आग्रा- ताजमहालाचे शहर

उत्तर भारतातील उत्तर प्रदेशात असलेले आग्रा हे जगप्रसिद्ध शहर युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या तीन साईटस असलेले भारतातील बहुदा एकमेव शहर आहे. दिल्लीपासून २०० किमीवर असलेले हे शहर ताजमहाल, आग्रा फोर्ट आणि जवळच असलेल्या फतेपूर शिक्री यासाठी जसे जगभरात प्रसिद्ध आहे तसेच येथे अन्य अनेक इमारती, मंदिरे, कबरी यांचीही खूप गर्दी आहे. भारत भेटीवर येणार्याज परदेशी पर्यटकांची भेट आग्रा पाहिल्याशिवाय सार्थकी लागू शकत नाही असे म्हणतात. जगातील सात आश्चर्यात गणना झालेला ताजमहाल हे येथले मुख्य आकर्षण.
taj-mahal
मुघल साम्राज्याची राजधानी म्हणूनही कांही काळ आग्रा चर्चेत होते.१५२६ ते १६५८ या काळात मुघल सम्राटांची राजधानी आग्रा होती. मात्र आग्रा शहराचे उल्लेख महाभारतातही सापडतात. प्रत्यक्ष रेकॉर्ड मात्र ११ व्या शतकापासून उपलब्ध आहे. येथे ५०० वर्षांच्या काळात अनेक मुघल तसेच हिंदू राजांनी राज्य केले. १५०६ साली सुलतान सिकंदर लोधी याने दिल्लीहून राजधानी आग्रा येथे आणली. मुघल सम्राट हे बांधकाम सम्राटच होते त्यामुळे या शहरातअनेक सुंदर इमारती उभारल्या गेल्या. अकबराने बांधलेले आग्रा फोर्ट आणि फतेपूर शिक्री व शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ उभारलेला ताजमहाल म्हणजे पांढर्याश संगमरवरातील जणू गोठलेला अश्रू असे याचे वर्णन केले जाते.
taj-mahal1

(फोटो सौजन्य – tajmahal)
ताजमहाल कधी पहावा याचे उत्तर कधीही आणि कितीही वेळा पाहावा असे असले तरी तो सूर्योदयाच्या वेळी आणि पौर्णिमेच्या रात्री जरूर पाहावा. अर्थात गाईड घेऊन पाहिल्यास संपूर्ण इतिहास जसा कळतो तसेच या संगमरवरी इमारतीत अतिशय कुशल हाताने कोरल्या गेलेल्या अनेक चिन्हांचा प्रतीकांचा अर्थही समजतो. शुक्रवारी ताजमहाल पाहण्यासाठी बंद असतो हे लक्षात घेऊन कार्यक्रम आखावा. भारतीय मुघल वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या या इमारतीचे असंख्य फोटो काढले गेले आहेत, प्रसिद्ध केले गेले आहेत पण प्रत्यक्ष डोळ्यांनी ही वास्तू न्याहाळण्याचे सुख आगळे हे खरे. यमुनेच्या काठी असलेला हा महाल समोर असलेल्या हिरव्यागार बागेमुळे, पाण्याच्या कालव्यांमुळे आणि आजूबाजूच्या सुंदर फुलझाडांमुळे आकर्षक भासतो.पौर्णिमेच्या काळात पाच दिवस रात्रीही तो पाहता येतो.
taj-mahal3
दिल्लीतील लाल किल्याच्या प्रमाणेच बांधलेला आग्रा फोर्ट अकबर बादशहाने बांधला. चांगली जपणूक केलेला हा किल्ला शेवटी तुरूंगात रूपांतरीत झाला. औरंगजेबाने वडील शहाजहान यांना येथेच कैदेत टाकले होते आणि येथेच त्यांचा अंत झाला. या किल्याच्या खिडकीतूनच ताजमहालाकडे पाहात शहाजहान बादशहाने प्राण सोडले अशी कथा सांगितली जाते. आग्रा शहरापासून जवळच असलेल्या फतेपूर शिक्री येथेही जरूर भेट द्यावी. मुघल शैलीतील प्रचंड मोठ्या इमारती हे येथले वैशिष्ठ. आग्रा फोर्टजवळ असलेले मनकामेश्वर मंदिरही जरूर पहावे.
taj-mahal4
दरवर्षी फेब्रुवारी मार्च या काळात येथे शिल्पग्राम मेळा नावाने आग्रा महोत्सव साजरा होतो. आग्रयाच्या पेठा आणि अन्य मिठायांचा आस्वाद जसा घ्यायलाच हवा तसेच चाट, डाळमूठ यांचीही चव चाखायला हवीच. मुख्य बाजारात म्हणजे मॉल रोड सदर रस्त्यावर चामड्याच्या सुंदर वस्तू, संगमरवरात कोरलेल्या हस्तकलेच्या वस्तू, खाद्यपदार्थाच्या दुकानांची नुसती रेलचेल आहे.मात्र खरेदी करताना घासाघीस करण्याचे कौशल्य असेल तरच खरेदीच्या फंदात पडावे हे बरे!

Leave a Comment