पाकिस्तान हायकमांडने शीख भाविकांना व्हीसा नाकारला

दिल्ली दि.१७- शीखांचे धर्मगरू गुरू अर्जुनसिग यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाकिस्तानातील गुरूद्वारांची यात्रा करू इच्छिणार्‍या शीख भाविकांना दिल्लीतील पाकिस्तानी हायकमांडने व्हीसा नाकारला असल्याचे समजते.
  या प्रकरणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष अवतारसिंग मक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील ३२० शीख बांधवांनी पाकिस्तानातील गुरूद्वारांच्या दर्शनाला जाण्यासाठी आपले पासपोर्ट पाकिस्तानी हायकमांडकडे दिले होते. मात्र अवघ्या कांही तासात कोणतेही कारण न देता हे पासपोर्ट परत करण्यात आले व सर्वांनाच व्हीसा नाकारण्यात आला. या प्रकरणी शीखबांधवांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतः लक्ष घालून पाकिस्तान सरकारशी बोलणी करावीत अशी विनंती करण्यात आली आहे असेही सांगण्यात आले.
   दरम्यान कांही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार गैरसमजातून घडला असण्याची शक्यता आहे. गुरू अर्जुनसिंग यांच्या पुण्यातिथीच्या तारखेबाबत थोडा गोंधळ आहे. सुधारित नानकशाही कॅलेंडरनुसार ही पुण्यतिथी २५ मेला येते तर पारंपारिक तारखेनुसार ती १६ जूनला येते.