महाराष्ट्रातल्या पाण्याच्या टंचाईने अनेकांना अंतर्मुख केले आहे आणि राज्यात उपलब्ध असलेले पाणी किती काटकसरीने वापरले पाहिजे याचा हिशेब सारे लोक लावत आहेत. पाण्याचा विषय निघाला की उसाचे नाव निघाल्या वाचून राहत नाही कारण ऊस हे पाण्याची प्रचंड हाव असलेले पीक आहे. निदान तसा समज तरी आहे. आता शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी ठिबक सिंचनाशिवाय उसाला परवानगीच देऊ नये अशी सूचना केली आहे.

  • लंडन - गेल्या वर्षीच्या मे आणि जून महिन्यात ऋषिकेश आणि हरिद्वार या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लाखो भाविकांनी पवित्र स्नान केले. परंतु त्यामुळे या पाण्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. गंगेचे पाणी पवित्र मानले जाते आणि अजून तरी ऋषिकेशजवळ या पाण्यात प्रदूषके मिसळलेली नाहीत. मात्र सुपरबग्सचे जे प्रमाण सुसह्य मानले जाते त्याच्या ६० पट जास्त सुपरबग्स आता या पाण्यात आढळले आहेत.

  • वॉशिंग्टन - झर्‍याचे पाणी दिसायला तर स्वच्छ दिसते. डोंगराच्या कपारीतून झिरपत येणारे असे पाणी दिसले की लोकांना ते पिण्याचा मोह आवरत नाही. काही पर्यटक जंगलात किंवा डोंगराळ प्रदेशात पर्यटनाला गेले की अशा झर्‍याच्या पाण्याच्या बाटल्या भरून नेतात. ते पाणी काही लोकांसाठी पवित्रही असते पण, आता या पाण्याचे परीक्षण करण्यात आले आहे. या परीक्षणात हे पाणी आरोग्याला घातक असल्याचे दिसून आले आहे.