
इस्लामाबाद- रोजच्या सरावासाठी उडालेली पाकिस्तान एअरफोर्सची दोन विमाने हवेतच धडकून दाट लोकवस्तीच्या भागात कोसळली असल्याचे वृत्त आहे. नौशेरा जिल्हातील रश्वाई भागात ही दोन विमाने कोसळली. ही दोन्ही विमाने प्रशिक्षण विमाने होती. वैमानिकांबाबत अधिक माहिती कळू शकलेली नाही. ही विमाने दाट लोकवस्तीच्या भागात कोसळल्याने अनेक नागरिक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही दोन विमाने हवेतच धडकल्यानंतर एक विमान घरात घुसले व त्याला आग लागली. आसपासच्या परिसरात जळक्या विमानाचे अवशेष विखुरले आहेत. सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. रिसालपूरजवळील पाकिस्तान एअर फोर्स अॅकॅडमीजवळचा हा अपघात झाला आहे. मृतांचा तसेच जखमींचा नक्की आकडा समजू शकलेला नाही.
