दिग्गजांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान

 

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील १२१ जागांसाठी १७६२ उमेदवारांचे  तर राज्यात १९ जागांसाठी ३५८  उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. सर्वत्र मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यात सरासरी  ६२  टक्के मतदान झाले आहे. 

कडक उन्हाची तमा न बाळगता तसेच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तरी मतदारांचा उत्साह कमी झाला नव्हता , सर्वत्र  रांगा होत्या. यंदा मतदानाची टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे.  मात्र अनेक ठिकाणी मतदारयाद्यांमधील घोळ चव्हाट्यावर आला. इलेक्शन कार्ड असूनही मतदार यादीत नाव नाही ,असे प्रकार घडल्याने मतदार नाराज तर झाले शिवाय त्यांना ‘कोऱ्या बोटा’ने घरी परतावे लागले. अनेक ठिकाणी कोणतेही बटण दाबले तर कॉंग्रेसला मत  हा  प्रकार आढळून आल्याने मतदान यंत्रे सील करून पुन्हा प्रक्रिया राबविण्यात आली. 

देशात आज पाचव्या टप्प्याचे तर राज्यातील दुसऱ्या टप्प्याचे  मतदान संपले . राज्यात सरासरी ६२  टक्के मतदान झाले आहे.लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने मतदानावर परिणाम झाल्याचे  सांगण्यात येत आहे . राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत  मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे पुणे -५९ टक्के ,बारामती -५८ टक्के ,सोलापूर -५७ टक्के ,मावळ -६३ टक्के ,सातारा -५७ टक्के ,अहमदनगर -६०टक्के ,शिरूर -६० टक्के ,सांगली -६२ टक्के ,रत्नागिरी सिंधुदुर्ग -६० टक्के , लातूर -६२ टक्के ,परभणी -६२ टक्के ,नांदेड -६३ टक्के ,कोल्हापूर-५८ टक्के ,हातकणंगले -६९ टक्के ,बीड -६४ टक्के ,शिर्डी -६१ टक्के ,माढा -६२ टक्के ,हिंगोली -६३ टक्के ,उस्मानाबाद -६५ टक्के असे मतदान झाले आहे. 

महाराष्ट्रातील या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, सुरेश धस, प्रतीक पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सुप्रिया सुळे, नीलेश राणे, राजीव सातव, उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील, राजू शेट्टी, विश्‍वजित कदम, शिवाजीराव आढळराव-पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, लक्ष्मण जगताप यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे . 

 

Leave a Comment