अत्यावस्थेत छोटा राजन

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून तो अत्यावस्थेत असल्याचे सांगण्यात आले आहे. सिंगापूरमधील एका खासगी रुग्णालयात ‘आयसीसीयू’ विभागात राजनवर उपचार सुरू असल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, दाऊदला ठार मारल्याशिवाय मी मरणार नाही, असे त्याने आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगितल्याचेही कळते.

छोटा राजनला नियमितपणे डायलिसीस करावे लागत असून डायलिसिस सुरू असतानाच त्याचा ब्लड प्रेशर हाय झाला व छातीत दुखू लागले. त्यानंतर राजनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजनची प्रकृती अजूनही नाजूक असून या संपूर्ण घडामोडीवर भारतीय सुरक्षा यंत्रणा बारीक लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
राजनच्या प्रकृतीबाबत चेंबूर-टिळकनगर येथील राजनच्या मित्राकडून खात्री करण्याचा प्रयत्न केला असता त्याने राजनची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. रुग्णालयात अबू सावंत हा राजनची काळजी घेत आहे. अबू हा राजनचा मॅनेजर असून २००६ मध्ये हवाला रॅकेटमध्ये नाव आल्यानंतर सावंत भारतातून पसार झाला होता. या प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचने राजनची पत्नी सुजाता निकाळजेसह सहा जणांना अटक केली होती. हा खटला सध्या मोक्का न्यायालयात सूरू आहे.

Leave a Comment