कुतुब मिनार

kutub

काही ठिकाणं अशी असतात की ज्यांना वारंवार भेटी देऊनही त्यांना पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह आवरत नाही. त्या वास्तूचे महात्म्य, ऐतिहासिक महत्व, तेथील कलाकृती, सौदर्य आणि पर्यटकांचा संपूर्ण वर्षभर असलेला राबता या सगळ्या गोष्टींमुळे अशी ठिकाणे वारंवार आपल्याला आकर्षित करीत असतात. दिल्लीत आल्यावर अशाच काही ठिकाणांच्या मोहात पडण्याचा प्रसंग आला. लाल किल्ला, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, संसद भवन आदी प्रमुख ठिकाणांसह या सर्वांतील जुने आणि खरोखरच ऐतिहासिक आणि प्राचिन भारताकडे घेऊन जाणारे `कुतुब मिनार`ला असाच योगायोगाने भेट देण्याचा प्रसंग आला आणि एका ऐतिहासिक वास्तुला, त्याच्या माहात्म्याला जवळून पाहता आल्याचे समाधान लाभले.

`कुतुब मिनार` बद्दल केवळ ऐकलेलेच होते. अनेकदा टिव्ही, चित्रपट आणि वर्तमानपत्रांमध्ये त्याचे चित्र पाहण्यात आले होते. रजेचा दिवस पाहून आमची स्वारी कुतुब मिनारकडे वळली. नेहमी ऐकिवात असलेल्या या स्थळाकडे मोर्चा वळताच उत्सुकता आणखी ताणली गेली. जवळपास पाऊण तासाच्या अंतराने आम्ही मिनार गाठले. उंचच उंच मिनार, परिसरातील विलोभनीय व प्रशस्त उद्यान, वेगवेगळे प्रेक्षणीय स्थळे आणि देश, विदेशातील हजारो पर्यटक असे प्रथमदर्शी चित्र होते. बाराव्या शतकातील या देशातील सर्वात प्राचिन वास्तुला प्रत्यक्ष डोळ्यात साठविण्यासाठी जमलेली अमाप गर्दी या वास्तुचे महत्व नकळत विषद करीत होती. पुरातत्व खात्याने आपल्या ताब्यात घेतलेल्या या वास्तुची आजची स्थिती पाहून ते अलिकडेच कधीतरी बांधले गेले असावे इतके ते जिवंत वाटत होते.

कुतुब मिनारच्या निर्मितीचा इतिहासही तसा फार रोमांचक असा आहे. दिल्लीवर पृथ्वीराज चव्हाण या हिंदू राजाचे राज्य होते. तो अकरा-बाराव्या शतकाचा काळ होता. त्यानंतर मोहंमद घोरीने स्वारी करून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. अवघ्या काही वर्षातच कुतुबुद्दीन ऐबकाने मोहंमद घोरीला पराभूत करून दिल्लीवर आपले साम्राज्य स्थापित केले. कुतुबुद्दीनाने घोरीवर मिळविलेल्या शानदार विजयाचे प्रतिक म्हणून कुतुब मिनार बांधावयास घेतले. ११९२ साली कुतुब मिनाराच्या बांधकामास सुरूवात झाली. कुतुबुद्दीन ऐबकाच्या नावावरून त्याला कुतुब मिनार असे संबोधले जाते. कुतुबुद्दीनने आपल्या हयातीच्या काळात मिनारचे बांधकाम केले. त्यानंतर त्याचा मुलगा अल्ततमीश ऐबक याने मिनारचे पुढील बांधकाम केले. परंतु आजच्या स्थितीत पाहायला मिळणारे मिनार हे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या शासकांनी त्यात केलेल्या विविध बांधकामांचे सुधारीत चित्र आहे.

अल्ततमशनंतर फिरोजशहा तुघलक यानेही मिनारचे काही मजले बांधले आहेत. मिनारचे मुख्य प्रवेशद्वार १३११ साली अलाउद्दीन खिलजीने बांधले. त्याला `अलाई दरवाजा` असे म्हणतात. एकूण १०० एकर जागेत मिनार व मिनारचा परिसर आहे. मिनारची उंची ७२.५ मिटर (२३७.८ फूट) इतकी आहे. मिनारचा घेर जमिनीलगत १४.३२ मीटर इतकी आहे. तर सर्वोच्च टोकावर २.७५ मिटर इतका असून तो खालून वर निमूळता होत गेला आहे. कुतुब मिनार जगातील सर्वाधित उंचीचे मिनार आहेत, हे विषेश. इंडो-इस्लामीक कलाकृतीचा सुंदर नमूना म्हणून मिनार विकसित झाले आहे. देशावर किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागात राज्य करणार्‍या वेगवेगळ्या शासकांनी आपल्या मुळ मातीची छाप त्या-त्या ठिकाणांवर सोडली आहे. कुतुब मिनार हे असेच इस्लामिक कलाकृतीने तयार झालेले एक सुंदर वास्तुशिल्प आहे.

फिरोज शहाच्या काळात १५०५ झालेल्या भूकंपामुळे मिनारचे दोन मजले क्षतिग्रस्त झाले होते. तेव्हा त्यांची डागडूजी करण्यात आली. त्यानंतर १७९४ आणि १८५८ साली झालेल्या वेगवेगळ्या भुकंपांमुळे मिनारचे काही क्षतिग्रस्त भाग नव्याने तयार करण्यात आले. कुतुबुद्दिन ऐबकाचा मुलगा अल्ततमश आणि नंतरचा शासक अल्लाउद्दीन खिलजी यांच्या कबरीही याच परिसरात आहे.

शंभर एकराच्या या प्रशस्त परिसराचा अनेक प्रकारे विकास करण्यात आला आहे. अतिशय देखण्या पध्दतीने बांधण्यात आलेली उद्याने मिनारची शोभा वाढवित आहेत. या उद्यानांमध्ये हजारो प्रेक्षक निवांतपणे बसून परिसराचा आणि येथील कलाकृतीचा आनंद घेत असतात. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये या वास्तूचा समावेश झाला असून जगातील प्रमुख `मोस्ट व्हिजीटेड साईट`मध्ये या वास्तुचा समावेश होते. देशातील सर्वाधिक पाहिले जाणारे आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले ठिकाण ताज महल असले तरी २००६ साली सर्वाधिक पर्यटक खेचणार्‍या स्थळाचा मान कुतुब मिनारने पटकाविला होता. यावर्षी ताज महालला देश, विदेशातील २५ लाख पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या तर कुतुब मिनारला ३९ लाख पर्यटकांनी भेट दिल्याचे नोंद आहे. ताज महाल विदेशी पर्यटकांचे देशातील प्रमुख आकर्षण असले तरी अलिकडे कुतुब मिनारकडे पर्यटकांचा लोंढा मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचे तेथील गर्दीवरून लक्षात येते.

 

  • मंगेश वरकड सौजन्य महान्यूज
  • Leave a Comment