जलप्रदूषणाचा राष्ट्रीय धोका

गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या जलप्रदूषणावर भरपूर प्रकाश पडला. राज्याच्या २१ जिल्ह्यातले पाणी प्रदूषित असल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले. आता पूर्ण भारतातच जलप्रदूषण किती धोकादायक पातळीपर्यंत वाढले आहे याचे आकडे खुद्द सरकारतर्ङ्गेच संसदेत सादर करण्यात आले आहे. केंद्रीय जल संसाधन मंत्र्याने राज्यसभेत सादर केलेल्या या आकडेवारीनुसार देशातल्या भूमिगत पाण्यात झालेल्या प्रदुषणामुळे देशवासियांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. देशातली जमिनीच्या आतील पाण्याची पातळी खूप खोलावर गेल्यामुळे त्या खोलावरच्या काही प्रदूषकांचा परिणाम पाण्यावर झाला असून त्याचा प्रभाव लोकांच्या आरोग्यावर पडायला लागला आहे. भारतातली ८० टक्के ग्रामीण जनता भूमिगत पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा धोका किती व्यापक आहे याची कल्पना येते. या धोक्यातला सर्वाधिक गंभीर धोका म्हणजे पाण्यामध्ये होणारी फ्लोराईडस्ची वाढ.

ही वाढ जास्त झाली की, दातावर आणि शरीरातल्या सर्व हाडांवर फ्लोराईडचा थर चढायला लागतो. काही वेळा हाडे सक्त आणि ताठ होतात आणि काही लोकांना हात-पाय दुमडणे सुद्धा अशक्य होऊन जाते. फ्लोराईडबरोबरच नायट्रेटचाही प्रादुर्भाव या पाण्यात होतो आणि पाण्यातून नायट्रेट शरीरात जातात. त्यांचा लहान मुलांवर परिणाम होत असतो. त्यातून वाढणारा सर्वात गंभीर धोका म्हणजे ब्ल्यू बेबी डिसीज. या रोगामध्ये लहान मुलांच्या श्‍वसन आणि पचनसंस्थेमध्ये अडथळे निर्माण होतात. त्याशिवाय त्यांच्या मेंदूवर सुद्धा गंभीर परिणाम होतो. सध्या देशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जवळपास ५०० ते ६०० ङ्गूट खोल गेलेल्या विंधन विहिरीतून पाणी खेचून ते लोकांना पुरवले जात आहे. इतक्या खोलीवर अनेक प्रकारची खनिजे आणि धातू असतात. ते धातू पाण्यात विरघळतात आणि तेच पाणी प्यायला दिले की, ते धातू पाण्यातून रक्तात मिसळले जातात. अशा प्रकारे रक्तामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक सूक्ष्म पोषण द्रव्ये मिसळली गेली की, आरोग्याचे अनेक प्रश्‍न निर्माण होतात.

विशेषत: कर्करोग होण्याची शक्यता असते. पाण्याची पातळी खोलावर जाणे आणि त्या पाण्यामध्ये उद्योगातले सांडपाणी तसेच मानवी मलमूत्र यांचे मिश्रण होणे या दोन कारणांनी पाणी प्रदूषित होते. सध्या हे दोन्ही प्रभाव वाढत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी अधिक प्रदूषित होत आहे. सरकार यावर काही कायदे करण्याचा विचार करत आहे. मात्र सरकारी कामाच्या धिम्या गतीने हेही काम होत आहे आणि भारतातले अनेक जलस्रोत वरचेवर प्रदूषित होत आहेत. देशामध्ये एकूण ६३९ जिल्हे आहेत आणि त्यातील २६७ जिल्हे या भूमिगत पाण्याच्या प्रदुषणामुळे धोक्याच्या पातळीला पोचलेले आहेत. म्हणजे देशातला जवळपास ४० टक्के भाग जलप्रदूषण बाधित झालेला आहे.

Leave a Comment